कांपालवरील गोल्डन गोवा दालन लक्षवेधी

0
105

सोमवारपासून सुरू झालेल्या इफ्फीतील गोल्डन गोवा दालन लक्षवेधी ठरले असून पहिल्या दिवशी व काल रात्री उशिरापर्यंत लोकांनी प्रचंड गर्दी करून महोत्सवातील या दालनाचा मनसोक्त आनंद लुटला. कला दिग्दर्शक शमीम पोपकर यांच्या संकल्पनेतून गोल्डन गोवा दालन साकारल्याची माहिती त्यांचे सहाय्यक विश्वेश मोरे यांनी ही दिली.

यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोमंतकीय तसेच देश विदेशातील लोकांच्या पसंतीस उतरेल असे लक्षवेधी दालन काम्पालवर उभारले आहे. यात गोमंतकातील काही निवडक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. प्रख्यात गोमंतकिय व्यंगचित्रकार पद्मविभूषण मारीओ मिरांडा यांच्या कार्टूनवरील चित्रांचा येथील सजावटीसाठी वापर केला आहे. अंदाजे ३५ कलाकार या कामात गुंतले होते. रांची कुडीचे दालन, मारिओ मिरांडाच्या संकल्पनेतील व्हरांडा, गोव्याच्या प्रसिद्ध कार्निव्हल उत्सवाची आठवण करून देणारे आकर्षक आणि देखणे प्रवेशद्वार, विद्दुत रोषणाई यामुळे हे दालन गर्दी खेचत आहे. रांची कुड विभागात गोमंतकिय खाद्य पदार्थ यासाठी लागणारी भांडी, अन्य वस्तूंची मांडणी आदींचा आनंद लुटण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत लोकांनी याचा आस्वाद लुटला. मारीओ मिरांडा यांच्या व्हरांड्यावर मोठ्या संख्येतील बच्चे मंडळीची छायाचित्रे त्यांच्या पालकांनी काढली.
महोत्सवाचे आठ दिवस बाकी असून या काळात हे दालन बरीच गर्दी खेचणार हे आजच्या गर्दीवरुन सिध्द झाले. रात्री या परिसराला जत्रेचे स्वरूप आले. देशी विदेशी लोकांनीही या कलात्मक दालनांसाठी वावरलेल्या कलाकारांचे अभिनंदन केले.यंदाच्या महोत्सवातील एक चांगले दालन असल्याचा अभिप्राय अनेकांनी दिल्याची माहिती कला दिग्दर्शक मोरे यांनी दिली.