कॉंग्रेसचा नवा डाव

0
53

कॉंग्रेसच्या गोवा प्रदेशाध्यक्षपदावरून गिरीश चोडणकर यांची हकालपट्टी करण्याची पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी लावून धरलेली मागणी फेटाळून आणि खुद्द चोडणकर यांनी यापूर्वी दोनवेळा दिलेल्या राजीनाम्याला बाजूला सारत पक्षश्रेष्ठींनी चोडणकर यांनाच प्रदेशाध्यक्षपदी राहण्यास सांगितले आहे. मात्र, एकीकडे गिरीश यांच्यावर हा विश्वास व्यक्त करीत असताना दुसरीकडे आलेक्स रेजिनाल्ड यांना कार्याध्यक्षपदी नेमून अधिकारांचे संतुलन साधत पुन्हा पक्ष संघटनेमध्ये अंतर्गत बंडखोरी उफाळणार नाही याचीही तरतूद केली आहे.
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कॉंग्रेसच्या ज्या विविध समित्या पक्षश्रेष्ठींनी जाहीर केल्या आहेत, त्यावरील एकूण १३ पैकी तब्बल आठ सदस्य हे सासष्टीतील आहेत. कॉंग्रेसने आपले लक्ष उत्तरेपेक्षा दक्षिण गोव्यावर व त्यातही ख्रिस्तिबहुल सासष्टीतील मतदारसंघांवर केंद्रित केल्याचे हे द्योतक आहे.
पक्ष समित्यांच्या घोषणेतील एक सर्वांत लक्षणीय बाब म्हणजे पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांचा समावेश कोणत्याही समितीवर न करीत त्यांना अलगद बाजूला सारण्यात आले आहे. राणे यांची ज्येष्ठता आणि पक्षातील आजवरचे स्थान लक्षात घेता त्यांना अशा प्रकारे बाजूला सारण्यातून त्यांच्या भावी वाटचालीप्रतीचा अवि श्वासच जणू पक्षनेतृत्वाने दर्शवलेला आहे आणि तो जिव्हारी लागणारा आहे. आगामी निवडणुकीत राणे उतरणार नाहीत व भाजपात असलेल्या आपल्या पुत्राशी सहकार्य करतील असे जणू कॉंग्रेस नेतृत्वाने गृहित धरलेले दिसते. दुसरे महत्त्वाचे नाव ह्या यादीत दिसत नाही ते रवी नाईक यांचे. अर्थात, त्यांच्या पुत्रांनी धरलेला भाजपचा रस्ता आणि खुद्द रवी यांची भाजपाच्या दिशेने पडू लागलेली पावले लक्षात घेता त्यांना वगळले जाणे समजू शकते.
पक्षामध्ये लुईझिन फालेरो यांना पुन्हा चांगले दिवस येतील अशी चिन्हे दिसत आहेत. विरोधी पक्षनेते म्हणून आजवर पक्षाचे बुडते तारू सावरून धरलेल्या दिगंबर कामत यांना कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कायम ठेवले गेले आहे, परंतु आगामी निवडणुकीतील मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून कामत यांच्या नावाचे सूतोवाच करण्यात आलेले नाही आणि ती शक्यताही दिसत नाही.
चोडणकर यांना आजवर पक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वत ःच्या शिरावर घ्यावी लागली, मग ती गेली लोकसभा निवडणूक असो वा जिल्हा पंचायत निवडणूक असो. स्वतः उमेदवार म्हणूनही ते अपयशीच ठरले आहेत, परंतु तरीही त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद ठेवण्याचा कॉंग्रेसचा निर्णय योग्य ठरतो, कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष बदलणे म्हणजे पुन्हा पक्षामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे ठरले असते. ज्यांनी चोडणकर यांच्या नेतृत्वाला आव्हान दिले होते, त्या फ्रान्सिस सार्दिन यांनी आपण त्यांची नियुक्ती स्वीकारत असल्याचे सांगून तलवार म्यान केली आहे, परंतु आलेक्स रेजिनाल्ड यांनी मात्र त्याबाबत मौन बाळगलेले आहे. चोडणकर यांचे प्रदेशाध्यक्षपदी राहणे कोणाला कितपत मानवले आहे हे लवकरच जेव्हा चाळीसही गटसमित्यांच्या फेररचनेचे काम हाती घेतले जाईल तेव्हा दिसेल.
पक्षाने कार्याध्यक्षपदाची धुरा सोपविलेले आलेक्स सिक्वेरा हे स्वतःच नुवेमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनाही गेल्या निवडणूक लढविण्यात स्वारस्य आहे. गेल्या वेळी स्वतःच निवडणूक लढवून त्यांनी अपयश पदरात पाडून घेतले होते. खरे तर कॉंग्रेस पक्षाला आज निवडणुकीत स्वतः न उतरता पक्षकार्याला वाहून घेणार्‍या, संघटना बांधणार्‍या नेत्यांची गरज आहे. पक्षापाशी आज निधी, समर्थ नेतृत्व आणि कार्यकर्ते ह्या तिन्ही गोष्टींची उणीव आहे. ती भरून काढण्याची आवश्यकता आहे. गोव्यातील कॉंग्रेसपुढील सर्वांत मोठी समस्या आहे ती म्हणजे पक्षातील सगळेच नेते निवडणूक लढवायला गुडघ्याला बाशिंग बांधून सिद्ध आहेत. पक्षसंघटनेपेक्षाही स्वतःच्या वैयक्तिक राजकीय उत्कर्षालाच जो तो वाहिलेला आहे. त्यामुळे पक्ष मोठा व्हावा यासाठी विचार करण्यापेक्षा स्वतःचे राजकीय अस्तित्व कसे टिकवावे ह्याच चिंतेत हे नेते दिसतात. गोवा फॉरवर्डसारख्या उत्सुक पक्षाशी युती करायला आडकाठी आणण्यामागेही हेच स्वार्थी राजकारण दडलेले आहे. गेल्या वेळी ह्याच स्वार्थपरायण वृत्तीमुळे कॉंग्रेसमध्ये घाऊक पक्षांतर घडले आणि पक्ष रसातळाला गेला. कॉंग्रेस तीच विटी ठेवून येणार्‍या निवडणुकीत नवा डाव खेळू पाहाते आहे, परंतु गेल्या निवडणुकीत केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही ह्या दृष्टीने पक्ष काही बोध घेणार आहे का हे पाहावे लागेल.