कसे ऐकणार भाषण;  कष्टी शाळेत वीजच नाही

0
120

आज देशभरात पाहिले जाणार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण सावर्डे मतदारसंघातील कष्टी प्राथमिक शाळेतून विद्यार्थी पाहू शकणार नाहीत, कारण या शाळेला कायम वीज जोडणीच नाही. दरम्यान, सध्या केवळ निवडणूक असताना शाळेत हंगामी वीज जोडणी दिली जाते व त्यानंतर ती पुन्हा तोडण्यात येते.
काले पंचायतक्षेत्रात १९६३ साली बांधलेल्या या शाळेला कायम वीज जोडणी मिळालेली नाही. शाळेची ३०० चौ. मी. जागा वगळता सभोवतालची सर्व जागा खासगी मालकीची आहे. पूर्वीच्या मालकाने रितसर शाळेला जागा दिली नव्हती. आता नव्या मालकाने शाळेस जमीन देण्यास नकार दिला असल्याचे माजी सरपंच काशिनाथ नाईक यांनी सांगितले. या शाळेकडे जाण्यासाठी अधिकृत रस्ताही नाही.
दरम्यान, आजच्या भाषणाच्या व्यवस्थेविषयी विचारल्यावर सांग्याचे भागशिक्षणाधिकारी उदय देसाई यांनी सांगितले की शाळेत विजेची सोय नसल्यामुळे नजीक असलेल्या चौगुले कंपनीच्या क्लबमध्ये विद्यार्थ्यांना भाषण दाखविण्याची सोय केली आहे. त्यासाठी कंपनीची परवानगी घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले.