गरज तारतम्याची

0
118

जल्लिकट्टूवरील सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी विरोधात तामीळनाडूची जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली आहे. विशेष म्हणजे जनतेचे हे आंदोलन उत्स्फूर्त आहे आणि त्यात तरुणाईचा सहभाग लक्षणीय आहे. या आंदोलनाची व्यापकता पाहाता राज्य शासनापासून केंद्र सरकारपर्यंत सर्वांना त्याची दखल घ्यावी लागणार आहे. जल्लिकट्टू हे केवळ निमित्त ठरले आहे. त्यावरील बंदीद्वारे तामिळी अस्मितेचे आणि परंपरेवर घाला घातला जात आहे असे चित्र निर्माण झालेले असल्याने त्याविरुद्ध एवढे जनमत संतप्त झालेले दिसते. जल्लिकट्टूचा वाद हा काही नवा नाही. याबाबत त्याचे समर्थक आणि विरोधक यांच्यात गेली अनेक वर्षे न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. प्राणिमात्रांवरील अत्याचारांच्या विरोधात लढत आलेल्या ‘पेटा’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात हा विषय लावून धरला आहे. मध्यंतरी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने न्यायालयीन बंदीतून पळवाट काढून या खेळाला सशर्त परवानगी दिली होती, परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला नंतर मनाई केली. तेव्हापासून जल्लिकट्टूचा विषय ऐरणीवर आला आहे आणि तामिळी जनतेचा रोष ‘पेटा’ नेही ओढवून घेतला आहे. जल्लिकट्टू हा शब्द खरे तर ‘सल्ली’ (नाणी) आणि ‘कट्टू’ (संच) या मूळ शब्दांपासून बनल्याचे सांगितले जाते. पूर्वीच्या काळी बैलांच्या शिंगांना नाणी बांधली जायची आणि हे सुसाट सुटलेले बैल रोखून ती नाणी मिळविण्याचे आव्हान साहसी तरुणांना दिले जायचे. तेव्हाचा काळ लक्षात घेता, सैन्यात भरती करण्यासाठी साहसी वीरांच्या शोधार्थ अशा प्रकारची प्रथा निर्माण झाली असणे शक्य आहे. सुसाट सुटलेल्या बैलाला रोखणे आणि त्यावर काबू मिळवणे सोपे नाही. तरीही हा साहसी खेळ तामीळनाडूत रुजला आणि तामिळी परंपरेचा एक भाग बनला. मेक्सिकोमध्ये खेळवल्या जाणार्‍या अशाच प्रकारच्या झुंजी किती घातक ठरत असतात हे सर्वविदित आहे. परंतु जल्लिकट्टूची त्याच्याशी तुलना करू नये असा तामिळी जनतेचा आग्रह आहे. आम्ही आमच्या बैलांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाढवतो असा त्यांचा युक्तिवाद दिसतो. अर्थात, कोणत्याही गोष्टीचे व्यावसायिकरण झाले की त्यात चुरस निर्माण करण्यासाठी नाना गैरप्रकार केले जातात. गोव्यातील धिरयोंच्या बाबतीतही हेच झाले होते. तेथेही हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे असा युक्तिवाद पुढे करण्यात आला होता, परंतु त्या आडून चालणारी सट्टेबाजी, त्या मुक्या प्राण्यांचे केले जाणारे हाल या सगळ्या गोष्टी डोईआड करता येत नाहीत. जल्लिकट्टूसंदर्भातही असे प्रकार होत नसतील हे सांगता येत नाही. त्यामुळे योग्य नियमन आणि पुरेशा खबरदारीद्वारे अशा साहसी खेळाला सशर्त परवानगी दिली जाणे हाच सुवर्णमध्य ठरू शकतो. ‘पेटा’ सारख्या संघटनांचे प्राणीप्रेम किती असली आणि किती दिखाऊ हाही विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सर्कसमध्ये प्राण्यांवर अत्याचार होत असल्याचे सांगत या संघटनांनी तो व्यवसायच बंद पाडला. उद्या मांसाहारावरच समूळ बंदी घालण्याची मागणी करीत कोणी पुढे येऊ शकते. मुक्या प्राण्यांच्या जिवाशी आणि स्वातंत्र्याशी खेळ करण्याचा मक्ता मानवाला मिळालेला नाही हे जितके खरे आहे, तितकेच अशा विषयांना धसास लावताना थोडे तारतम्यही गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांप्रतीच्या लटक्या जिव्हाळ्याने आज रस्तोरस्ती कुत्र्यांचा सुळसुळाट दिसतो तो असल्याच भंपकपणाची परिणती आहे. जल्लिकट्टूचा विषय सध्या न्यायप्रवीष्ट आहे. त्यामुळे न्यायालयच त्याबाबत योग्य निर्णय निश्‍चित घेईल, परंतु अशा विषयांना भावनिक मुद्दा बनवणारी जनता, त्याचा राजकीय फायदा उपटायला पुढे सरसावलेले राजकारणी आणि दुसरीकडे दांभिक प्राणीप्रेम दाखवणार्‍या व्यक्ती आणि संघटना या सार्‍यांनी असे विषय जटील करून सोडले आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून तारतम्याने सुवर्णमध्य काढला जाणे हीच खरी काळाची गरज आहे.