कॅप्टन काका

0
46
  • गजानन यशवंत देसाई

‘‘मी अमरला बजावलं होतं- आमचे हात हे सदा देणार्‍याचे हात आहेत आणि पुढे ते तसेच असावेत. ज्या दिवशी तुझे हात घेणारे होतील त्यावेळी तू माझ्या म्हणजे या बापाच्या नजरेतून उतरलेला असशील. तुला सांगू, आज माझा अमर महाराष्ट्रातील एक चांगला अधिकारी म्हणून नावारूपाला आला आहे.’’

कॅप्टन काका मला पहिल्यांदा भेटले त्याला तीस वर्षे होऊन गेली असतील! आम्ही बेळगावला हॉस्टेलमध्ये राहत होतो. तो दिवस मला जशाचा तसा आठवतो. संध्याकाळचे चार-पाच वाजले असतील. कॉलेजच्या आवारातच आमचे हॉस्टेल होते, त्यामुळे उशिरापर्यंत आम्ही लायब्ररीत बसलेलो असायचो. लायब्ररीतून नुकताच बाहेर पडून मी हॉस्टेलच्या मुख्य गेटजवळ पोहोचलो असेन आणि एक मोटरसायकल हॉस्टेलच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन थांबली. मोटरसायकल मुख्य स्टॅण्डवर चढवून एका रुबाबदार व्यक्तीने डोक्यावरील हेल्मेट काढले आणि मला विचारले, ‘‘अरे बाळा, अमर देसाई कुठल्या खोलीत राहतो?’’
मी त्या व्यक्तीकडे पाहतच राहिलो. अतिशय भारदस्त व्यक्तिमत्त्व… पाहताच क्षणी कोणावरही छाप पडावी असं! साधारण पावणेसहा फूट उंची, सडपातळ बांधा, गोरापान वर्ण, पिळदार टोकदार भरगच्च मिशा आणि हृदयाचा ठाव घेणारी धारदार नजर. अंगावर सफारी. मी पाहताक्षणी ओळखलं, हे मिलिटरीवाले असावेत!
‘‘बाळा, पूर्वी तो तिकडे खालच्या खोलीत राहायचा, आता त्याने खोली बदलली. ओळखतो का तू त्याला?’’
मी लगेच स्वतःला सावरून त्यांना म्हणालो, ‘‘हो, माझ्या शेजारी त्याची खोली आहे!’’
मी त्यांना अमरची खोली दाखवली. अमर माझा वर्गमित्र होता. माझ्या मागोमाग ते वरच्या मजल्यावर आले. हॉस्टेलच्या खोलीत आम्ही तिघेजण-तिघेजण राहायचो. खोलीत आल्यावर अमरने आम्हा सर्वांची त्यांच्याशी ओळख करून दिली. मी देसाई आहे म्हटल्यावर ते खूश झाले. गोव्यातील म्हटल्यावर चौकशी करायला सुरुवात केली. पहिला प्रश्न त्यांनी विचारला, ‘‘देसाई म्हणजे काणकोणचे की कुंकळ्ळीचे?’’
मी म्हटलं, आमचे पूर्वज मूळ डेगवे-बांदा येथील, सध्या स्थायिक गोव्यात. डेगवे म्हटल्यावर मग त्यांची नात्यांसंबंधी चौकशी सुरू झाली. आमचे कोण-कोण पाहुणे डेगव्याला असतात वगैरे वगैरे. दोन देसाई एकत्र आले की समजावं, ते कुठून ना कुठून तरी पाहुणे लागतातच!
तास-अर्धातास ते बसले असतील पण त्यांच्या बोलण्यातून ते आमच्यावर भारदस्त छाप पाडून गेले होते. आम्हा सर्वांना कोल्हापूरला यायचा आग्रह करून ते निघाले. म्हणाले, ‘‘चला, मी निघतो. व्यवस्थित रहा, काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे व्यसनांपासून दूर राहा. तुम्ही समजदार आहात पण वडीलकीच्या नात्यानं सांगणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगितलं.’’
नंतर माझ्याकडे वळून म्हणाले, ‘‘गजाभाऊ, तुम्ही तर आमचे पाहुणे निघालात!’’
मला ‘गजाभाऊ’ म्हणून हाक मारणारे ते पहिले. त्यांनी गजाभाऊ म्हटल्यावर सुरुवातीला मी थोडासा संकोचलो, पण मनातून सुखावलो. ते गेल्यावर मी अमरला म्हटलं, ‘‘काय डॅशिंग पर्सनालिटी आहे रे तुझ्या वडिलांची! तूसुद्धा डिफेन्समध्ये जाणार असशील!’’
‘‘छे! नाही रे बाबा… डिफेन्सवाल्यांना फॅमिली सुख नसतं. आम्ही भोगलंय ते. मी कायम हॉस्टेलमध्ये, आई कोल्हापूरला, ते तिकडे फ्रंटवर. आपलं सिव्हिल लाइफच बरं…!’’
काहीही असो, ते माझ्या मनात घर करून राहिले. दुसर्‍यांदा ते मला भेटले ९३-९४ च्या दरम्यान. त्यावेळी अमर वाहतूक निरीक्षक झालेला आणि मी वास्कोतील उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू झालेलो.

