Home Featured कुडणे येथे 55 वर्षीय महिलेचा खून

कुडणे येथे 55 वर्षीय महिलेचा खून

0

साखळी मतदारसंघातील चिकणे-कुडणे या गावात राहणाऱ्या एका महिलेचा एका युवकाने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना काल घडली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेनंतर सदर युवकाने त्या मृत महिलेचाच मोबाईल घेऊन पळ काढला. संशयित सागर राऊळ या (रा. सावंतवाडी) याचा पोलीस शोध घेत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, शैला संजय घाडी (वय 55) ही महिला आपल्या तीन मुलांसह चिकणे कुडणे येथे राहत होती. या महिलेला दोन मोठ्या मुली व लहान मुलगा असून, सागर राऊळ हा त्यांच्या परिचयाचा होता. तसेच सदर युवक व घरातील मंडळी यांच्याबरोबर त्याचा नियमित वाद व भांडणही सुरू होते. सागर राऊळ याने काही दिवसांपूर्वी घाडी यांचे घर व आतील सामानाची नासधूस केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात डिचोली पोलीस स्थानकात तक्रारही नोंद करण्यात आली होती.

काल दुपारी सागर राऊळ हा शैला घाडी यांच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीही नव्हते. यावेळी त्या दोघांमध्ये वाद व भांडण झाला. याच भांडणावेळी सागर याने शैला घाडी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके भिंतीवर आपटले. त्या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या कृत्यानंतर सागर राऊळ याने सदर महिलेचा मोबाईल घेऊन घटनास्थळावरून पळ काढला आणि त्याच मोबाईलवरून तिच्या मुलींना फोन करून आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच डिचोली पोलीस उपअधीक्षक श्रीदेवी बी. व्ही., पोलीस निरीक्षक विजय राणे, उपनिरीक्षक आकाश परवार, महिला उपनिरीक्षक अर्चना शर्मा व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर प्रकरण पोलिसांनी खून म्हणून नोंद केले असून, घटनास्थळी फॉरेन्सिक पथक व श्वान पथकही दाखल झाले होते. या दोन्ही पथकांकडून या प्रकरणी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करण्यात आले.

खूनानंतर सागर राऊळ याने हा मृत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळीही घेऊन पळाल्याचेही अधिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी फरार संशयिताचा पोलीस कसून शोध घेत आहेत.