काळसर्प

0
120
  • प्रा. जयप्रभू कांबळे

काळाचा अवकाश कुठल्या कुठं बदलत गेलेला. काळाच्या चिंतनातून स्वत:ला तो लेफ्ट करून घेतो. आपल्याला असे म्हणता येईल की काळाच्या चिंतनातून तो लेफ्टाळतो.

आपण जगलो त्या काळाची गोष्ट झालेली. तो काळ आता आपल्याला कुठेच सापडत नाही किंवा तो आपण शोधत बसत नाही. आपण जे जगलो, ते जगणे या काळात औषधालाही सापडत नाही, असे पुटपुटत तो स्वत:ला सावरतो खरा; पण काळाच्या या विळख्यातून बाहेर पडणे शक्य आहे का, याचे उत्तर त्याला देता येत नाही. आपण काळाबरोबर बदललो नाही तर जगता येईल का, या प्रश्‍नाने त्याला काहीवेळा बधीर करून टाकलेले. आपण ज्याला गाव म्हणतो, ते गाव गाव राहिले आहे का, हा त्याला नेहमी पडणारा प्रश्‍न. त्याचे पोरकेपण अधिक गडद करणारा. त्याला जाणवतं, अगदी गावाच्या प्रवेशद्वाराजवळच पोल्ट्री फॉर्म. कोंबड्यांचे भरमसाठ पीक गावाच्या बाहेर या पोल्ट्री फॉर्ममधून घेतले जाते. असे अनेक पोल्ट्री फॉर्म उभे आहेत. त्याच्या वासाने संपूर्ण गावाला विळखा घातलेला. गाव एक पोल्ट्री फॉर्म. गावचिंतन चालू असताना त्याला आठवते केशव सखाराम देशमुखांच्या ‘अंधारून आलं आहे सारं’ या कवितेतील दोन एकर रान विकून मोबाईलच्या टपरीचे दुकान घालणारा ‘वसंत’. खंडीभर शेळ्या विकून रेडिओ रिपेअरिंंगचं दुकान चालवणारा ‘सत्या’, भेसळतेल घालून ढाबा चालवणारा ‘पुजारामचा यशवंत’. केशव सखाराम देशमुखांची ही कविता त्याला त्याच्या काळाचा झेरॉक्स वाटते. त्याला या कवीबद्दल आणि त्याच्या कवितेबद्दल प्रचंड आकर्षण. गावगाडा समजून घेऊन या काळात कविता लिहिणारा खमक्या कवी अशीच प्रतिमा त्याच्या मनात घर करून उभी असलेली.

पावसाळा सुरू व्हायला अजून एक आठवडा असल्याचा हवामान अंदाज तो मनात साठवत कुठल्यातरी कॉर्नरवर उभा असतो. सकाळच्या वेळेला मुलांचे थवे वेगवेगळ्या रंगातल्या कपड्यात उभे असतात. प्रत्येकाची बॅग, बाटली, आणि कुणा एखाद्याच्या कानात असलेल्या वायरी. त्याला नकळत आठवते, त्याचे गोणपाट, तंदूसची पिशवी, भैरीच्या मंदिरातली शाळा आणि बरच काही. बालपणीच्या आठवणींचा मोर त्याच्या मनात नाचत असतो. पण कॉलची टोन त्याला गावात, त्याच्या घरात घेऊन जाते. त्याला गावाकडून कॉल येतो. रिचार्ज संपल्यांचा पलीकडचा आवाज. शहरातून तो मारण्यासाठी केलेली विनवणी. तेव्हा त्याला आठवते कॉईनबॉक्सवर रांगा लावून उभे असलेली माणसे. तेव्हा त्याला आठवतात, ‘‘सुंगधा, आई, दादाचा फोन आलाय, लवकर’’, म्हणत ऊर धपापत चालणार्‍या गावाकडच्या पोरांचे श्‍वास…. त्याला आठवते वेगवेगळ्या कार्डांवरचे कित्येक अंकी नंबर.. आणि तो सहजपणे घरातल्या घरात बसून पेटीएम, गुगलपे सहजपणे वापरून मोबाईलचा भरणा भरणारे हात… काळाचा अवकाश कुठल्या कुठं बदलत गेलेला. काळाच्या चिंतनातून स्वत:ला तो लेफ्ट करून घेतो. आपल्याला असे म्हणता येईल की काळाच्या चिंतनातून तो लेफ्टाळतो.

