गॅस सिलिंडर काळाबाजारप्रकरणी भरारी पथक प्रक्रिया पूर्ण

0
82

नागरी पुरवठा खात्याची कृती योजना
नागरी पुरवठा खात्यातर्फे वितरीत करण्यात येणार्‍या धान्याचा तसेच स्वयंपाक गॅस सिलींडरचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी वाढल्याने खात्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.
खात्याच्या साहाय्यक संचालकांच्या नेत्त्वाखाली हे भरारी पथक असेल. दरमहा किमान तीन ठिकाणी छापा टाकून तपासणी करण्याची सक्ती या पथकांना आहे.
या पथकात खात्यातील लेखा अधिकारी, निरीक्षक तसेच संबंधित तालुक्यातील निरीक्षक, उपनिरीक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. एलपीजीची तपासणी करण्यासाठी जाताना संबंधित तेल कंपन्यांची व पोलिसांची मदत घेण्याची तरतूद आहे. राज्यात धान्याप्रमाणेच एलपीजीचाही काळा बाजार होतो.
घरगुती वापरासाठी असलेले एलपीजी सिलिडर व्यापारी आस्थापनांमध्येही वापरण्यात येतात. अशा प्रकारात नियंत्रण ठेवण्यासाठी नागरी पुरवठा खात्याने आता महत्वाची पावले उचलली आहेत.
नागरी पुरवठा खात्यातर्फे पुरविण्यात येत असलेले धान्य संबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी सोसायट्या व अन्य रास्त दराच्या धान्यांच्या दुकानांवर नजर ठेवण्याचा आदेश खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिला आहे.