कार्निव्हल येतोय… सावधान!

0
25
  • – डॉ. राजेंद्र साखरदांडे

शेवटी कार्निव्हल आला… त्यांत फ्लोट असणार… शेकडो नाचणारे, गाणारे लोक असतील… ते मास्क बांधणार का? सामाजिक अंतर पाळतील का?
जनतेने ह्यात भाग घेऊ नये. कार्निव्हल याच वर्षी बघायला हवाय असेही नाही. गेलात तर मास्क वापरा.

कार्निव्हल आलाय… बरोबर किंग मोमोला पण घेऊन आलाय… खा- प्या- मजा करा…ही घोषणा तो देणार… नेहमीप्रमाणे.. तो त्याचा हक्कच आहे.. तोकड्या, अपुर्‍या वेषात नाचत, बेधुंद उड्या मारत! युरोपीय देशाचा हा सण गोव्यात पोर्तुगिजांनी आणला व मग तोही गोव्याच्या संस्कृतीचा एक भाग झाला. हा सण प्रजासत्ताक दिनी गोव्याच्या नावावर नाचवला जाऊ लागला.

कोविडच्या भयानक आपत्तीमध्ये कार्निव्हल राज्य सरकारतर्फे साजरा होतोय हे सुदैव का दुर्दैव हे सांगता येत नाही. निवडणुका जाहीर झाल्या. सरकार दरबारी फतवे काढले गेले. जाहीर सभांना हजार लोक, लग्नाला शंभर लोक, मरणाला वीस लोक… फतव्याचे पालन करणारे गायब. कायदे, कानून जनतेच्या भल्याकरता करतात याकडे सोईस्करपणे डोळेझाक करताहेत. गांधारीने डोळ्यांवर बांधलेली पट्टी सरकारने आपल्या डोळ्यांवर ओढून घेतली आहे.

कोरोना काळात अशा प्रकारची कार्निव्हलची गर्दी ही जनतेच्या मरणाची घंटा आहे यात तिळमात्र संशय नाही. प्रचंड प्रमाणात कोविड जनसामान्यांत पसरत चाललाय. लोकांचा आज कुणीही वाली राहिलेला नाही. सरकारने जनतेला उघड्यावर सोडून दिलेय.
निवडणूक जवळ आहे. आश्‍वासनांची खैरात चालू आहे. जत्रांचा मौसम आहे. कुणावरही बंधन नाही. खा, प्या, मजा करा- ही घोषणा सरकारने किंग मोमोअगोदरच स्वतः केली आहे. गोव्याबाहेरील राज्यातील ‘खा, प्या, मजा करा’वाले गोव्याच्या वेशी तुडवून आत शिरत आहेत. गोव्यात डिसेंबर- जानेवारीत तर तोबा गर्दी. कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही.

कोविडची आकडेवारी जगात प्रचंड वाढलेली आहे. भारतात हजारो- लाखो देशी-परदेशी पर्यटक दाखल होत आहेत. सरकार कुणालाही आडकाठी करत नाही. कारण कोविडने सगळ्यांचे धंदे बुडवले – पर्यटन एकदम थंडच, बेरोजगारी, बंद कंपन्या, बाजार बुडीत खात्यांत… प्रत्येक नागरिकाचे खिसे रिकामे. या सगळ्या काथ्याकुट्यात संकटाला सामोरे जाण्याशिवाय सरकारकडे आणखी काही राहिलेले नाही. तेव्हा अर्थकारणाचे सर्व मार्ग खुले करण्यात आले. ‘खा-प्या-मजा करा’चे संदेश सगळीकडे पाठवण्यात आले. असो.

जगात व भारतात कोविड प्रचंड प्रमाणात पसरला आहे. सरकारी आकडेवारी दर दिवशी प्रसिद्ध होते आहे. त्यावर कुणीही लक्ष देत नाही व वाचतही नाही. त्यावर चर्चा न करणे योग्य. भारतात दररोज दीड-दोन लाख कोविडचे रुग्ण सापडतात. पण मागच्याप्रमाणे हा कोविड व्हायरस घातक नाही. कोविडचे रुग्ण जरी वाढले तरी दवाखान्यात भरती होण्याचे प्रमाण फारच कमी आहे. त्यात ऑक्सिजनची गरज असणार्‍यांची संख्या तर न्यूनतम पातळीवर. मरणार्‍यांची संख्या तर लक्षात घेण्याजोगी नाहीच.

