केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांचा अखेर राजीनामा

0
110

नवी दिल्ली
तब्बल २० महिलांनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. दरम्यान, अकबर यांच्यावर आरोप केलेल्या पत्रकार प्रिया रमाणी यांच्या समर्थनासाठी २० महिला पत्रकार पुढे आल्या आहेत.
आपल्या पदाचा राजीनामा देताना अकबर म्हणाले की, त्यांच्यावर झालेल्या आरोपांविरोधात ते आपली बाजू व्यक्तिगतरीत्या न्यायालयात मांडणार आहेत. त्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री या पदावरून दूर होणे सयुक्तिक असल्याचे वाटले. आपल्यावर करण्यात आलेल्या खोट्या आरोपांविरोधात एक व्यक्ती म्हणून लढा देणार आहे. याच कारणासाठी मंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचा दावा त्यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी देशसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहे.
एम. जे. अकबर पत्रकारितेत असताना त्यांनी नवोदित महिला पत्रकारांची लैंगिक छळवणूक केल्याचे आरोप ‘मी टू’ वादळानंतर झाले होते. त्यानंतर या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी त्यांनी आपल्या पदावरून पायउतार होणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षांसह पत्रकारांच्या विविध संघटनांनी म्हटले होते.
अकबर यांनी रविवारी परदेशातून परतल्यानंतर त्यांच्यावरील आरोप फेटाळले असून आरोप करणार्‍या पत्रकार प्रिया रमाणी यांच्या विरोधात सोमवारी मानहानीचा दावा दाखल केला आहे.