मध्यंतरी त्यांच्याबद्दल मला रवी पाटलांकडून समजत होतं. त्यांच्या ओळखी थेट महाराष्ट्राच्या आमदार-खासदारांपर्यंत कशा आहेत, सध्या ते काय करत आहेत, वगैरे वगैरे. तोपर्यंत ते कॅप्टनच्या हुद्यावरून निवृत्तसुद्धा झाले होते.

एके दिवशी कामावर असताना मला कॉलेजच्या नंबरवर फोन आला. त्यावेळी आजच्यासारखे मोबाईल फोन नव्हते. कोल्हापूरहून फोन आल्याचे समजल्यावर मी लगबगीने रिसिव्हर उचलला. ‘हॅलो’ म्हटल्यावर पलीकडून आवाज आला, ‘‘गजाभाऊ, मी वसंतराव देसाई बोलतोय. अमरचे वडील…’’
गजाभाऊ म्हणताच मी ओळखलं, देसाई काका आहेत! त्यांना गोव्यातून गाडी घ्यायची होती. कुणीतरी गोव्यातील ओळखीचा असावा म्हणून त्यांनी मला फोन केला होता. शोरूममध्ये माझ्या ओळखीची एक मुलगी होती, मी तिच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर शोरूममध्ये गेलो.. दोन दिवसानंतर गाडी घेऊन जाताना त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणालं, ‘‘गजाभाऊ, वडीलकीच्या नात्याने एक विचारू का मी तुम्हाला?’’
म्हटलं, ‘‘काका विचारा की.’’
‘‘तुझी त्या मुलीबरोबर फक्त मैत्रीच आहे ना, की आणखी काही?’’
मी चपापून गेलो… वरून हसत म्हणालो, ‘‘असं का विचारताय काका?’’
‘‘बघ, तू माझ्या आमरचा मित्र आहेस. ती मुलगी सुंदर जरी असली तरी तुला शोभणारी नाही. फक्त मैत्री असेल तर ठीक, पण समजा जर काही वेगळं असेल तर तू पुढे न जावं असं मला वाटतं. कारण मागच्या दोनतीन भेटीत मी निरीक्षण केलं, ती मुलगी मला थोडीशी चंचल वाटली.’’
‘‘काका, खरंच तसं काही नाही.’’
‘‘नाही तर ठीक आहे… मी तसं समजतो.’’
माझ्या खांद्यावर हात ठेवून ते निघाले. निघताना मला म्हणाले, ‘‘मी थोडा स्पष्टवक्ता आहे. मिलिटरीचा गुण तो. वाईट वाटून घेऊ नकोस. जसा माझा अमर तसा तू.’’
काका निघून गेले. पण काकांचे निरीक्षणही काही चुकीचे नव्हते. त्यांच्यातला स्पष्टवक्तेपणा मला खूपच भावला गेला.
त्यानंतर त्यांची वरचेवर भेट होत गेली. मीही कोल्हापूरला गेल्यावर त्यांना भेटायचो. जिव्हाळा वाढत गेला आणि एके दिवशी रवी पाटलांचाच फोन आला, ‘‘एक वाईट बातमी आहे. अमरचा भाऊ संज्या गेला…’’
मी सुन्न झालो! कसं झालं, काय झालं काहीच कळलं नाही. मध्यंतरी तो गोव्यात चांगल्या हुद्यावर नोकरीला होता. ती नोकरी सोडून डिफेन्समध्ये ऑफिसर हुद्यावर भरती झाला आहे एवढंच माहीत होतं. काही दिवसांनंतर मी सांत्वनपर भेटीसाठी कोल्हापूरला गेलेलो. अमरची भेट झाली, पण काकांची भेट होऊ शकली नाही. काही कामानिमित्त काका गावाला गेल्याचे कळले. वर्ष-दीडवर्षाने कोल्हापूरला गेलो त्यावेळी काकांची भेट झाली. यावेळी काका एकदम ढेपाळल्याचे मला दिसले. संज्याच्या आठवणीने व्याकूळ झालेले. त्याच्या आठवणीने परत परत डोळे भरून येत होते. ड्युटीवर जाण्याअगोदर संज्या काय-काय म्हणाला, कुठे उभा राहून काय काय सांगितलं, भविष्यात काय करायचं, गावातल्या शेतजमिनीचं काय करायचं, सर्व कसं मॅनेज करायचं या सर्वांचे प्लॅनिंग त्याने कसे केले होते, त्याची माहिती डोळ्यात पाणी आणून सांगत होते. माझं मन हेलावून गेलं. मला म्हणाले, ‘‘गजाभाऊ, नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही. एवढा हुशार राजबिंडा माझा पोरगा एम.एस्सी. गोल्ड मेडललिस्ट. खरं म्हणजे माझ्या इच्छेमुळेच डिफेन्समध्ये भरती झाला. हॉर्स रायडिंग करून आला आणि खोलीत झोपला तो उठलाच नाही. आता मला वाटतं, डिफेन्समध्ये पाठवलं नसतं तर बरं झालं असतं. दैवाचा खेळच काही विचित्र असतो. आम्ही कानोलीचे इनामदार. आमचे पूर्वज छत्रपतींकडे सरदार होते. इनामदारी तिथून मिळाली. अमरची नोकरी ही भटकंतीची. महाराष्ट्रात त्याची कुठेही बदली होऊ शकते. आणि मुख्य म्हणजे त्याला या जमीनदारीत रस नाही. माझ्या संजयला यात खूप रस होता. पण काय करणार, तोच नाहीये. हे सांभाळायचं कुणी?’’
सांत्वनासाठी माझ्याजवळ शब्दच नव्हते. कालांतराने पुढच्या भेटीत काका मला थोडे सावरल्यासारखे वाटले. मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी कोल्हापूरला डिफेन्स अकादमी उघडली आणि स्वतःला त्या कार्यात झोकून दिलं.

