कॉंग्रेसची उद्यापासून राज्यभरात चेतना यात्रा

0
14

>> प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांची माहिती; कुंकळ्ळीतून होणार प्रारंभ

कॉंग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी २१ एप्रिलपासून राज्यभरात चेतना यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल दिली.

पणजीत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पक्षाचे सरचिटणीस आर्चित नाईक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, समीर पै रायकर, महेश म्हांबरे उपस्थित होते.

पोर्तुगीज राजवटीत पोर्तुगीजांविरुद्ध सर्वात प्रथम ज्या गावात उठाव झाला होता, त्या कुंकळ्ळी गावातून या चेतना यात्रेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती अमित पाटकर यांनी दिली.
दि. २१ रोजी कुंकळ्ळीबरोबरच वेळ्ळी व केपे या गावात चेतना यात्रा दाखल होईल. याच दिवशी संध्याकाळच्या सत्रात ही यात्रा कुडचडे, सावर्डे, सांगे या मतदारसंघात दाखल होईल. दि. २२ रोजी कुंभारजुवे, प्रियोळ, म्हापसा, थिवी व हळदोणा, दि. २३ रोजी काणकोण, फोंडा, शिरोडा, मडकई, दि. २५ रोजी साळगाव, कळंगुट, शिवोली, मांद्रे, पेडणे, दि. २६ रोजी नुवे, कुठ्ठाळी, मुरगाव, वास्को, दाबोळी, दि. २७ रोजी मडगाव, फातोर्डा, नावेली, बाणावली, कुठ्ठाळी, दि. २८ रोजी डिचोली, साखळी, मये, वाळपई, पर्ये, दि. २९ रोजी सांत आंद्रे, सांताक्रूझ, ताळगाव, पणजी व पर्वरी अशी चेतना यात्रा होईल.

राज्यातील नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे. तसेच ज्यांना कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असेल, त्यांनी प्रवेश करावा, असे आवाहन पाटकर यांनी केले आहे.

लोकसभा उमेदवार ३ महिन्यांत ठरतील
कॉंग्रेसचे लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही मतदारसंघातील उमेदवार पुढील तीन महिन्यांत निश्‍चित होतील, असे अमित पाटकर यांनी संबंधित प्रश्‍नावर बोलताना स्पष्ट केले. पक्षाची सदस्यता मोहीम चालू असल्याचेही ते म्हणाले.