आयटेन कार दुभाजकाला आदळून क्विड कारवर पलटी; मृतांमध्ये दोघा पुरुषांसह एका महिलेचा समावेश; ५ जण गंभीर जखमी
आंबेनास-राजबाग, काणकोण येथे राष्ट्रीय महामार्गावर क्र. ६६ वर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. हा अपघात काल सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. या अपघातात पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात क्विड कारमधील तिघांचा मृत्यू, तर पाच जण जखमी झाले. दुसर्या आयटेन कारमधील दोघा प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कारवार-मडगाव राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या मनोहर पर्रीकर बगल मार्गावरील आंबेनास-राजबाग, काणकोण येथे काल संध्याकाळी सहाच्या सुमारास हा विचित्र अपघात घडला. जीए-०६-ई-३९७९ क्रमांकाची क्विड कार कारवारहून मडगावच्या दिशेने जात होती, तर जीए-०७-ई-०२६५ ही आयटेन कार मडगावहून कारवारच्या दिशेने जात होती. आंबेनास-राजबाग येथे आयटेन कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार जोरदारपणे दुभाजकाला धडकली. आणि त्याचवेळी सदर कार हवेत उसळून दुसर्या बाजूने येणार्या क्विड कार कोसळली. परिणामी क्विड कारचा चालक आणि त्याच कारमध्ये समोर बसलेली अन्य एक व्यक्ती जागीच ठार झाली. तसेच याच कारमधील एक महिला देखील मृत्यूमुखी पडली. दोन्ही वाहने एकमेकांवर जोरदारपणे आदळल्याने दोन्ही कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
या अपघाताची माहिती मिळताच काणकोण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहनांचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ त्यांना काणकोण सामाजिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सर्व जखमींना अधिक उपचारासाठी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच काणकोणचे आमदार रमेश तवडकर, काणकोणचे नगराध्यक्ष रमाकांत ना. गावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी या ठिकाणच्या दुभाजकाजवळ पट्टेरी गतिरोधक बसवण्याची मागणी गावकर यांनी केली.
काणकोणचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी या अपघाताचा पंचनामा केला. तसेच अग्निशामक दलाच्या जवानांनी अपघातात सापडलेली दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. काणकोण तालुक्यातील अनेक युवकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान, याच मार्गावर घाणेबाग-गालजीबाग येथे असेच अपघात होऊन गेल्या दोन वर्षांत अनेक मृत्यूमुखी पडले असल्याची माहिती गालजीबाग येथील सेबी बार्रेटो यांनी दिली.
याच ठिकाणी आतापर्यंत आठ अपघात
मनोहर पर्रीकर बगल मार्गावर बुधवारी सायंकाळी ज्या ठिकाणी अपघात झाला, त्या ठिकाणी आतापर्यंत आठ अपघात झाले आहेत; पण संबंधित यंत्रणेने या अपघातांची दखल घेतली नसल्याने अपघातांची शृंखला वाढत आहे. कालचा दोन कारमधील अपघात कल्पनेपलीकडचा आहे, अशी प्रतिक्रिया काणकोणचे माजी आमदार विजय पै खोत यांनी दिली.
अपघातातील मृत व जखमींची नावे
या अपघातात हरिश उल्हास नागेकर (३५), उल्हास राम नागेकर (६४) आणि वीणा उल्हास नागेकर (६०) या तिघांचा मृत्यू झाला, तर सावी हरिश नागेकर (२), हर्षिता हरिश नागेकर (२६), समिक्षा नागेकर (४०), साई नागेकर (१३) आणि सुक्षता काणकोणकर (३१) हे जखमी झाले. या अपघातात मृत व जखमी झालेल्या सर्व व्यक्ती उपासनगर, वास्को येथील असून, ते मूळचे माजाळी-कारवारचे रहिवासी असल्याचे काणकोण पोलिसांनी सांगितले.
एकाच कारमधील तिघे मृत्यूमुखी
क्विड कार कारवारहून मडगावकडे, तर आयटेन कार मडगावहून कारवारच्या दिशेने जात होती. जोरदार वेगामुळे दुभाजकाला धडकून आयटेन कार हवेत उसळली आणि थेट क्विड कारवर कोसळल्याने त्यातील तिघांना आपले प्राण गमवावे लागले.
देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला
या अपघातात ज्या क्विड कारमधील तिघांचा मृत्यू झाला, ते हणकोण येथील श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवाहून घरी परतत होते. सदर कुटुंब वास्को येथील आहे. देवदर्शनाहून परतणार्या या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी
या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. अपघातस्थळावरची दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी होती. दोन्ही वाहने एकमेकांवर धडकल्याने पूर्णत: चक्काचूर झाला होता. तसेच काही जण जखमी अवस्थेत वाहनातच अडकून पडले होते. परिणामी घटनास्थळी वाहतूक काही काळासाठी थांबली होती. तसेच बघ्यांची देखील गर्दी झाली होती.
कोठंबीतील अपघातात १८ वर्षीय विद्यार्थी ठार
अवेडे-कोठंबी येथे बालरथ व दुचाकी या वाहनात झालेल्या अपघातात चांदर येथील एक १८ वर्षीय विद्यार्थी ठार झाला. जेसवर्ड मार्टिन असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो दुचाकीवरून जात होता. काल सकाळी ७.३० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. अवेडे येथील इमॅक्युलेट कन्सेप्शन शाळेचा बालरथ (क्र. जीए-०७-एस-००८७) विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असताना अवेडे-कोठंबी येथील वळणावर जेसवर्ड मार्टिन याच्या दुचाकीला (क्र. जीए-०८-डब्ल्यू-६३४१) बसची समोरून धडक बसली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी इस्पितळात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.