कारवाईबाबत लष्कराने केलेले निवेदन

0
90

जम्मू व काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत आणि वाढती घुसखोरी होत असे व ती गंभीर बाब बनली होती. ११ व १८ सप्टेंबर रोजी अनुक्रमे पूँछ व उरीमध्ये दहशतवादी हल्ले झाले. भारतीय लष्कराने यावर्षी घुसखोरीचे जवळजवळ वीस प्रयत्न सफलरीत्या हाणून पाडले आहेत. या दहशतवादी हल्ल्यांवेळी आणि घुसखोरीच्या प्रयत्नांवेळी आम्ही पाकिस्तानी चिन्हे असलेली जीपीएस उपकरणे व सामान हस्तगत केलेले आहे जे त्यांचे मूळ पाकिस्तानात असल्याचे स्पष्टपणे सूचित करतात. इतकेच नव्हे, तर पकडले गेलेले दहशतवादी पाकिस्तानी वा पाकव्याप्त काश्मीरमधील असून त्यांनी पाकिस्तान वा पाकव्याप्त प्रदेशात आपल्याला दहशतवादी प्रशिक्षण दिले गेल्याची कबुली दिली आहे. ही बाब वरिष्ठ राजनैतिक पातळीवर आणि लष्करी माध्यमातून संबंधितांच्या नजरेस आणून देण्यात आली. पकडल्या गेलेल्या या दहशतवाद्यांची पडताळणी करण्याची संधीही पाकिस्तानी दूतांना देण्यात आली. पूँछ व उरीमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचे बोटांचे ठसे आणि डीएनए नमुनेही पुढील तपासासाठी पाकिस्तानच्या हवाली करण्याची तयारी दर्शवली गेली. मात्र, आमच्या सततच्या विनंतीनंतरही पाकिस्तानने आपल्या जानेवारी २००४ मध्ये व्यक्त केलेल्या आपल्या भूमीचा वापर भारतविरोधी दहशतवादासाठी न करू देण्याच्या वचनाचा आदर राखला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया थांबलेल्या नाहीत. त्यात कमी हानी झाली असेल तर त्याचे श्रेय आमच्या बहुस्तरीय घुसखोरीविरोधी सुरक्षा यंत्रणेतील सैनिकांना जाते, जे घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांना रोखण्यात यशस्वी ठरले आहेत. या सततच्या धोक्याबाबत भारतीय हवाई दलही अत्यंत जागरूक आहे.

काही दहशतवादी गट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याच्या व दहशतवादी हल्ले चढवण्याच्या तयारीत असल्याच्या निश्‍चित गुप्तचर माहितीच्या आधारे ही घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या अड्‌ड्यांवर थेट हल्ले चढवले. घातपाताची संधी त्यांना लाभू नये व आमच्या नागरिकांच्या जिवाला धोका पोहोचू नये यासाठीच ही कारवाई केली गेली.
या कारवाईच्या वेळी दहशतवाद्यांची आणि त्यांना पाठबळ देणार्‍यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून दहशतवाद्यांविरुद्धची ही कारवाई आता थांबवण्यात येत आहे. ही कारवाई पुढे सुरू ठेवण्याचा आमचा विचार नाही, परंतु भारतीय सुरक्षा दले उद्भवणार्‍या कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज आहेत.
मी पाकिस्तानी लष्कराच्या डीजीएमओंच्या संपर्कात असून त्यांना आमच्या कारवाईची माहिती दिली आहे. प्रदेशात शांती व सौहार्द राहावे अशीच भारताची इच्छा आहे. परंतु दहशतवाद्यांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडून आमच्या नागरिकांवर हल्ले चढवू दिले जाणार नाही. जानेवारी २००४ मध्ये पाकिस्तानने त्यांची भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरू न देण्याचे जे वचन दिले होते, त्याचे पालन करून या प्रदेशातून दहशतवादाचे उच्चाटन करण्यास पाकिस्तानी सेना सहकार्य करील अशी अपेक्षा आहे.