कला अकादमी नूतनीकरणाचा संपूर्ण अहवाल पुढील अधिवेशनात पटलावर

0
6

>> मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; समस्या निराकरणासाठी कलाकारांची समिती स्थापणार

कला अकादमीच्या वास्तूचे जे नूतनीकरण केले आहे, त्या कामाचा संपूर्ण अहवाल गोवा विधानसभेच्या पुढील अधिवेशनात सभापतींच्या पटलावर ठेवण्यात येईल, असे आश्वासन काल सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या नात्याने बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिले. कला अकादमीच्या वास्तूची दुरुस्ती केल्यानंतर जे वेगवेगळे प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या आहेत, त्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्यातील आघाडीच्या कलाकारांची एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

काल प्रश्नोत्तराच्या तासाला काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा यांनी कला अकादमीसंबंधीचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील स्पष्टीकरण केले. यावेळी विरोधकांनी या प्रश्नी सभागृह समिती स्थापन करण्याची मागणी केली; मात्र ती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली नाही.
कला अकादमीच्या वास्तूची दुरुस्ती केल्यानंतर त्यात कोणकोणत्या त्रुटी राहिल्याचे आढळून आले आहे, असा प्रश्न करुन त्या त्रुटींची यादी तुमच्याकडे आहे का, असा प्रश्न फेरेरा यांनी केला होता.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या काही त्रुटी राहिलेल्या असतील, त्या तपासून पुढील तीन वर्षांच्या आत कंत्राटदाराला दुरुस्त कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय त्यांना तीन वर्षे या वास्तूची देखभालही करावी लागणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कोसळलेल्या ओपन एअर ऑडिटोरिअमबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्याविषयी मुंबई आयआयटीने दिलेल्या अहवालात ह्या स्लॅबचे लोखंड गंजलेले होते आणि त्यामुळेच तो कोसळल्याचे अहवालातून नमूद केले असल्याचे स्पष्ट केले. कला अकादमीच्या मुख्य सभागृहाचे कोणतेही नुकसान झालेले नाही, जे फॉल सिलिंग पडले होते, ते बाजूच्या ओपन टेरेसचे होते, असा खुलासाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

यावेळी कार्लुस आल्मेदा, विजय सरदेसाई, व्हेन्झी व्हिएगस, युरी आलेमाव आदींनी दुरुस्तीनंतरच्या त्रुटींतील प्रश्नांवरुन मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. सार्वजनिक बांधकाम खात्याने कोट्यावधी रुपये खर्च करुनही या इमारतीची व्यवस्थित दुरुस्ती केलेली नाही. उलट इमारतीची दुर्दशाच केली आहे, असा आरोप यावेळी विजय सरदेसाई यांनी केला. ध्वनी यंत्रणेपासून, प्रकाश योजना, आऊटडोअर साऊंड सिस्टम आदीही सदोष असल्याचे आढळून आले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले. 75 कोटी खर्च करुनही वास्तूत दोष राहिले आहेत. त्यामुळे या प्रश्नी सभागृह समितीची स्थापना करा, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर सभागृह समितीचा प्रस्ताव फेटाळून लावत या प्रश्नी कलाकारांची समिती स्थापन करतो, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.