‘सचिनच्या विकेटमुळे ठार मारण्याची धमकी’

0
138

ओव्हल येथे २०११ साली सचिन तेंडुलकरला वैयक्तिक ९१ धावांवर बाद केल्यामुळे मला व पंच रॉड टकर यांना प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले, असे इंग्लंडचा माजी मध्यमगती गोलंदाज टिम ब्रेस्नन याने सांगितले आहे.

सचिनचे ‘ते’ शतक पूर्ण झाले असते तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांची सेंच्युरी त्याने पूर्ण केली असती. ‘सचिन बाद झालेला चेंडू लेगस्टंप सोडून बाहेरच्या दिशेने जात होता. परंतु, ऑस्ट्रेलियन पंच टकर यांनी बाद ठरविण्याचा इशारा करण्यासाठी जरासुद्धा वेळ दवडला नाही. सचिन त्यावेळी ८०च्या आसपास (९१ धावा) खेळत होता. सचिनने आपले शतक पूर्णदेखील केले असते’, असे ब्रेस्नन याने ‘यॉर्कशायर क्रिकेट ः कव्हर्स ऑफ’ पोडकास्टमध्ये सांगितले.

सचिनचा बळी घेतल्यानंतर मला व पंचांना ठार मारण्याच्या धमक्या येण्याचा सिलसिला सुरू झाला, असे ब्रेस्नन याने सांगितले. मला ट्विटरद्वारे तर पंचांना त्यांच्या घरच्या पत्यावर पत्रांद्वारे धमक्या येत होत्या. सचिनला बाद देण्याची तुमची हिंमत कशी झाली, चेंडू सरळसरळ लेगस्टंप सोडून बाहेर जात होता, अशा आशयाच्या धमक्या होत्या, असे ब्रेस्नन म्हणाला. पंच टकर यांनी या धमक्यांनंतर आपल्या सुरक्षेत वाढदेखील केली होती, असे ब्रेस्नन याचे म्हणणे आहे.