Home बातम्या कधी मोहाच्या चार क्षणांना…..

कधी मोहाच्या चार क्षणांना…..

0

– अखिलेश, पणजी

‘द अल्केमी ऑफ डिझायर’ साठी ब्रिटनमधील पुरस्काराने लेखनाच्या क्षेत्रात प्रथम पदार्पणातच सन्मानित होऊन नंतर ‘तेहेलका डॉट कॉम’च्या ई-पत्रकारितेतून नावारूपास येऊन स्टिंग ऑपरेशन्स करून भल्याभल्यांना नामोहरम अन् सळो की पळो करून सोडलेल्या तेजतर्रार तरुण तेजपालना आज ‘निस्तेजपाल’ होऊन ‘पळता भुई थोडी’ झालेला पाहताना ‘काय होतास तू, काय झालास तू’ म्हटल्याशिवाय राहवत नाही. 
दमदार लेखन कौशल्य, आकाशाला गवसणी घालणारे विचार, ‘थिंक फेस्ट’सारख्या विचारमंथनातून घडवून आणले जाणारे उच्च दर्जाचे विचारमंथन.. त्या महोत्सवात भल्या भल्या दिग्गजांना पाचारण करून..बंदिस्त फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घडवून आणणारा विचारमहोत्सव आम्ही फक्त वर्तमानपत्रातून वाचून – दुधाची तहान ताकावर  भागवायचो. हे एवढे उच्च दर्जाचे विचार दर्शन घडवितानाच त्याच महोत्सवादरम्यान लिफ्टमध्ये उभ्या उभ्या मोहाच्या चार क्षणांना बळी पडून…मिठीत अलगद मिटूनी जात साक्षात हिमालयाने विरघळावे… याला काय म्हणावे?.. अन् तेही मुलीच्या वयाच्या षोडशेशी गैरवर्तन.. हा हन्त..हन्त.. पत्रकारितेला काळीमा फासणारी ही घटना घडून जाऊन तब्बल पंधरा दिवसांनी जगजाहीर होते.. 

पीडितेने तक्रार न नोंदविताही आपल्या सरकारने पार पाडलेली भूमिका पाहता हे केवळ मनोहरपंतांच्या हुशारीमुळेच घडू शकले हे ही मान्य करावे लागेल बुवा. घडणार्‍या घटनांचा क्रम लावू जाता शिकारीच शिकार्‍याच्या जाळ्यात कसा सापडला हे पाहणे मोठे उद्बोधक ठरले.
‘चार्लस् शोभराज’ च्या वेळी जशी सनसनाटी माजून जगभर गोव्याचं नाव झालेलं तसंच काहीसं अगदी जगद्विख्यात नसलं तरी खळबळजनक बातम्यांनी उभा देश हादरला म्हणायला हवं.
अगदी लहान वयात आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर स्टिंग ऑपरेशननी तहलका माजविलेल्या या प्रतिभावंत तरुणाला आपल्या एका बेसावध क्षणी वासनांधता अशा प्रकारे गोत्यात आणील हे कालपर्यंत कल्पनेपलीकडचे होते.
आता वकिली डावपेच खेळले जाणार.. होत्याचे नव्हते अन् शब्दांचा कीस पाडत.. एकूण प्रकरण काय ते समोरच येणारच आहे. परंतु आपल्या शोधपत्रकारितेतून मोठ्या दिग्गजांना ज्यांनी बसल्याजागी घाम फोडला ते आज कसे मनोमन सुखावून गेले असतील..! 
वाजपेयींचे सरकार ऐन बहरात असताना आठवा ते दूरदर्शनच्या सर्व चॅनल्सवरून टेबलाखालून नोटा मोजताना पाहिलेले ‘बंगारू लक्ष्मण’ भाजपाला गोव्यात आणताना कुर्‍हाडीचा दांडा ठरले ते बंगारू लक्ष्मण… याच तरुण तेजपालनी काय डोकं लढवून शिताफीने कॅमेरात बंद केलेलं. भाजपावर नामुष्की आणली ती त्या टेबलाखालून घेतल्या गेलेल्या केवळ एक लाख रुपयांनी. नंतर दयानिधी मारन सारख्यांची गच्छन्ति झाली ती पण या तेजतर्रार तेजपालांमुळेच. सगळे एकाच माळेचे मणी म्हटले गेले ते या तरुण तेजपालांच्या स्टिंग ऑपरेशन मोहिमांनीच. अशाने ते कॉंग्रेसच्या गळ्यातले ताईत न बनले तरच नवल! नाही तरी त्यांचा ओढा हा कॉंग्रेसकडेच होता. मागील सरकारने त्याच्या थिंक फेस्टसाठी मोजून ४५ लाख मोडावेत यातच सर्वकाही आले. 
परवा आम आदमी पार्टीच्या उमेदवारांच्या दाखविलेल्या चित्रफिती हा तर धोखादडीचा मामला होता असं सिद्ध झालं.. कदाचित त्या चित्रफिती सुद्धा..? हे असं म्हणावं लागतं, कारण ज्यांनी हे घडवून आणलं त्यांचेच पाय मातीचे… म्हटल्यावर..
चार राज्यात निवडणुकांचे वारे… लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे.. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत… राजकीय क्षितिजावर झालेला विकास पुरुषाचा उदय… नमोचा डंका… त्यात आसारामबापू प्रकरण… रामदेवबाबांवर होणारी चिखलफेक… कुठे चीफ जस्टिसांवर यौन उत्पीडनाचा आरोप… ही तर कमालच झाली. या सर्व गदारोळात एकच बातमी सुस्कारा सोडण्यासारखी- कांची पीठाच्या शंकराचार्यांची शंकररमण खून प्रकरणातून इतर तेवीस जणांसोबतची सुटका. भ्रष्टाचाराची बजबजपुरी, महागाईचा आगडोंब अन् हे तेहलका डॉट कॉमचं प्रकरण. गोवा राज्यात गुन्हा घडल्यानेच प्रकरणाला वाचा फुटली म्हणावं तर… वास्कोतील रेप प्रकरण ते गुलदस्त्यातच राहिलंय… त्याचं काय?.. असंही वाटून गेलं. 
एवढं सगळं होऊन – तरुण तेजपालांना याही परिस्थितीत मिळणारी ही प्रसिद्धी पाहून माझीही पावले त्याला कॅमेराबंद करण्यासाठी रोखून धरलेल्या मॅजिस्ट्रेट ऑफिसच्या बाहेर काही काळ घुटमळलीच… काय एन्जॉय करत असतील ही बडी धेंडं हे मनात आलं. नाहीतरी शेवटी कित्येकदा बघूनही आज या उतारवयातही विमानाची घरघर ऐकल्यावर माझं मन आकाशात झेपावतंच. सवय एकेकाची… जाईल कशी?