लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य हवे

0
5

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन; एनडीएच्या बैठकीत रणनीतीवर विचारविनिमय

भारतीय जनता पक्ष हा राष्ट्र बलशाली बनविण्याला प्राधान्य देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. भाजप हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, तर काँग्रेस जातीय राजकारण करीत आहे. लोकसभा निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय मुद्द्यांना प्राधान्य देण्याची गरज आहे. राष्ट्राला आणखी बलशाली बनविण्यासाठी मतदारांनी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एनडीएच्या बैठकीनंतर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत येथे काल केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एनडीएच्या बैठकीत लोकसभा निवडणूक रणनीतीवर विचारविनिमय करण्यात आला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मगोचे ज्येष्ठ नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कृषी मंत्री रवी नाईक, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, मगोचे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार आन्तोन वाझ, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी खासदार विनय तेंडुलकर व इतरांची उपस्थिती होती.

गोव्याला विशेष दर्जापेक्षा जास्त चांगली वागणूक केंद्र सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे साधनसुविधांमध्ये वाढ करणे शक्य झाले आहे. गोव्याला विकासासाठी यापुढे भरीव मदत करण्याची ग्वाही केंद्र सरकारने दिली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेसचा जाहीरनामा पूर्णपणे ‘जातीयवादी’ आहे. कोकणी ही आमची अधिकृत भाषा आहे. राज्यात मराठीचा वापर केला जाऊ शकतो. मराठीला सहभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. काँग्रेसच्या काळात हा निर्णय घेण्यात आला होता, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी काँग्रेसचे उत्तर गोव्यातील उमेदवार रमाकांत खलप यांना महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुन्हा एकदा फटकारले. खलप यांनी महिला आरक्षण विधेयक मांडले असेल, तर त्याचा पाठपुरावा करून ते मंजूर का केले नाही? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.

राज्यातील खाण व्यवसाय बंद होण्यास काँग्रेस पक्ष जबाबदार आहे, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मागील कार्यकाळात त्यांनीच सुरू केलेले मुद्दे मांडल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय निश्चित आहे. उत्तर गोवा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक हे एक लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होतील, तर दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो ह्या सुमारे 40 हजारांच्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा ढवळीकर यांनी केला.