कदंबच्या १२५ नव्या बसेस जानेवारीपर्यंत येणार

0
91

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहर विकास (जनरूम) योजनेखाली कदंब महामंडळाला १२५ बसेस मंजूर झालेल्या असून त्या येत्या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात आणण्यात येणार असल्याची माहिती कदंब महामंडळातील सूत्रांनी दिली.
कदंब महामंडळाला वरील योजनेखाली ज्या १२५ बसेस् मिळणार आहेत त्यात मिनी बसेस तसेच मोठ्या बसेस् यांचा समावेश आहे. वरील योजनेखाली या बसेस् खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून कदंब महामंडळाला ५६ कोटी रु. एवढा निधी मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
वरील योजनेखाली मिळणार असलेल्या या बसेस् खरेदी करण्यापूर्वी काही सोपस्कार पूर्ण करण्याची गरज असून ते पूर्ण न केल्यामुळेच बसेस् आणणे लांबणीवर पडले असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
या बसेस्‌पैकी काही बसेस् पणजी-मडगांव व पणजी-वास्को शटल सेवेत सामावून घेण्यात येणार आहे.
कदंब महामंडळाने प्रवाशांसाठी सवलतीच्या दरात मासिक पास योजना सुरू केल्यापासून कदंबमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत उल्लेखनीय अशी वाढ झालेली आहे. त्यामुळे महामंडळाला बसेस्‌ची उणीव भासू लागलेली आहे.