असोळण्यात सिलिंडर स्फोटात घराची हानी : एक जखमी

0
109

ओरेल असोळणा येथे सुभाष केरकर यांच्या घराबाहेर ठेवलेल्या स्वयंपाक गॅस सिलिंडर स्फोटात घराचा दर्शनीभाग पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून ७ लाख रुपयांची हानी झाली. दोन मोटरसायकलीही जळाल्या.ओरेल असोळणा येथे सुभाष केरकर व माधव केरकर यांचे घर असून, काल सकाळी घरातील मंडळी कामानिमित्त घराबाहेर गेली होती. अंदाजे ११.३० वाजता आग दुर्घटना घडली. घराबाहेर व्हरांड्यावर स्वयंपाक गॅस सिलिंडर ठेवला होता व घरासमोर दोन मोटरसायकली होत्या. तसेच जवळपास रूमडवृक्ष असलेले ‘पेड’ असून तेथे समयी पेटवून ठेवली होती. ही समई नेहमीच पेटवून ठेवत असत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार समईची वात पक्षांनी नेली व मोटरसायकल जवळ टाकली असता मोटर सायकलने पेट घेतला. त्या आगीची ठिणगी सिलिंडरजवळ पडल्याने सिलिंडरचा स्फोट होऊन घराने पेट घेतला. त्यात घराचा दर्शनी भाग जळाला व स्फोटाने भिंतीना भेगा गेल्या आहेत.
आग लागल्याचे समजात शेजारी जुझे कार्दिनो (५५) हे विझवण्यासाठी गेले असता तेही भाजून जखमी झाले. त्यांना उपचारासाठी बांबोळी येथील वैद्यकीय इस्पितळात दाखल केले आहे. कुंकळ्ळी पोलिसांनी तात्काळ अग्नीशामक दलाला वृत्त देताच ते तात्काळ घटनास्थळी पोहचले व आग विझविण्याचा प्रयत्न केला.