पण जनतेने मरावे का?.. कुणी एखादा दगावणे हेही योग्य नाही. आज कोविडविषयी जनता बिनधास्त आहे. जगात तर युरोपियन आणि इतर देशांनी फतवाच काढला आहे की जनतेला आता कोविडला बरोबर घेऊनच जगावे लागेल. त्या देशांत सगळे खुले करण्यात आले आहे.
भारतात जो लेखाजोखा अहवाल तयार येतोय, त्यात असे दिसून येते की…

  • ज्यांनी लसीकरण करून घेतले नाही त्यांच्यात मरणार्‍यांची संख्या भारी आहे.
  • ज्यांनी कोविडच्या लसी घेतल्या नाहीत व बुस्टर डोजही घेतला नाही त्यांच्यामध्येही मरणार्‍यांचे प्रमाण जास्त आहे.
  • ज्यांना उच्चरक्तदाब, मधुमेह, हृदयरोग इत्यादी आजार आहेत, त्यांच्यामध्ये मरणार्‍यांचे प्रमाण फार आहे.
    हेच सत्य आहे… ते जनतेच्या मनात रुजवायला भारत सरकार व इतर राज्यसरकारे कमी पडताहेत असेच दिसून येते.
    लोक बिनधास्तपणे स्वैररित्या फिरत आहेत. जत्रांना व इतर सणांना होणारी प्रचंड गर्दी- हेच कारण आहे कोविडचा उद्रेक होण्याचे. जनता जाणून आहे की त्यांच्या प्रत्येकाच्या घरात कोविड अगोदरच शिरलाय.
    मार्केटमध्ये कोविडचे किट्‌‌ विकत मिळते. ज्यांना परवडते, ते घरात ताप आल्यावर ती किट् घेऊन येतात व आपण स्वतः टेस्ट करतात किंवा खाजगी प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करून घेतात. व जर कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली तर ते स्वतःला घरात बंदिस्त (होम क्वारंटाइन) करून घेतात. सरकार दरबारी अशा रुग्णांची नोंदच होत नाही. तेव्हा आकडेवारीत भर पडण्याची सोयच राहिली नाही. मग सरकार खूश व जनताही खूश. ऑल इज वेल.. म्हणत प्रत्येकाने स्वतःच्या छातीवर हात मारत इडियट व्हावे.

मूळ मुद्दा तो काय?…
कोविड गोव्यातील प्रत्येक घरात शिरलाय. प्रत्येक तापाने फडफडणारा रुग्ण खात्रीपूर्वक कोविडचा रुग्ण आहे. जास्त लोकांना फ्लूसारखा ताप येतो. अंगात कसकस, डोकेदुखी… थोडा खोकला वगैरे.. धडधाकट लोकांना तर त्याची पर्वा नाही. थोडे किट् वापरतात. कोविड झालाय का याचा शोध घेतात. राहिलेले चुप्पी साधून काहीच करत नाहीत. कोविड पॉझिटिव्ह झाला तर घरी वेगळे राहणे (घरी सोय असली तर), ताप आला तरीही वेगळेच राहणे… लक्षणे नेहमीचीच. ताप आलेल्यांना कंपनी कामावर घेत नाही. कामावर जाताना डॉक्टरी दाखल्याची गरज लागते.
शेवटी कार्निव्हल आला… त्यांत फ्लोट असणार… शेकडो नाचणारे, गाणारे लोक असतील… ते मास्क बांधणार का? सामाजिक अंतर पाळतील का?
जनतेने ह्यात भाग घेऊ नये. कार्निव्हल याच वर्षी बघायला हवाय असेही नाही. गेलात तर मास्क वापरा. गर्दीत जाऊ नये… पोराबाळांना तर घेऊन जाऊच नका. वडीलधारे, आजारी लोक ज्या घरात असतील त्यांनी जाऊ नये… ज्यांना वेगवेगळे आजार आहेत त्यांनी तर कार्निव्हल बघायला जाऊ नये.

सॅनिटायझर वापरावा. घरी गेल्यावर सरळ बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करावी. प्रत्येकाने स्वतःची, आपल्या मुलाबाळांची, आपल्या वडीलधार्‍या माणसांची काळजी घ्यावी. कारण सर्वकाही ठीक आहे असा विचार मनात येऊ देऊ नका. केव्हाही काहीही घडू शकतं हे लक्षात ठेवा. स्वतःला सांभाळा व तुमच्या आजूबाजूला राहणार्‍यांची, तुमच्या संपर्कात येणार्‍यांची काळजी घ्या.

कार्निव्हलमध्ये भाग घेणार्‍यांवर लक्ष कोण देणार? त्यावर दिशादर्शक फतवा काढणे व त्याचे पालन करणे सरकारचे प्रथम कर्तव्य आहे.
कोविडचा कोणता व्हायरस सध्या गोव्यात धुडगूस घालतोय यावर सरकार कोणतीच आकडेवारी घोषित करत नाही. तोवर आपण तो कोविडचाच एक व्हायरस आहे असेच समजतो व तो घातक नाही यावर दुमत नाही. तरीही लोकांना बाधा होते. दररोज ८-१० कोविडचे रुग्ण दगावतात हेच खरे.
लोकहो स्वतःची काळजी घ्या. कार्निव्हलची मजा घरीच लुटा. जगाल तर पुढचा कार्निव्हल आम्ही किंग मोमोच्या राज्यात साजरा करू!