अमरची आई शाळेत शिक्षिका होती. काका कायम आघाडीवर… आज काश्मीर तर उद्या पूर्वांचलात. पण या माऊलीने संसार उत्तम सांभाळला. अमरची धाकटी बहीण कराडला लग्न करून दिलेली. अमर मोठा आणि संजा तिसरा आता हयात नव्हता.
नंतर अधूनमधून काकांचे फोन यायचे. कुणाला एखादं स्थळ बघ, नाहीतर गोव्यात आलेल्यांना माझा नंबर द्या. माझ्या लक्षात आलं, काका स्वतःला गुंतवून ठेवत आहेत… आणि एके दिवशी रवी पाटलांचा फोन आला.
‘‘गजा, एक वाईट बातमी आहे…’’ मी गप्पच राहिलो.
‘‘हॅलो, ऐकतोयस ना? अमरची आई वारली…’’
बाराव्याला अमरच्या घरी कानोलीला गेलो. काका कोलमडून गेलेले. समजूत कशी काढायची? माणसाला एक ना एक दिवस या प्रसंगातून जावेच लागते. यालाच तर जीवन म्हणतात.
वर्षभरानंतर असंच काकांबरोबर फोनवर बोलणं चालू होतं. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. मला सहज म्हणाले, ‘‘गजाभाऊ, गावाकडचे आमचे घर जुने झाले आहे. शेतीवाडी आहे. आम्ही त्या गावचे इनामदार. तिथलं घर आता मोडकळीस आलंय तेव्हा त्याला पुनर्वैभव प्राप्त व्हावं असं मला वाटतं… एक छानसा वाडा बांधावा असं म्हणतोय. तुझं काय मत?’’ मी म्हणालो, ‘‘काका, काहीही करा पण अमरला विश्वासात घेऊन करा. कारण त्याची नोकरी फिरतीची आणि कानोलीत त्याला काही स्वारस्य असेल असं मला तरी वाटत नाही.’’
‘‘बघ बाळ, सगळ्याच गोष्टी काही पैशाने मोजायच्या नसतात. आम्ही इनामदार. तुझा मित्र ज्यावेळी वाहतूक खात्यात नोकरीला लागला त्याचवेळी मी त्याला बजावलं होतं- ‘आमचे हात हे सदा देणार्‍याचे हात आहेत आणि पुढे ते तसेच असावेत. ज्या दिवशी तुझे हात घेणारे होतील त्यावेळी तू माझ्या म्हणजे या बापाच्या नजरेतून उतरलेला असशील.’ तुला सांगू, आज माझा अमर महाराष्ट्रातील एक चांगला वाहतूक अधिकारी म्हणून नावारूपाला आला आहे. एक कर्तव्यनिष्ठ आणि चारित्र्यवान अधिकारी म्हणून तो नावाजला आहे. आमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असं काहीही त्याच्या हातून घडलेलं नाही. बाप म्हणून मला त्याचा खूप अभिमान वाटतोय. पण तुला सांगू, आपले मूळ जिथे आहे त्याला आपण विसरता कामा नये. जगाच्या पाठीवर आम्ही कुठेही गेलो तरी आमची ओळख कानोलीकर देसाई म्हणूनच सांगू. त्यासाठी तिथे आपल्या नावासारखं काहीतरी असायलाच हवं. तुझ्या काकीची फार इच्छा होती की आपण येथे गावात चांगला वाडा बांधावा! त्यासाठी राजअंगण असलेला एक टुमदार वाडा बांधावा असं म्हणतोय. तुझ्यासारखे काही स्नेही इथे येतील, त्यांची चांगली ऊठबसही करता येईल… पुढे माझ्यामागे ही वास्तू तर राहील!’’
वाडा बांधणं सुरू झालंसुद्धा!

