केरळ पूरग्रस्तांसाठी गोवा सरकारचे ५ कोटी

0
131

>> सरकारी-निमसरकारी कर्मचार्‍यांनाही मदतीचे आवाहन

>> सरकारी कर्मचारी संघटनेचा आवाहनाला प्रतिसाद

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी गोवा सरकारकडून ५ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी काल मंजूर केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांतील कर्मचार्‍यांना केरळ पूरग्रस्त निधीसाठी एक दिवसाचा पगार स्वखुशीने देण्याचे आवाहन केले आहे.

केरळ राज्यातील जलप्रकोपामुळे अनेकांचे बळी गेले असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लाखो लोक बेघर झाले असून त्यांच्या पुनर्वसनासाठी कोट्यवधी निधीची गरज आहे. मुख्यमंत्री पर्रीकर उपचारासाठी अमेरिकेत असल्याने केरळ पूरग्रस्तांसाठी निधी मंजूर करू शकले नव्हते.
राज्यातील सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांतील कर्मचार्‍यांनाही मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मदतीचे आवाहन केले आहे. सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांतील कर्मचार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार केरळ पूरग्रस्त निधीसाठी स्वखुशीने देण्याचे आवाहन मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केले आहे.

सरकारी कर्मचारी संघटनेचा पुढाकार
सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांतील कर्मचार्‍यांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्याच्या आवाहनाला योग्य प्रतिसाद देऊन एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी देण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहन गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने केले आहे.
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या पूरग्रस्तांसाठी आर्थिक साहाय्य करण्याच्या आवाहनाचे स्वागत केले आहे.

राज्यातील अनेक सरकारी कर्मचार्‍यांनी केरळ पूरग्रस्त निधीसाठी सरकारने आवश्यक अध्यादेश जारी करण्यासाठी संघटनेने पत्र पाठविण्याचे आवाहन केले आहे, असे सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जॉन नाझारेथ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पर्रीकर उपचारासाठी
मुंबईतील इस्पितळात

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आपल्या वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने काल मुंबईला रवाना झाले असून त्यांना काल संध्याकाळी लीलावती इस्पितळात त्यांना दाखल करण्यात आले. येत्या २५ ऑगस्टपर्यंत ते उपलब्ध असणार नाहीत, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री पर्रीकर आपल्या आजारावर अमेरिकेतील इस्पितळात अकरा दिवस उपचार घेऊन बुधवारी संध्याकाळी गोव्यात परतले होते. अमेरिकेतून परतल्यानंतर लगेच दुसर्‍याच दिवशी मुख्यमंत्री पर्रीकर तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. ते मुंबईतील इस्पितळात काही चाचण्या व तपासणी करून घेण्यासाठी गेल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाशी निगडीत अधिकार्‍यांकडून मिळाली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थिकलश यात्रेत बुधवारी दाबोळी, वास्को येथे सहभाग घेतला होता. माजी पंतप्रधान वाजपेयी यांचे निधन झाले त्यावेळी मुख्यमंत्री पर्रीकर अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेत होते. पर्रीकर यांना माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्याची संधी मिळाली. दरम्यान, मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अमेरिकेतून परतल्यानंतर सरकारी कामकाज हाताळण्यास गुरूवारी सुरुवात केली होती.