कळंगुट मतदारसंघात फोफावलेल्या वेश्या व्यवसायाबाबत लोबोंचे दुर्लक्ष

0
135

>> अनैतिकतेला रान मोकळे : कॉंग्रेसचा आरोप

कळंगुट मतदारसंघात वेश्या व्यवसायाला ऊत आलेला असून सरकार व स्थानिक आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते ऊरफान मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत केला.
मनोहर पर्रीकर हे ज्यावेळी राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले होते त्यावेळी त्यानी बायणा येथील वेश्यावस्तीवरून नांगर फिरवला होता. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या धाडसाचे कौतुक झाले होते असे सांगून हेच मुख्यमंत्री आता वेश्या व्यवसायाकडे दुर्लक्ष करून ह्या अनैतिक धंद्याला रान मोकळे करुन देत आहेत हे पाहून वाईट वाटत असल्याचे मुल्ला म्हणाले.

कळंगुट येथे मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालू आहे असे असूनही स्थानिक आमदार मायकल लोबो गप्प कसे काय आहेत असा सवाल त्यांनी केला. नायजेरियन ड्रग माफियांचा वावरही तेथे खूपच वाढला असल्याचे मुल्ला यांनी यावेळी सांगितले. लोबो यानी आपण कळंगुट व आसपासच्या किनारपट्ट्यांवर अमली पदार्थांचा अनैतिक धंदा करणार्‍यांची नावे उघड करणार असल्याचे सांगितले होते त्याचे काय झाले, असा सवालही मुल्ला यानी यावेळी केला. पोलिसानी वेळोवेळी घातलेल्या धाडीत परराज्यातून वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या ५३ पीडीत युवतींची सुटका करण्यात आली असल्याचे सांगून सरकारने ह्या वेश्या व्यवसायाची पाळेमुळे खोदून काढावीत, अशी मागणी मुल्ला यानी यावेळी केली.

प्रशासन ठप्पमुळे विधानसभा
विसर्जित करणे योग्य
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासह कित्येक मंत्री आजारी आहेत. काही जण विदेश दौर्‍यावर गेलेले असून प्रशासन पूर्णपणे ठप्प झालेलो आहे. अशा परिस्थितीत विधानसभा विसर्जित करणेच शहाणपणाचे ठरेल, असे उरफान मुल्ला यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

केवळ पाच मंत्री जर प्रशासन चालवू शकतात तर बारा मंत्री हवेतच कशाला. सरकारने पाच मंत्र्यांना घेऊनच सरकार चालवावे, असे मुल्ला म्हणाले. संपूर्ण गोवाभरातील रस्ते खड्डेमय झालेले आहेत. पण सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्याचा मात्र कुठेही पत्ता नाही, असे सांगून मंत्र्याने लोकांच्या जीवनाशी खेळ मांडू नये, असे मुल्ला म्हणाले.