केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज – उद्या गोवा भेटीवर

0
130

>> खाणबंदी प्रश्‍नावर चर्चेची शक्यता

केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या दक्षिण गोव्यातील एका तारांकित हॉटेलमध्ये ११ व १२ जून होत असलेल्या दोन दिवसीय परिषदेनिमित्त केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे गोव्यात वास्तव्य असणार आहे. या काळात ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर, भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन राज्यातील खाण बंदीचा प्रश्‍न त्यांच्यासमोर पुन्हा एकदा मांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, गडकरी यांच्याकडून राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे ३१ मे रोजी गेलेल्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान कार्यालयातील प्रधान सचिवांशी खाणबंदी प्रश्‍नावर चर्चा करून लवकर तोडगा काढण्याची मागणी केली होती. शिष्टमंडळाला पंतप्रधान विदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर खाण प्रश्‍नावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या काही आमदारांनी खाण बंदी प्रश्‍नी आंदोलन करणार्‍यांना जूनच्या दुसर्‍या आठवड्यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही दिली होती. परंतु, केंद्रीय पातळीवरील १० जूनपर्यंत खाणप्रश्‍नी तोडगा काढण्यात न आल्याने खाणव्याप्त भागातील लोकांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
भाजपचे गोवा प्रभारी तथा केंद्रीय मंत्री गडकरी हे एका परिषदेनिमित्त गोव्यात येणार असल्याने भाजपच्या काही आमदारांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन खाण प्रश्‍नी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

खाण अवलंबितांचे
आज धरणे आंदोलन
गोवा मायनिंग पीपल फ्रंटतर्फे सोमवार ११ जून रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ यावेळेत खाण बंदीच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानावर धरणे धरण्यात येणार आहे. खाणबंदी प्रश्‍नी ७ जूनपर्यंत तोडगा काढण्यात येणार आहे, असे आश्‍वासन भाजप नेत्यांना दिले होते. त्यामुळे नियोजित धरणे आंदोलन स्थगित ठेवले होते. परंतु, आत्तापर्यंत तोडगा काढण्यात आलेला नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.