वर्षभरानंतर मी कोल्हापूरला जाताना आजर्‍यात पोहोचलो असताना कानोलीला सहज भेट दिली तर एक छान राजंगणाची वास्तू जुन्या घराच्या जागी उभी होती. मी सहज काकांना विचारलं, ‘‘काका, वाडा छान बांधलात. पण पुढे देखभाल करण्याच्या दृष्टीने काय व्यवस्था आहे? कारण एवढ्या मोठ्या वाड्याची देखभाल करणं म्हणजे मोठी खर्चिक बाजू आहे. आमच्या गोव्यात असे खूप जुने वाडे सध्या निर्मनुष्य आणि पडीक आहेत.’’
मागे अमर पण हेच म्हणाला होता. अमरची नाखुशी मला जाणवली होती. कारण पैशांचा अपव्यय होतोय हे अमरचे मत होते आणि मलाही ते पटले होते. काका म्हणाले, ‘‘तुम्ही आजकालची मुलं सर्वकाही पैशांच्या चष्म्यातून का पाहता रे? त्याच्याही पलीकडे काहीतरी जीवन असतंच ना रे बाळा? मी सर्व गोष्टींचा विचार केला आहे. त्या वाड्याच्या देखभालीसाठी एक ट्रस्ट करणार आहे. तो ट्रस्ट या वास्तूची देखभाल करेल. देसायांचा वाडा पुढील कित्येक पिढ्या आमच्या पूर्वीच्या ऐश्वर्याची साक्ष देत इथे दिमाखात उभा असेल.’’

काकांचे बोलणे मला कळत होते पण वळत नव्हते. दोन्ही बाजूने दोन्ही गोष्टी खर्‍या होत्या. चुकत कोणीही नव्हते. फरक होता तो दोन पिढ्यांतील विचारसरणीतला. इंग्रजीत त्याला एक गोंडस नाव आहे- ‘जनरेशन गॅप!’
काकांच्या शेतातल्या गोठ्यात खिल्लार्‍या बैलांची एक छान जोडी होती. शेजारी एक बैलगाडी ठेवलेली. माझ्या मनात विचार आला, ही बैलगाडी काय कामाची? माझ्या मनातला विचार काकांनी कदाचित ओळखला असावा. ते म्हणाले, ‘‘गजाभाऊ, ही बैलजोडी मी कुणा गरजवंताला देणार आहे. माझ्या नातवंडांसाठी म्हणून मी घेतली होती. माझी नातवंडे शिक्षणाच्या गडबडीमुळे मागच्या दोन-चार वर्षांत गावी येऊ शकली नाहीत. ती आली की त्यांना मनसोक्त या बैलगाडीतून फिरवणार आणि नंतरच बैलं देऊन टाकणार. गाडी मात्र वाड्याच्या आवारात तशीच ठेवून देणार आठवण म्हणून.’’
थोडीशी उसंत घेत ते म्हणाले, ‘‘थोरली इंजिनिअरिंग करते (सध्या अमेरिकेत) तर धाकटा आय.आय.टी. प्रवेश परीक्षा देणार आहे. यंदा बारावीला आहे. चांगल्या मार्काने पास झाला की संपूर्ण गावात पेढे वाटेन बघ..!’’
आणि सांगितल्याप्रमाणे नातवाने पुढे चांगले मार्कस् काढले आणि कॉलेजमध्ये (खरगपूर) प्रवेशसुद्धा घेतला. काकांनी संपूर्ण गावात पेढे वाटले.

