कसा मोडला नक्षल्यांचा कणा?

0
113
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

महाराष्ट्रातील गडचिरोलीच्या जंगलात कसनासूर येथे ६४ महाराष्ट्र सी-६० आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्सच्या कमांडोंनी केलेल्या दणकेबाज कारवाईत नुकताच ३७ नक्षल्यांचा खात्मा करण्यात आला. एकाच वेळी दोन डिव्हिजनल कमांडर्सचा खातमा पहिल्यांदाच झाला आहे हे या चकमकीचे वैशिष्ट्य. या कमांडोंच्या लष्करी प्रशिक्षणात योगदान दिलेले लेखक स्वतः सांगत आहेत या चकमकीविषयीचे आपले आकलन –

रविवार,२२ एप्रिल २०१८ रोजी ६४ महाराष्ट्र सी-६० आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलिस फोर्स (सीआरपीएफ) कमांडोंनी गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील ताडगाव जवळच्या जंगलात कसनासूर येथे काही काळ विसावा घेत असलेल्या नक्षल्यांवर घात लावून हल्ला केला. यामध्ये १६ नक्षली जागीच मारले गेले. दुसर्‍या दिवशी झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये इंद्रावती नदीतून आणखी २१ मृतदेह शोधून काढण्यात आले. मारल्या गेलेल्या या १६ नक्षल्यांमध्ये पेरिमिली दलम कमांडर आणि डिव्हिजनल कमिटी सदस्य असणारा दोलेश आत्राम ऊर्फ साईनाथ (७५ हल्ले केलेला आणि ३० लाख रुपये इनाम असणारा) आणि दक्षिण गडचिरोली डिव्हिजन कमांडर विजेन्द्र रावथू ऊर्फ सिन्यू (८२ हल्ले केलेला आणि २६ लाखांंचे इनाम असलेला) हे दोन नक्षलप्रमुख आणि दोन षोडशींसह सात नक्षली स्रियांचा समावेश आहे. या दोघांखेरीज अन्य ११ जणांवर मिळून एकूण ७६ लाखांचे बक्षीस आहे. ‘मॉप अप ऑपरेशन्स’ दरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणावर एके-४७ रायफल्स, दारुगोळा, रेडियो सेटस् व वॉकीटॉकीज्, स्फोटके, वायरींची बंडले, संगणकीय पेन ड्राइव्हज्, लॅपटॉप आणि मोठ्या प्रमाणात नक्षली प्रचारपत्रके व साहित्य मिळाले आहे. एकाच वेळी दोन डिव्हिजनल कमांडर्सचा खातमा पहिल्यांदाच झाला आहे हे या चकमकीचे वैशिष्ट्य.
उरला ङ्गक्त रघु; पण…
गडचिरोली डिव्हिजनच्या सुनिल कुलमेथेचा सिरोंचामध्ये ३ एप्रिल रोजी झालेला खातमा आणि ताडगावमधील हे दोघे असे तीन डिव्हिजनल कमांडर्स मारले गेल्यामुळे या क्षेत्रात आता रघू ऊर्फ नाडेला सायलू हाच एकमेव मोठा नक्षली नेता उरला आहे. तथापि, ताडगावच्या चकमकीमधे रघुची पत्नी अखिला हीदेखील मारली गेल्यामुळे तो यापुढे कितपत प्रभावी राहील याचे उत्तर येणारा काळच देईल. सी-६० कमांडोंनी यापूर्वी २०१३ मध्ये कोरची आणि २०१७ मध्ये सिरोंचात प्रत्येकी सात नक्षल्यांना टिपले होते. ताज्या कारवाईनंतर पोलिसांनी नक्षल्यांवर नि:संशय भौतिक आणि मनोवैज्ञानिक कुरघोडी केली आहे.

काय आहे सी-६० कमांडो युनिट?
१९९२ मध्ये नागपूरस्थित नक्षल विरोधी मुख्यालयाने मुख्यत: गडचिरोली आणि उर्वरित महाराष्ट्र पोलिसांमधून काही जॉंबाज, गणवेषासाठी जान कुर्बान करणारे तरूण निवडून केपी रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सी सिक्स्टी कमांडो युनिटची स्थापना केली. सेनेमधून निवृत्त झाल्यावर काही दिवस त्यांच्या प्रशिक्षणात सक्रीय सहभागी होण्याची संधी मिळाल्यामुळे मला यांच्या सर्वच यशस्वी कामगिरींबद्दल विशेष ममत्व आणि तितकाच अभिमान वाटतो. मागील काही वर्षांमधे त्यांनी लक्षणीय कामगिरी केली असली तरी हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आणि घवघवीत यश आहे. यापूर्वी ओडिशाच्या मलकानगिरी जंगलामध्ये २०१६ मध्ये एकाच वेळी २४ नक्षल्यांचा खात्मा करण्याचा मान आंध्र प्रदेशच्या ‘ग्रे हाऊंड कमांडों’चा होता.

