‘कॉंग्रेसमुक्त भारता’ची चाहुल देणारे निकाल

0
74

काल लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांत कॉंग्रेस पक्षाने आसाम आणि केरळ ही दोन राज्ये गमावल्याने पुडुचेरी वगळता देशातील तीसपैकी केवळ सहा राज्यांमध्ये कॉंग्रेसची सरकारे उरली आहेत. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड ही तीन राज्ये आणि ईशान्य भारतातील मेघालय, मिझोराम आणि मणिपूर ही तीन राज्ये कॉंग्रेसच्या हाती उरली आहेत. यापैकी उत्तराखंडचे सरकार जाता जाता राहिले, तरी तेथे आणि हिमाचल प्रदेश व मणिपूरमध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेवर येण्यासाठी कॉंग्रेसने डाव्यांशी हातमिळवणी केली होती, तर तामीळनाडूमध्ये द्रमुकशी युती करून सत्ता मिळवण्याचा पक्षाचा प्रयत्न होता, परंतु ही दोन्ही समिकरणे चुकली असून उलट कॉंग्रेसशी युती केल्याचा फटका द्रमुकला बसला आहे. दर पाच वर्षांनी आलटून पालटून सत्तापरिवर्तन होत आलेल्या तामीळनाडूमध्ये यावेळी जयललिता यांच्या अभाअद्रमुकने गेल्या बत्तीस वर्षांत प्रथमच पुन्हा सत्तेवर येण्याचा मान मिळवला.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा अनेक राज्यांत सफाया झाला. त्या निवडणुकीवेळी पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ ची हाक दिली होती. ही हाक आता प्रत्यक्षात उतरताना दिसत असून एकेक राज्य कॉंग्रेसच्या हातून निसटू लागले आहे.
२०१७ साली गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी उत्तराखंड वगळता कोठेही कॉंग्रेसच्या पुनरागमनाची खात्री पक्षाच्या नेत्यांना असल्याचे दिसत नाही. त्यानंतर २०१८ साली छत्तीसगढ, कर्नाटक, मध्य प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान आणि त्रिपुरात निवडणुका होणार आहेत. परंतु त्यातही कर्नाटक वगळता इतर राज्यांमध्ये कॉंग्रेसच्या पुनरागमनाची शक्यता फारच कमी आहे. २०१९ मध्ये आंध्र प्रदेश, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिसामध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणुका होतील. परंतु आजची परिस्थिती पाहाता यापैकी कोणत्याही राज्यात कॉंग्रेस पुनरागमन करण्याची शक्यता व्यक्त होताना दिसत नाही.