कळंगुट चोरीतील १९ लाखांचा ऐवज हस्तगत

0
90

कळंगुट येथील दिगंबर सांगोडकर यांच्या कळंगुट येथील कळंगुट सुपरमार्केट ऍण्ड ज्युवेलर्स दुकानात दि. २७-२८ डिसेंबरच्या मध्यरात्री चोरी होऊन अंदाजे १९ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज चोरांनी लुटला होता.कळंगुट पोलीस स्थानकातील निरीक्षक संतोष देसाई आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पाठपुरावा करून काल सकाळी १०.३० वा. दोन अट्टल चोरांना जेरबंद केले. त्यातील एक ब्रिटीश नागरिक असून त्याचे नाव मॅकलेन लॉयड असून दुसर्‍याचे नाव साथीदार अँथनी मास्कारेन्हास (२१) रा. नाईकवाडो कळंगुट असे आहे.

मॅकलेन कळंगुट येथे तीन महिन्यापासून हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. त्याच्या खोलीवरून सोन्या-चांदीचे दागिने आणि घरफोडीसाठी लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. त्या ऐवजात नेकलेस, मंगळसुत्रे, अनेक छोटे-मोठे दागिने यांचा समावेश आहे. सदर मॅकलेनजवळ अधिकृत व्हीसा नसल्याचे आढळून आले आहे. पुढे असेही समजून आले की मॅकलेन कळंगुट येथील गेस्ट हाऊस आणि रिसॉर्टमध्येही वास्तव्यास होता. पोलिसी कारवाईत अधीक्षक वामन तारी, उपअधीक्षक पंढरीनाथ मापारी आणि निरीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मी आमोणकर, शिपाई विजय गायकवाड, अक्षय तिरोडकर, सुधीर परब व उदेस केरकर यांनी भाग घेतला. तूर्तास चोराना पर्वरी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले असून आज दि. १ रोजी म्हापसा येथील न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात येणार आहे.