दोन वर्षांपूर्वी मी माझ्या काही मित्रांसमवेत कानोलीला गेलो होतो. काकांनी सांगितलं होतं, तुम्ही या. चांगला कोल्हापुरी पद्धतीचा गावठी कोंबडीचा बेत करूया. तांबडा-पांढरा रस्सा. त्याप्रमाणे आमची चांगली बडदास्तही ठेवली. संपूर्ण शेतीवाडी फिरवून दाखवली. उसाचे मळे, मक्याची कणसे, आणि काय आणि काय… वाड्याच्या आवारात एक जुनी ‘यझदी’ मोटरबाईक ठेवलेली होती. मी काकांना विचारलं, ‘‘काका, ही तीच का हो जुनी मोटरसायकल?’’
माझ्या प्रश्नाने काकांचे डोळे भरून आले. दाटल्या कंठाने ते म्हणाले, ‘‘गजाभाऊ, काही वस्तूंबरोबर काही आठवणीही जिवंत असतात. माझ्या संजाला ही गाडी खूप आवडायची. तो मला परत परत सांगायचा, बाबा ही गाडी आपण कायम ठेवायची. त्याची इच्छा म्हणून मी ही गाडी इथेच ठेवली आहे. हल्लीपर्यंत ती सुरू व्हायची. या गाडीवरून मी खूप फिरलोय. चारचाकी मला चालवता येत नाही. या गाडीवरून मी महाराष्ट्रभर फिरलो आहे.’’
मध्येच थांबून काही आठवल्यासारखे करून ते म्हणाले, ‘‘अरे हो गजाभाऊ, तू लिखाण करतोयस, तुझी पुस्तकंसुद्धा निघाली असं ऐकलं होतं. इथेच गावात मी एक छोटीशी लायब्ररी सुरू केली आहे. चांगली हजारभर पुस्तके आहेत. तुझी पुस्तके पाठवून दे.’’
माझ्या मनाला एक प्रश्न पडला. वयाची ऐंशी पार केलेला हा हिंदुस्थानचा माजी सैनिक किती उमेदीनं हे सगळे व्याप सांभाळतोय!
आम्हा मित्रांना या गोष्टीचं अजब वाटलं. हा सर्व व्याप सांभाळणे एवढे सोपे नाही. पण या बुजुर्गाकडे अशी कोणती शक्ती, कसली प्रेरणा आहे की हा माणूस हे सर्व व्याप करतोय? साधे एखादे घर बांधावे तर माणूस कोलमडून पडतो. यांनी तर इथे भव्य राजांगणी वाडाच बांधला. कसली शक्ती?
बर्‍याच वेळा आम्ही म्हणतो, दूर तिकडे सीमेवर आमचे जवान डोळ्यात तेल घालून आमच्या सीमेचे रक्षण करतात म्हणूनच आम्ही रात्री शांतपणे झोपू शकतो. सैनिक हा सहज घडत नसतो. शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमतेचीही जडणघडण सैन्यामध्ये घडत असते, हे कॅप्टन काकांकडे पाहिल्यावर लक्षात आल्याशिवाय राहत नाही.

माझ्या ‘नियोग’ कथासंग्रहाला आजर्‍याच्या गंगामाई ग्रंथालयाचा पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या कार्यक्रमाला काका आवर्जून आले होते.
मागे एकदा फोनवर बोलताना त्यांनी सहज मला विचारले, ‘‘गजाभाऊ, माझ्या मनात ‘डस्टर’ गाडी घ्यायचा विचार आहे, तुझं काय म्हणणं?’’
मी म्हटलं, ‘‘ठीक आहे काका, मनात आलंय ना, मग घेऊन टाका.’’
‘‘पण तुझा मित्र म्हणतोय मोठी गाडी कशाला घेताय? छोटीशी घ्या. तुम्ही काही जास्त वापरणार पण नाही.’’
मी चेष्टेने म्हणालो, ‘‘काका त्याला म्हणावं, असल्या छोट्या छोट्या गाड्या तुम्ही सिव्हिलियनांनी वापरायच्या. आम्हा डिफेन्सवाल्यांना दणकट गाड्या पाहिजेत. उंचे लोग उंची पसंद!’’
माझं बोलणं ऐकल्यावर काका माडभर हसले. म्हणाले, ‘‘व्वा…! गजाभाऊ आवडलं आपल्याला…!’’
डिफेन्समध्ये करिअर करायची माझी खूप इच्छा होती. नेव्हीमध्ये जायची मी तयारीसुद्धा केली होती. पण काही कारणांमुळे ती इच्छा अपुरीच राहिली. हा सल मला आयुष्यभर कायम सलत राहील. खरंच, डिफेन्सवाल्यांची ऐटच भारी…!