कर्नाटक निवडणूक तारखा ‘लिक’ची सीबीआय चौकशी शक्य

0
79

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होण्याआधीच भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून काल झाल्याच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर आता या प्रकरणाची चौकशी सीबीआय व आयबी (इंटेलिजन्स ब्युरो) यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोग करणार असल्याचे वृत्त आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकांची घोषणा करण्यासाठी काल पत्रकार परिषद घेतली असता याबाबतची माहिती आधीच भाजपकडून फुटली असल्याचे लक्षात आणून दिले असता मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, ‘काही गोष्टी ‘लिक’ झाल्या असू शकते. त्या संदर्भात आयोग योग्य कारवाई करेल. या विषयी तपास केला जाईल. याबाबत कायदेशीर तसेच प्रशासकीय पातळीवरून कृती केली जाईल याविषयी आश्‍वस्त असावे.’

निवडणूक आयोगाने निवडणूक तारखांविषयी घोषणेसाठी पत्रकार परिषद घेण्याच्या काही वेळापूर्वीच भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी या निवडणुकीच्या तारखा ट्विटरवरून जाहीर केल्या. त्यानंतर याप्रकरणी वादास प्रारंभ झाला.

मालवीय – शहांवर कारवाई
होणार? ः कॉंग्रेस
कॉंग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विश्‍वासार्हतेबाबत प्रश्‍नचिन्ह उभे केले. कॉंग्रेसच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख रणदीप सूरजेवाला यांनी याप्रकरणी अमित मालवीय किंवा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर कारवाई केली जाईल काय असा सवाल उपस्थित केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करण्याआधीच भाजपकडून ती घोषणा झाल्याने भाजप सुपर निवडणूक आयोग ठरला असल्याची टीका सूरजेवाला यांनी केली आहे.

टीव्ही चॅनलवरून ‘लीक’
झाल्याचा दावा
अमित मालवीय यांनी ट्विटरवरून कर्नाटकमधील निवडणूक १२ मे रोजी व मतमोजणी १८ मे रोजी होईल, असे म्हटले. त्यांची मतदानाची तारीख अचूक होती, मात्र मतमोजणीची त्यांनी जाहीर केलेली १८ मे ची तारीख चुकली. आयोगाने मतमोजणी १५ मे रोजी होईल असे जाहीर केले आहे. मात्र आपल्या या कृतीचे समर्थन करताना मालवीय यांनी या तारखा टीव्ही चॅनलवर ‘फ्लॅश’ झाल्याचा दावा केला आहे.

कर्नाटक विधानसभेची
१२ मे रोजी निवडणूक
कर्नाटक विधानसभेसाठी येत्या १२ मे रोजी एका टप्प्यातच मतदान होणार आहे. या २२४ सदस्यीय विधानसभा निवडणुकीची अधिसूचना येत्या १७ एप्रिल रोजी जारी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत दिली. मतमोजणी १५ मे रोजी होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल असून उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २७ एप्रिल अशी आहे.
या घोषणेनंतर पत्रकारांनी वरील माहिती भाजपकडून आधीच ‘लिक’ झाल्याचे लक्षात आणून दिले असता रावत यांनी ही अतिशय गंभीर बाब असल्याचे मान्य केले.