एटीएम चोरट्यांची माहिती देणार्‍यास पोलीस खाते रोख बक्षिसाने गौरविणार

0
109

पणजी (प्रतिनिधी)
राज्यातील बँकांच्या एटीएम मशीनला स्किमर, छुपे कॅमेरे बसविणार्‍या सराईत चोरट्यांची माहिती देणार्‍या नागरिकांना १ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. तसेच स्किमर बसविणार्‍या संशयिताला अटक झाल्यास संबंधिताला ५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुक्तेश चंदर यांनी पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यातील विविध भागात एटीएम मशीनला स्किमर, छुपे कॅमेरे बसवून कार्डधारकांची माहिती चोरण्याबरोबरच पैसे काढण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. राज्यात आत्तापर्यंत १३ एटीएम चोरी प्रकरणाची नोंद झाली आहे. या प्रकरणी देशविदेशी नागरिकांना अटक करण्यात आलेली आहे. स्किमर, छुपे कॅमेरे आदी अत्याधुनिक साधनांचा वापर चोरट्यांकडून केला जात आहे. गोवा हे पर्यटनासाठी जगभरात प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी पर्यटक येत असतात. एटीएममध्ये कार्डाचा वापर करताना सावधगिरी बाळगली जात नाही. या पार्श्‍वभूमीवर एटीएममध्ये कार्डाचा वापर करणार्‍याची माहिती चोरण्यासाठी चोरट्यांकडून एटीएम मशीनला स्किमर, छुपे कॅमेरे बसविण्यात येतात. पोलिसांनी कार्डधारकांमध्ये जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे. एटीएम मशीनला स्किमर, छुपे कॅमेरे बसविण्यात येत असलेल्या प्रकाराबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून जागृती केली जाणार आहे, असेही पोलीस महासंचालक चंदर यांनी सांगितले.
बल्गेरिया, रोमानिया, हंगेरी आदी विदेशी देशातील चोरटे आधुनिक साधनांचा वापर करून एटीएम मशीनमधून नागरिकांच्या कार्डातील माहिती चोरून बनावट कार्डे तयार करतात. त्यानंतर बनावट एटीएम कार्डांच्या मदतीने खातेधारकांच्या खात्यातून रक्कम काढतात, असे पोलीस महासंचालक चंदर यांनी सांगितले.