स्पष्ट बहुमत मिळवण्यात भाजपला अपयश
काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीचे बळ वाढले
अठराव्या लोकसभेसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात अटीतटीची लढाई झाल्याचे कालच्या निकालांतून स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार तिसऱ्यांदा केंद्रात पुनरागमन करण्यास सज्ज झालेले असले, तरी भारतीय जनता पक्षाला यावेळी स्पष्ट बहुमत मिळू शकलेले नसल्याने तेलगू देसमचे एन. चंद्राबाबू नायडू, संयुक्त जनता दलाचे नीतिशकुमार आदी मित्रपक्षांचा टेकू घेण्याची वेळ भाजपवर आली आहे.
या निवडणुकीत भाजप स्वबळावर 370 जागा मिळवील व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ चारशेपार जाईल असे दावे भाजप नेत्यांकडून वारंवार केले जात होते, परंतु तमाम मतदानोत्तर पाहण्यांचे अंदाज खोटे ठरवीत कालच्या निवडणूक निकालांनी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्याराज्यांतून धक्के दिले. भाजपला स्पष्ट बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 272 जागाही मिळू शकल्या नाहीत.
मागील लोकसभा निवडणुकीत पैकीच्या पैकी जागा मिळवून देणाऱ्या राज्यांत देखील काही अपवाद वगळता जागांसाठी रालोआला संघर्ष करावा लागला. सर्वांत मोठा हादरा दिला तो उत्तर प्रदेशने. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष – काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने भाजपच्या जागांना मोठे खिंडार पाडले. लोकसभेच्या सर्वाधिक ऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये शेवटची बातमी हाती आली तेव्हा समाजवादी पक्षाने सर्वाधिक 37 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 33 जागांवर समाधान मानावे लागले होते. इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला तेथे सहा जागा मिळाल्या.
उत्तर प्रदेशखालोखाल 48 जागा असलेल्या महाराष्ट्रातही इंडिया आघाडीने मोठे यश मिळवले. इंडिया आघाडीला 30 जागा मिळाल्याचे दिसून आले.
पश्चिम बंगालमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडी यावेळी अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात होती, परंतु तेथेही तृणमूल काँग्रेसने आपला वरचष्मा कायम राखत 29 जागा जिंकून भाजपला 12 जागांवर सीमित ठेवले.
काँग्रेस पक्षाने ह्या निवडणुकीतून पुनरागमन केल्याचे दिसले. मागील निवडणुकीत 52 जागांवर पोहोचलेल्या काँग्रेसने यावेळी 95 पेक्षा अधिक जागा जिंकून आपले अस्तित्व दाखवून दिले. निकालांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा निकाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध जनतेने दिलेला कौल असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी व भाजप यांचा हा राजकीय आणि नैतिक पराभव असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र जनतेने आपल्या सरकारला तिसऱ्यांदा निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीची मतांची टक्केवारीही ह्या निवडणुकीत घसरल्याचे पाहायला मिळाले. 2019 च्या निवडणुकीत रालोआची मतांची टक्केवारी पन्नास टक्क्यांहून अधिक होती, परंतु यावेळी ती 46 टक्क्यांच्या आसपास असल्याचे दिसून आले. इंडिया आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत वाढ दिसून आली असून ती 41 टक्क्यांवर पोहोचली आहेत.
निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुढील चर्चेसाठी घटक पक्षांची आज बैठक बोलावली आहे, तर काँग्रेसनेही ‘नव्या मित्रपक्षांशी’ बोलण्याचे संकेत दिले आहेत. इंडिया आघाडीचीही आज बैठक होणार आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत अलीकडेच सामील झालेले तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू तसेच संयुक्त जनता दलाचे नेते नीतिशकुमार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबतच राहणार असल्याचे म्हटले आहे.