कर्नाटकविरुद्ध ‘म्हादई प्रवाह’कडे तक्रार नोंदवणार

0
5

>> जलस्रोतमंत्री शिरोडकर यांची माहिती; कर्नाटककडून पुन्हा म्हादईचे पाणी वळवण्याचा प्रयत्न

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी कर्नाटककडून सुरू केलेल्या कामाचा मुद्दा म्हादई प्रवाहसमोर मांडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कर्नाटक सरकारने म्हादईचे पाणी वळविण्यासाठी सुरू केलेल्या कामाबाबत म्हादई प्रवाहाकडे तक्रार दाखल केली जाणार आहे. तसेच, गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली जाणार आहे, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल दिली.

कर्नाटक सरकारने म्हादई नदीचे पाणी वळविण्यासाठी चर खोदण्यास सुरुवात केल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना सुभाष शिरोडकर म्हणाले की, म्हादई प्रवाहकडे तक्रार दाखल करून संयुक्त पाहणीची मागणी केली जाणार आहे. कर्नाटक राज्याच्या हद्दीत म्हादईवर काम केले जात असल्याने गोवा सरकार थेट हस्तक्षेप करून कारवाई करू शकत नाही, असेही शिरोडकर यांनी सांगितले.

राज्याच्या जलस्रोत विभागाकडून साधारण 15 ते 20 दिवसांनी म्हादई नदीच्या परिसराची पाहणी केली जाते. कर्नाटक सरकारने म्हादईवर सुरू केलेले काम आमच्या निदर्शनास आले आहे. गोवा सरकार थेट कर्नाटकवर कारवाई करू शकत नाही. म्हादई प्रवाह समितीच्या माध्यमातून कारवाई करावी लागणार आहे. सरकार म्हादई प्रवाह समितीद्वारे संयुक्त तपासणीची मागणी करणार आहे. राज्याच्या ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करून कर्नाटकाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याबाबत सल्ला घेतला जाणार आहे. कर्नाटक विरोधात यापूर्वी दोन अवमान याचिका दाखल केलेल्या आहेत, असेही शिरोडकर यांनी सांगितले.