‘कावेरी’वरून कर्नाटक, तामिळनाडूत हिंसाचार

0
98

 

>> तामिळनाडूच्या ४० बसेस जाळल्या
>> तामिळनाडूतही कन्नडिगांच्या मालमत्तांचे नुकसान

कावेरी पाणी वाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या ताज्या निवाडाच्या पार्श्‍वभूमीवर काल कर्नाटक व तामिळनाडू या दोन्ही राज्यांमध्ये हिंसाचाराचा भडका उडाला. पाणी प्रश्‍नावरील या प्रचंड हिंसाचाराच्या उद्रेकामुळे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैया यांनी कर्नाटकातील तामिळींच्या सुरक्षिततेची ग्वाही देत असतानाच तामिळनाडूमधील कन्नडिंगाना सुरक्षा देण्याची मागणी तामिळ सरकारकडे केली आहे. तामिळनाडूच्या तब्बल ४० बसगाड्या निदर्शकांनी जाळून टाकल्या. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर बंगळुरूत १५ हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
कर्नाटकात निदर्शकांनी तामिळनाडू नोंदणी असलेल्या वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड तसेच आगीही लावल्या. बंगळुरू, मंड्या, म्हैसूर, चित्रदुर्ग, धारवाड जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार माजवला. या भागांमधील तामिळींच्या मालमत्तेची तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. दरम्यान, कर्नाटकचे पोलीस महासंचालक ओम प्रकाश यांनी राज्यात स्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले.
तामिळनाडूत कन्नडिग लक्ष्य
तामिळनाडूतील रामेश्‍वरम मंदिरानजीक उभी करून ठेवलेल्या कर्नाटक नोंदणीच्या सात पर्यटक वाहनांची तेथील आंदोलकांनी नासधूस केली. चेन्नईत कानडी व्यक्तीच्या मालकीच्या हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली. कावेरी पाणी प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी दिलेल्या निवाड्यात कर्नाटकाने तामिळनाडूला १० दिवस दररोज १५ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिले होते. त्यात बदल करून काल कर्नाटकने तामिळनाडूला कावेरीचे दररोज १२ हजार क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश दिले. या निवाड्यानंतर कर्नाटकात हिंसाचार माजला.
सुरक्षा व्यवस्थेत वाढ
कर्नाटक प्रशासनाने राज्य राखीव पोलीस, शहर सशस्त्र राखीव पोलीस, शीघ्र कृती दल, शीघ्र प्रतिक्रिया पथके, विशेष सुरक्षा दल, सीआयएसएफ, इंडो-तिबेटन पोलीस दल तसेच गृह रक्षक दलाचे तीन हजार जवान मिळून १५ हजारहून अधिक जवानांना तैनात केले आहे.
सिध्दरामैयांनी बोलावली मंत्रिमंडळ बैठक
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामैया यांनी आपल्या मंत्रिमंडळाची तातडीची बैठक आज बोलावली आहे. कालच्या हिंसाचाराचे प्रमुख केंद्र ठरले ते मंड्या जिल्हा या ठिकाणी दोन ट्रक जाळून टाकण्यात आले. तसेच बंगळूर-म्हैसूर महामार्ग बंद करण्यात आला. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीमारही केला. याच ठिकाणी तामिळनाडू नोंदणीच्या अनेक वाहनांचे नुकसान करण्यात आले. म्हैसूर, चित्रदुर्ग व धारवाड या जिल्ह्यांमध्येही अशाच घटना घडल्या.
कर्नाटकात तामिळींना सुरक्षा
कर्नाटकचे गृहमंत्री परमेश्‍वरन यांनी पत्रकारांना सांगितले की बंगळूर व राज्याच्या अन्य भागांत जेथे तामिळी नागरिकांची वस्ती आहे तेथे योग्य प्रमाणात पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. कावेरी रयतरा हितरक्षण समिती ही संघटना या प्रश्‍नी कर्नाटकातील आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. त्यांच्यासह अन्य विविध संघटनांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, धरणे, मोर्चा यांचे आयोजन केले.

कर्नाटकाच्या याचिकेवर
न्यायालयाकडून तीव्र नाराजी
या प्रश्‍नावर कर्नाटकने काल एक तातडीची याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावरील सुनावणीवेळी न्या. दीपक मिश्रा व न्या. यू. यू. ललित यांच्या खंडपीठाने सदर याचिकेत कर्नाटकने जो सूर लावला त्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाच्या पूर्ततेसंदर्भात गृहीत धरले जाऊ शकत नसल्याची टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली.