कबूतर नको, राजहंस बनू या

0
180
  •  प्रा. रमेश सप्रे

‘विवाहानंतर चतुर्भुज (दोन हात पतीचे, दोन हात पत्नीचे) होऊन देवासारखं वागण्याची श्रेयस्कर संधी असूनही बहुसंख्य पती-पत्नी ही चतुष्पाद(चार पाय- दोन नवर्‍याचे नि दोन बायकोचे) झाल्यासारखी म्हणजे जनावरांसारखी किंवा केवळ प्रेयाला कवटाळणार्‍या भोगी दानवांसारखी वागतात.’

स्वामी विवेकानंद युवावर्गाला उद्देशून अनेकदा म्हणत – ‘तीन गोष्टी जीवनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत’ असं म्हटल्यावर सर्वांच्या मनात हवा- पाणी- अन्न किंवा रोटी- कपडा- मकान अशाच गोष्टी असतील. पण स्वामीजींचं म्हणणं वेगळं असे. ‘गीता- कठोपनिषद- आत्मषट्‌क (आद्य शंकराचार्यांनी रचलेलं)’. त्यांचा आग्रह या तिघांचं पाठांतर करण्यावर नसे तर अर्थावर चिंतन करून त्याचा जीवनात प्रयोग करण्यावर असे.

विशेषतः गीतेतील ध्यानयोग, कर्मयोग, ज्ञानयोग यासंबंधीचे श्‍लोक; कठोपनिषदातील ‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्यवरान्निबोधत!’ आणि आत्मषट्‌कातील सूत्र ‘चिदानंद रुपः शिवोऽहं शिवोऽहम्’ यातील संदेश आजही उपयुक्त आहे.

अनेक विचारवंतांना पाश्चात्त्य आणि पौर्वात्य (भारतातील) तत्त्वचिंतकांना सर्वाधिक प्रभावित कोणत्या उपनिषदानं केलं असेल तर कठोपनिषदानं! एवढंच नव्हे तर गीतेतील चिंतनावर सर्वाधिक प्रभाव कठोपनिषदाचाच आहे. यातले काही मंत्र जसेच्या तसे गीतेत प्रतिबिंबित झाले आहेत.

काय आहे असं विशेष या उपनिषदात?
इतर उपनिषदात आढळत नाही अशी एक दीर्घ कथा या कठोपनिषदाचा गाभा आहे. कथेच्या वेगवेगळ्या पैलूत ऋषींचा मानवजातीला दिलेला संदेश आहे. कथा अशी – प्राचीन काळी वाजश्रवा नावाचे एक ऋषी होते. अन्नदान करत असल्याने त्यांची कीर्ती दूरवर पसरली होती. म्हणून सर्वजण आदरानं त्यांना वाजश्रवा म्हणत असत. पण हे वाजश्रवा ऋषी सकाम भक्ती करणारे होते. सतत कोणती ना कोणती कामना त्यांच्या मनात आणि म्हणून प्रयत्नात दिसून येत असे. वाजश्रवा ऋषींनी एकदा विश्‍वजित यज्ञ करायचा संकल्प केला. तो पूर्ण झाल्यावर त्यांनी यज्ञाच्या विधीनुसार सर्वस्वाचं दान करण्याचाही संकल्प केला होता. यज्ञ यथासांग यथाविधी संपन्न झाला.

यज्ञ करणार्‍या पुरोहितांना योग्य दक्षिणा देऊन झाल्यावर वाजश्रवांनी जमलेल्या याचकांना गोदान करण्यास आरंभ केला. मोठ्या अपेक्षेनं आलेल्या याचकांना वाजश्रवा ऋषी मरतुकड्या गायींचं दान करू लागले. या गाईंचं वर्णन करताना चार शब्दप्रयोग केलेले आहेत. शेवटचं पाणी पिलेल्या (पीतोदका); शेवटचं गवत खाल्लेल्या (जग्धतृणा); शेवटचं दूध दिलेल्या (दुग्धगोष) आणि ज्यांची इंद्रियं कमकुवत झालेली आहेत (जिरिंद्रियाः) म्हणजे भाकड अशा. म्हणजे ज्यांना दान म्हणून अशा गायी मिळाल्या त्या वाटेतच मरून पडून घेणार्‍याला गोहत्येचा दोष लागणार होता.

हा सारा प्रकार दोन व्यक्ती पाहत होत्या. एक वाजश्रवा ऋषींचे पिताश्री- ज्यांनी असं करण्याचा सल्ला देऊनही वाजश्रवांनी तो मानला नाही. पिताश्रींनी वाजश्रवांना शास्त्रवचनाचं स्मरण करून दिलं, ‘असं दान करणारी व्यक्ती (यजमान)- मृत्यूनंतर आनंदशून्य लोकात जाते. त्याला सर्वोच्च अशा विश्‍वजित यज्ञाचं पुण्यफल मिळत नाही. पण आपल्या पित्याचा हा उपदेश धुडकावून लावून वाजश्रवा ऋषींनी तसंच दान देणं सुरू ठेवलं. हा सारा प्रकार सूक्ष्मपणे न्याहाळणारी आणखी एक व्यक्ती म्हणजे वाजश्रवा ऋषींचा तेजस्वी पुत्र नचिकेता. जो सुमारे दहा वर्षांचा बालक होता.

अत्यंत बुद्धिमान असलेल्या नचिकेतानं विचार केला की गोशाळेत सहस्त्रावधी धष्टपुष्ट गायी असताना आपले पिताश्री मरतुकड्या गायींचं दान का करत आहेत? त्याच्या लक्षात आलं की त्या गायी ते आपल्या पुत्रासाठी (म्हणजे नचिकेतासाठी) राखून ठेवत आहेत.
एकाएकी तो पिताश्रींसमोर उभा राहिला नि त्यानं स्पष्टपणे विचारलं, ‘पिताश्री, आपण मला कुणाला दान करणार?’ वाजश्रवांनी त्याला दूर होण्यास सांगितलं. पुन्हा काही वेळानं नचिकेतानं तोच प्रश्‍न विचारला. असा प्रकार तीनदा झाल्यावर रागानं वाजश्रवा म्हणाले, ‘जा, मी तुला मृत्यूला दान करणार आहे.’

याचकांना दान देण्याचा विधी पूर्ण झाल्यावर नचिकेतानं पिता वाजश्रवांकडे मृत्यूकडे जाण्याची परवानगी मागितली. तो म्हणाला, ‘पिताश्री, मनुष्य तृणाप्रमाणे नाश पावतो आणि तृणाप्रमाणे पुन्हा निर्माण होतो. म्हणून आनंदानं मृत्युदेवता यमाकडे जातो.’

दक्षिण दिशेला यमाचं राज्य आहे हे कळल्यावर नचिकेता दक्षिणेकडे जात राहिला आणि शेवटी तो यमाच्या सदनापर्यंत पोचलासुद्धा. यम काही कामानिमित्तानं बाहेर गेला होता तो तीन दिवसांनी परतला. तोपर्यंत नचिकेतानं अन्नाचा कण नि पाण्याचा थेंबही घेतला नव्हता. ज्यावेळी यम परतला तेव्हा या तेजस्वी बालकाला पाहून म्हणाला, ‘तू वंदनीय अतिथी आहेस. म्हणून तुला नमस्कार. माझ्यावर रागवू नकोस. मी तुला तीन वर देतो.’

नचिकेतानं पहिला वर मागितला- ‘हे यमराजा, मी इकडे आलो तेव्हा माझे वडील दुःखी झाले होते. माझ्यावर रागवले होते. ते मी परत जाईन तेव्हा ते शांतचित्त, प्रसन्नहृदयी झालेले असोत. माझी ओळख त्यांना पटो नि माझ्याशी ते पूर्वीसारखेच प्रेमानं भाषण करोत.’ यावर यमराज म्हणाले, ‘तथास्तू’!
नचिकेताचा दुसरा वर विचार करण्यासारखा आहे, ‘स्वर्गात भय नसतं कारण तेथे म्हातारपण, आजार, क्षुधा- तृषा यांचा अभाव असल्याने दुःखाच्या पलीकडे असलेला आनंदानुभव असतो. अशा स्वर्गात ज्या अग्नीच्या उपासनेनं जाता येतं, त्या अग्नीचं ज्ञान मला दे.’
या अग्नीचं गूढ ज्ञान नचिकेतानं सहज ग्रहण केल्यामुळे प्रसन्न होऊन यमराज म्हणाला, ‘यापुढे तुझ्या नावावरून या अग्नीला ‘नाचिकेत’ असं नाव दिलं जाईल, जो याप्रमाणे उपासना करील त्याला आत्मसाक्षात्कार होऊन उच्च पातळीवरची शांती प्राप्त होईल.’
नचिकेतानं मागितलेला तिसरा वर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीसाठी उपयुक्त आहे. ‘मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचं पुढे काय होतं? कारण मृत्यूनंतरही आत्मा असतो असं काहीजण म्हणतात तर काहीजण आत्मा नसतो असंही म्हणतात. याविषयी माझ्या मनात जी शंका आहे, संभ्रम- गोंधळ आहे तो कृपया दूर केला जावा.’
एका अर्थी नचिकेता मृत्यूच्या देवतेकडे मृत्यूचं रहस्यच मागत होता. आत्मा, मृत्यू या गोष्टींचं ज्ञान अतिशय सूक्ष्म आहे म्हणून नचिकेतानं त्याविषयी आग्रह धरु नये असं यमानं सुचवलं. एवढंच नव्हे तर या प्रश्‍नाच्या उत्तराच्या बदल्यात यमराजानं नचिकेताला अनेक गोष्टी देऊ केल्या.

* दीर्घ आयुष्य, पुत्र, पौत्र अशी सुदृढ संतती.
* हत्ती, घोडे असे पुष्कळ पशू, जे त्याकाळी वैभव नि सामर्थ्याचं प्रतीक होतं.
* पृथ्वीवर निष्कंटक (धोका नसलेलं) विशाल राज्य नि त्याचा भोग घेण्यासाठी हवं तेवढं आयुष्य.
* सेवा करण्यासाठी अनेक सुंदर स्त्रिया, दासी.
* मृत्यूलोकातील कोणतीही कामना तृप्त, तुझे सारे मनोरथ सफल करून घे.

– पण हा आत्मज्ञानाचा, मृत्यूच्या रहस्याविषयीचा प्रश्‍न विचारू नकोस’, असं यमानं विनंतीपूर्वक सांगितलं.
पण नचिकेताला पृथ्वीवरील, मृत्यूलोकातील या सार्‍या गोष्टींच्या क्षणभंगुरपणाची, त्या अनित्य असल्याची कल्पना होती. एवढ्या लहान वयात ही बुद्धी, विचार करण्याची क्षमता पाहून यम मनातल्या मनात प्रसन्न झाला. नचिकेताचा निर्धार आणि निग्रह पाहून आपण ज्ञानग्रहणासंबंधी घेतलेल्या परीक्षेत बालत नचिकेता उत्तीर्ण झालेला पाहून त्याला मनोमन आनंद झाला.

ज्ञान किंवा वरदान देण्यापूर्वी ते स्वीकारणार्‍या व्यक्तीचं पात्र (पात्रता) पाहावं लागतं. धगधगीत अंगारांसारखं ज्ञान स्वीकारण्यासाठी जर कापडाचं वस्त्र पुढे केलं तर ते वस्त्र जाळून ते निखारे मातीत पडतील. नचिकेता मृत्यूचं रहस्य म्हणजे धन्यकृतार्थ जीवनाचं मर्म जाणून घेण्यासाठी योग्य असं ‘पात्र’ होता हे पाहून यमाचं त्याच्या प्रश्‍नाचं उत्तर देण्यास आरंभ केला-
‘‘श्रेय (मानवजन्माचं कल्याण) आणि प्रेय (देहसुखाच्या दृष्टीनं प्रिय) अशी दोन भिन्न उद्दिष्ट असलेली ध्येयं माणसाला आपापल्या बाजूनं खेचत असतात. यापैकी श्रेयाचा स्वीकार करणार्‍या माणसाचं कल्याण होतं तर प्रेयाच्या दिशेनं ओढल्या जाणार्‍याच्या जीवनाचं सार्थक होत नाही. प्रिय वस्तू, पदार्थ, व्यक्ती, अनुभव यांचं आकर्षण बहुतेक सर्वांनाच वाटत असतं. ही मंडळी सामान्य प्रापंचिक असतात. पण या भुलभुलैयातून सुटून आपण मुक्त व्हावं असंही काही लोकांना वाटतं. ते श्रेयसाचे उपासक असतात. देहभोगांच्या नि इतर उपभोगांच्या वर उठून ते परमार्थमार्गाला लागतात नि स्वतःचं कल्याण साधतात.
मृत्यूच्या रहस्याची चर्चा करताना आरंभी यमराज नचिकेताला श्रेयस- प्रेयसाचा अर्थ उलगडून सांगतात. ते स्पष्टच म्हणतात-

श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
तौ संपरीत्य विविनक्ति धीरः|
श्रेयो हि धीरोऽमि प्रेयसो वृणीते
प्रेयो मंदो योगक्षेमात् वृणीते ॥