नक्षली हिंसाचाराचे वास्तव
एका अंदाजानुसार, मागील २० वर्षांमध्येे नक्षली तांडवात १२,००० पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत, तसेच किमान ९३०० नागरिकांना ‘पोलिस खबरे (इन्फॉर्मर्स)’ हे लेबल लावून नक्षल्यांनी मारले आहे. पोलिस – नक्षली धुमश्‍चक्रीमध्ये २७०० पोलिस शहीद झाले आहेत आणि २८७४ नक्षली मारले गेले आहेत. दंडकारण्यामधील ताडगाव व भामरागडच्या सदा हिरव्याकंच, गर्द व घनदाट जंगलांमध्ये जाऊन नक्षल्यांचे एनकाऊंटर करणे किती खतरनाक आहे याची कल्पना केवळ ज्यांनी तो परिसर पायाखाली तुडवला आहे त्यांनाच येऊ शकते.

कसनासूर ः नक्षल्यांचे ‘सेङ्ग हेवन’
भामरागडपासून १७० किलोमीटर अंतरावर नक्षल्यांचे ‘संरक्षित क्षेत्र ः सेङ्ग हेवन’ असलेल्या कसनासूरसारख्या ठिकाणी त्यांची बिनतोड घेराबंदी करण्यासाठी तेवढ्याच खात्रीची माहिती आवश्यक होती. ती गडचिरोली पोलिसांनी आपल्या सूत्रांद्वारे मिळवली हे कौतुकास्पद आहे. पेरिमिली दलमचे सदस्य ताडगावमार्गे गडचिरोलीला येेणार आहेत तेथील पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीच्या आधारे शनिवार, २१ एप्रिल २०१८ रोजी सकाळी ९.३० वाजता गडचिरोली रेंजचे डीआयजी अंकुश शिंदे यांनी या कारवाईला हिरवा सिग्नल दिला. गोदावरी नदीची उपनदी असलेल्या ताडगाव जवळील इंद्रावती नदीमुळे छत्तीसगढचा बिजापूर आणि महाराष्ट्राचा गडचिरोली या दोन जिल्ह्यांची सीमा आखली गेली आहे. कसनासूर हे इंद्रावती नदीवर महाराष्ट्राच्या बाजूला वसलेले गाव आहे. आराम करण्यासाठी नक्षली बहुतांश वेळी अशीच ठिकाणे निवडत असतात. कारण धोक्याची संभावना ध्यानी येताच नदीमार्गे किंवा गर्द जंगलांमधून पलीकडच्या राज्यात पोबारा करणे सहज शक्य असते.
‘खबर’ कशी मिळाली?
गडचिरोलीतील प्रत्येक कमांडो दैनंदिन गरजांची साधने, रेशन आणि दारुगोळा असणारा १५ किलोग्राम वजनाचा पॅक घेऊन ऑपरेशनसाठी जातो. सकाळी कमांडोंचे आगामी किंवा त्या दिवसाच्या कारवाईसाठी ब्रिफिंग होते. एका कमांडो टीममधे ३० कमांडो असतात आणि ते १५ च्या गटांमध्ये पोलिस स्टेशनच्या समोरील आणि मागील फाटकांमधून वेगवेगळ्या वेळी बाहेर पडून जंगलात विवक्षित ठिकाणी एकत्र होतात. गडचिरोली पोलिस क्षेत्रात कमी आवाजी, १५० फुटांवर उड्डाण करणारे आणि ४००० पट पृथ:करणाची क्षमता असणारे चार हाय डेफिनिशन ड्रोन्स कार्यरत आहेत. हे ड्रोन्स नक्षली हालचालींची माहिती पोलिसांना देतात. पोलिसी खबर्‍यांकडून ताडगावमधे होऊ घातलेल्या वरील नक्षली हालचालींची पुष्टीदेखील याच ड्रोन्स्‌द्वारे झाली असण्याची शक्यता आहे. अत्यंत खात्रीलायक माहितीच्या अभावी ह्या अभियानात एवढी मोठी सफलता मिळालीच नसती. या नक्षली हालचालींची माहिती गडचिरोली पोलिसांना नक्षली गोटातूनच मिळाल्याच्या वावड्याही उडताहेत. त्या खर्‍या असतील तर गडचिरोली पोलिस त्यांच्या वैयक्तिक खबरी जाळ्याच्या विस्तारासाठी अभिनंदनास पात्र आहेत.

दरवर्षी ३२० कोटींची खंडणी
गडचिरोलीमधील तेंदू पत्ता व्यापारी दरवर्षी ३२० कोटी रुपयांची खंडणी नक्षल्यांना देतात. तेंदू पत्ता दरवर्षी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये गोळा केला जातो. सिन्यू व साईनाथ हे दोन डिव्हिजनल कमांडर आपल्या ६० अनुयायांसह गडचिरोलीतील तेंदू पत्ता व्यापार्‍यांकडून खंडणी घेण्यासाठी तेलंगणातून गडचिरोलीला जात असतांना ताडगावजवळ इंद्रावती नदीकाठी सकाळचा नाश्ता करण्यासाठी थांबले होते. ते या मार्गे येणार ही बातमी गडचिरोली पोलिसांकडे होती. याच वर्षी २८ मार्चला पाच नक्षली गडचिरोली पोलिसांना शरण आले आणि ४ एप्रिलला पोलिसांनी आठवडी बाजार उडवण्यासाठी आलेल्या पाच नक्षल्यांना अटक केली होती. या सर्वांच्या उलट तपासणीतून त्याच प्रमाणे खबरे आणि ड्रोन्सद्वारे गडचिरोली पोलिसांना ही माहिती मिळाली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.