तो राहतो, त्या चाळीत एक मुलगी आहे, पाच वर्षांची. तिला पुस्तक आवडते. गोष्टी आवडतात. पण पुस्तकातल्या गोष्टींपेक्षा युट्यूबवरच्या गोष्टी तिला अधिक आवडतात. पुस्तकातल्या गोष्टींपेक्षा यूट्यूबवरील गोष्ट तिला अधिक जिवंत वाटते. स्क्रिनवरील पात्रे तिला ती गोष्ट अधिक सोपी करून सांगत असतात. ती ज्या काळात जगते, त्या काळात तिला पुस्तकांपेक्षा स्क्रिन महत्त्वाची वाटते. ती काळाच्या पुढे आहे किंवा तिच्या काळाशी एकरूप. पण येता-जाता तो तिला पुस्तकांतल्या गोष्टींची आठवण करून द्यायचा. दूरवर असणार्‍या लायब्ररीतून पुस्तके आणण्यासाठी तिच्या वडिलांना सांगायचा. पण एक दिवस तो स्वत:च स्वत:ला म्हणाला, ‘‘आपण तिला पुस्तकातील गोष्ट वाचण्याचा आग्रह का करावा? आपण परंपरावादी नाही का? होय परंपरावादीच! तिचा काळ समजून न घेता तिला आपल्या काळाबरोबर चालायला लावणारे. ऐन बालपणात तिला प्रौढ करणारे, आपले विचार तिच्यावर लादणारे. निव्वळ परंपरावादी!’’

तो ज्या भाषेत शिकला, त्या भाषेत ती शिकत नाही. त्यामुळे तिचा अभ्यास कसा घ्यावा हा त्याच्यासमोरचा यक्षप्रश्‍न. ती जे काही विचारते, त्यातील कोणत्याच प्रश्‍नांची उत्तरे त्याच्याकडेे नसतात. पण ती त्यावरही उपाय शोधते. गुगलवरच्या माईकवर ती कवितेचे नाव मोठ्याने म्हणते, तर तिच्यासमोर कविता सादर करणारे अनेक शिक्षक व्हिडिओच्या रूपात रांगेत उभे असलेले दिसतात. त्यातील एका व्हिडियोवर ती क्लिक करते. तालासुरात कविता शिकते. तिला अवघड वाटणारी भाषा ती सोपी करून घेते. तो म्हणाला, ‘‘आपण ज्यावेळी शाळेत गेलो, तेव्हा आपल्या आई-बापाला तरी कुठे येत होती आपल्या पुस्तकातील भाषा. तरीपण आपण शिकलोच’’
त्याचं आणि तिचं बरं असतं असं म्हणण्याला वाव आहे. पण ते बरंच असतं असं काही त्याला नीट स्वत:ला सांगता येईना. ती प्रेमळ आहे. सर्वांची काळजी घेते. आई-बापाला जपते. या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. पण एका गोष्टीवर त्याला तिच्या बाजूने राहता येईना. ती म्हणजे कोणत्या वेळेला कोणती गोष्ट करावी याचे भान तिला नाही. त्याला तिला दुखवता येत नाही आणि काही सांगता येत नाही. काही सांगायला जावे तर ती म्हणते, ‘‘स्वत:कडे बघा’’ या तिच्या एकाच वाक्याने त्याची विकेट गेलेली असते. पण स्क्रिन आणि तिचा मोह माणसांमध्ये विसंवाद निर्माण करतो, हे कुणीतरी तिला सांगायला हवं. आपण कसं सांगायचं तिला? आपलं ऐकेल का ती? यांसारखे काही प्रश्‍न त्याच्यासमोर आले खरे. पण त्यांना उभे राहता येईना. उगाच वाद नको म्हणून स्क्रिनविषयी तिचे समूपदेशन कसे करावे याचा मार्ग तो शोधू लागला. तो म्हणाला – काय साला जिंदगी आहे, इथं कुणालाच काही सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या हातात फोरजी थ्रीजी आहे. त्यावर मिळालेले ज्ञान हेच अंतिम ज्ञान समजून जो… तो… जगतो आहे. आपण नेमके कुणाच्या बाजूने उभे राहू शकतो? स्क्रिनचा आधार घेऊन शिकणार्‍या मुलीच्या बाजूने की स्क्रिन हेच सत्य मानणार्‍या माणसांच्या बाजूने..?