कूलभूषण जाधवप्रकरणी आज निकाल

0
104

>> भारताने मांडली प्रभावी बाजू, पाकने आरोप फेटाळले

भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) भारत आणि पाकिस्तानची बाजू मांडण्यात आली. त्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालय आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता आपला निकाल देणार आहे. या प्रकरणी भारताने दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांची बाजू न्यायालयाने १५ मे रोजी ऐकून घेतली होती. दरम्यान, आयसीजे निकाल देण्यापूर्वीच पाकिस्तान जाधव यांना फाशी देण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली दोषी ठरवून पाकिस्तानातील न्यायालयाने त्यांना ङ्गाशीची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान दिले असून याप्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यात आले आहे. दोन्ही देशाच्या वकिलांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रत्येकी ९० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. भारताने प्रथम बाजू मांडल्यानंतर भारताचे सर्व आरोप पाकिस्ताने फेटाळले होते. मात्र त्यावेळी त्यांना मोठी कसरत करावी लागली होती. त्यामुळे पाकची बाजू आणखीच लंगडी ठरली असून त्यांची या प्रकरणी नाचक्की झाली आहे. भारतातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
भारताची बाजू
भारताने प्रथम आपली बाजू मांडताना यावेळी जाधव यांना इराणमधून पाकिस्तानात पळवून आणून खटला चालविला असे सांगून जाधव विरोधात सुनावणीसाठी त्यांना वकील न दिला नाही. त्यामुळे हा न्यायप्रक्रियेचा अनादरच असल्याचे म्हटले. व्हिएन्ना कराराचा पाककडून भंग झाल्याचा आरोप करत जाधव यांच्याकडून संपर्काचा अधिकारही पाकने हिरावून घेतल्याचे स्पष्ट केले. तसेच जाधव यांना वकील देण्याची मागणीही पाकने फेटाळली. तसेच जाधव हे तुरुंगात असताना त्यांचा अतोनात छळ करून जबरदस्तीने त्यांच्याकडून कबुली जबाब लिहून घेतला. तसेच जाधव कुटुंबीयांनी केलेला व्हिसाचा अर्ज पाककडे अद्याप प्रलंबित असल्याचेही भारताने निदर्शनास आणून दिले.
पाकचे जुनेच मुद्दे
या सुनावणीत भारताचे साळवे यांनी प्रभावीपणे आपली बाजू मांडली. त्यानंतर पाकिस्तानने भारताचे आरोप फेटाळले. मात्र त्यांना दिलेल्या ९० मिनिटांच्या अवधीचाही पाकला संपूर्ण वापर करता आला नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात आणण्याची गरज नव्हती असे पाकने यावेळी सांगितले. मात्र त्यांना कोणताच मुद्दा प्रभावीपणे व ठामपणे मांडता आला नाही. इथेच त्यांचे अपयश उठून दिसले. तसेच दहशतवादाला थारा देणार नाही आणि भारत देशाकडून होणारा त्रास हेच मुद्दे त्यांनी पुन्हा उगाळल्याचे दिसून आले. भारताचे सर्व आरोप चुकीचे असल्याचे पाकने पुन्हा एकदा सांगितले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाल्याचे सांगून निकालासाठी आजची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आज गुरुवारी भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० च्या सुमारास निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.