काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघाती हल्ले, १३ ठार

0
38

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता प्रस्थापित केल्यानंतर देशात दहशत पसरत असल्याचे दिसून येत आहे. अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर काल दोन आत्मघाती हल्ले झाले आहेत. या दोन हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. त्याचबरोबर तीन अमेरिकन सैनिकांसह १५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटेनने काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ल्याची भीती व्यक्त केली होती. त्याचबरोबर आपल्या देशातील नागरिकांना विमानतळापासून दूर राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.

काबूल विमानतळाच्या ऐबी गेटच्या बाहेर हे आत्मघातकी हल्ले झाले. हल्लेखोर गोळीबार करत आला आणि स्वत:ला स्फोटकांनी उडवले. विमानतळाच्या या गेटवर ब्रिटनचे सैनिक तैनात होते. तर दुसरा आत्मघातकी हल्ला हॉटेलबाहेर झाला. स्फोट करणारे दहशतवादी पाश्चिमात्य देशातील सैनिकांना लक्ष्य करत असल्याचे दिसून येत आहे. काबूलनंतर कझाकिस्तानच्या ताराज शहरात हल्ला करण्यात आल्याचे वृत्त आहे. हा हल्ला एका लष्करी तळावर झाल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान, आत्मघातकी हल्ल्यापूर्वी काबूल एअरपोर्टवर इटलीच्या एका विमानावर गोळीबार करण्यात आला होता. या विमानात अफगाणिस्तानातील १०० शरणार्थी होते.

इसिसने घेतली जबाबदारी
काबूल विमानतळावर झालेल्या आत्मघातकी साखळी स्फोटांची जबाबदारी ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. तालिबानने काबूल विमानतळावर इसिसच्या दहशतवाद्यांकडून हल्ल्याचा धोका जाहीर केला होता. तालिबान सैनिकांनी विमानतळाजवळ इसिसच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेतले होते. हे चार दहशतवादी विमानतळाच्या परिसराची रेकी करण्यासाठी दाखल झाले होते. तसेच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही इसिसच्या दहशतवाद्यांकडून कधीही हल्ला होऊ शकतो, असे सांगितले होते.