अर्थ ः- (जीवनात) श्रेय आणि प्रेय दोन्हीही मनुष्याच्या समोर येतात. त्यातील एकाची विशेषकरून निवड करायची असते. म्हणून बुद्धिमान माणूस (धीरः) नीट विचार करून (संपरीत्य), दोन्ही बाजू लक्षात घेऊन (विविनक्ति) श्रेयाची निवड करतो. याउलट मंदबुद्धीचा माणूस (मंदः) केवळ उदरनिर्वाहाची (योगक्षेमात्) निवड करतो (वृणीते).
पाणी आणि दूध मिसळून प्यायला दिलं तर प्रपंचात गुरफटलेली माणसं ते पाणचट दूध कधी तक्रार करत तर कधी बिनतक्रार पितात. पण जे राजहंसासारखे नीरक्षीरविवेकी असतात ते पाण्याचा त्याग करून सकस दूधच पितात. इथं जो योगक्षेम शब्द वापरलाय त्यात ‘योग’ म्हणजे ज्ञानयोग- ध्यानयोग- कर्मयोग असा कुठलाही योग नसून प्रपंचासाठी आवश्यक त्या वस्तू जमवणे, जोडणे असा आहे. या वस्तू टिकवणे, त्यांची काळजी घेणे याला ‘क्षेम’ म्हटलंय. गीतेतसुद्धा जेव्हा भगवंत म्हणतात, ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ त्याचाही हाच अर्थ आहे. पण त्या श्‍लोकात आधी तीन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत- ‘अनन्याश्चिंतयतो मां’, ‘ये जनाः पर्युपासते’, ‘तेषां नित्य अभियुक्तानाम्’ अशा सतत माझंच चिंतन करणार्‍या, सर्व कर्मं ही माझीच उपासना मानणार्‍या आणि सतत माझ्याशी जोडून असलेल्या माणसांचा उदरनिर्वाह, संसार (योगक्षेमं) मी चालवतो.

गंमतीनं जे म्हटलं जातं ‘विवाहानंतर चतुर्भुज (दोन हात पतीचे, दोन हात पत्नीचे) होऊन देवासारखं वागण्याची श्रेयस्कर संधी असूनही बहुसंख्य पती- पत्नी ही – चतुष्पाद (चार पाय, दोन नवर्‍याचे नि दोन बायकोचे) झाल्यासारखी म्हणजे जनावरांसारखी किंवा केवळ प्रेयाला कवटाळणार्‍या भोगी दानवांसारखी वागतात.’ वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्यांच्यावर सामाजिक मूल्यांचं पालन करण्याची, समाजाला प्रगतीच्या दिशेनं नेण्याची, यासाठी आवश्यक ती क्रांती करण्याची नैतिक जबाबदारी (उत्तरदायित्व) असते ते मध्यमवर्गीय, बहुशिक्षित, शहरी लोक खूप आपमतलबी (स्वार्थी) आणि संकुचित वृत्तीचे बनलेयत. सारे प्रवासी झालेयत प्रेयमार्गाचे. क्वचित् एखादा पथिक श्रेयमार्गानं जाताना दिसतो पण त्याचा म्हणावा तसा प्रभाव समाजावर पडत नाही.

ज्यावेळी गगनचुंबी इमारती माणसाला राहण्यासाठी बांधल्या गेल्या तेव्हा त्यातील फ्लॅट्‌स, ब्लॉक्स नि अपार्टमेंट्‌सना एक छान नाव दिलं गेलं ‘पिजनहोल्स (कबूतरांची बिळं)’. खरं तर कबूतरं राहतात वळचणीला, गुटुरगू गुटुरगू करत पडलेले दाणे वेचणं आणि पिलावळ वाढवत राहणं याखेरीज आयुष्यात काही काम नसतं. आपल्याच प्रपंचात एवढी गुरफटून गेलेली असतात की जाळ्यात अडकलेल्या पिलांना सोडवता येत नाही म्हणून स्वतःही जाळ्यात उडी टाकून स्वतःचं जीवन संपवतात त्या कपोता- कपोतीला (कबूतर- कबूतरीला) दत्तगुरुंनीही नकारात्मक गुरु केलंय.
राजहंसासारखी ‘योगारूढ-(श्रेयस्कर)’ अवस्था साधण्याची क्षमता असूनही ‘योगच्युत-(केवळ देहभोगी)’ अवस्था निवडणार्‍या कबूतरासारखं जगण्यात काय अर्थ आहे? काय माणूसपण आहे?