कार्निव्हल, शिगमोत्सव, शिवजयंतीचा कार्यक्रम जाहीर

0
10

गोवा पर्यटन खात्याने काल कार्निव्हल, शिगमोत्सव आणि शिवजयंती महोत्सवासाठीचा कार्यक्रम जाहीर केला. राज्यात 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी ह्या दरम्यान कार्निव्हलचे आयोजन करण्यात येणार आहे. शिगमोत्सव 26 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत साजरा केला जाईल, तर शिवजयंती सोहळा 16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

कार्निव्हल मिरवणूक 5 ठिकाणी होणार असून, 9 फेब्रुवारी रोजी पर्वरी येथून सुरुवात होईल. 10 रोजी पणजी, 11 रोजी मडगाव, 12 रोजी वास्को आणि 13 रोजी म्हापसा येथे कार्निव्हल मिरवणूक होईल, असे पर्यटनमंत्र्यांनी सांगितले. शिवजयंतीनिमित्त मुख्य कार्यक्रम हा डिचोली येथे होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा मुख्य सोहळा 19 फेब्रुवारी रोजी डिचोली येथे होईल. मात्र तत्पूर्वी, 16 ते 19 फेब्रुवारी रोजी पणजी, मडगाव, म्हापसा, मुरगाव, फोंडा आणि साखळी अशा 6 ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम होईल. त्यासाठी सरकार संबंधित नगरपालिकांना 5 लाख रुपयांचे एकरकमी अनुदान देईल. ते अनुदान शिवजयंती साजरी करण्यासाठी असेल. शिगमोत्सव यंदा 18 ठिकाणी होणार असून, त्याची सुरुवात 26 मार्चपासून होईल. तो 8 एप्रिलपर्यंत चालेल. शिगमोत्सवाचा प्रमुख सोहळा हा 26 मार्च रोजी फोंडा येथे होणार आहे. तद्नंतर म्हापसा, पणजी, मडगाव व वास्को येथे शिगमोत्सव चित्ररथ मिरवणूक होणार आहे.
हे महोत्सव चालू असताना लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाली, तर त्याचे पालन आयोजकांना करावे लागेल, असे पर्यटनमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.