कंपनगती ः सकारात्मक- नकारात्मक

0
4

(योगसाधना- 618, अंतरंगयोग- 205)

  • डॉ. सीताराम घाणेकर

अत्यंत सूक्ष्म गोष्ट त्या वातावरणावर परिणाम करते. ती म्हणजे, तेथील कंपने! ही कंपने मुख्यत्वे दोन प्रकारची असतात- सकारात्मक व नकारात्मक. कंपनेदेखील विविध जागांप्रमाणे वेगवेगळी असतात.

अनेक वेळा विविध कार्यक्रमांसाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी जातात- मुंज, साखरपुडा, लग्न, वाढदिवस, परिषदा वगैरे. ठिकाणंसुद्धा अनेक- हॉटेल, मंदिर, सभागृह, आश्रम वगैरे. प्रत्येक ठिकाणी भाव वेगवेगळा असतो- एका व्यक्तीचा किंवा अनेक व्यक्तींचा. याची कारणे अनेक आहेत- तिथले वातावरण, कार्यक्रमाचा विषय व रूपरेषा, जिथे जमणाऱ्या व्यक्ती व त्यांचे परस्परांतील संबंध… या सर्व गोष्टी भौतिक पातळीवरील आहेत. पण एक अत्यंत सूक्ष्म गोष्ट त्या वातावरणावर परिणाम करते. ती म्हणजे, तेथील कंपने! ही कंपने मुख्यत्वे दोन प्रकारची असतात- सकारात्मक व नकारात्मक. कंपनेदेखील विविध जागांप्रमाणे वेगवेगळी असतात. उदा.

  • आश्रम, मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्च यांसारखी धार्मिक स्थळे.
  • हॉटेलातील हॉल, शॉपिंग मॉल, स्मशान.
  • भाजी विकण्यासाठी वापरतात ती जागा म्हणजे मार्केट (अर्थात शाकाहारी).
  • मासळी, मांस विकण्याची जागा अथवा कत्तलखाना.
    मांस-मच्छीच्या ठिकाणी दुर्गंधी जास्त असते, त्यामुळे मनावर थोडा परिणाम होईल. त्याशिवाय विविध जनावरांचे टांगलेले मांस व त्याची कत्तल करताना त्यांच्या मनातील भाव- वेदना, भय, आक्रंदन, राग… याचा परिणाम आपल्यावर अवश्य होतो. शाकाहारी व्यक्तींवर तो जास्त जाणवतो; पण नियमित मांसाहार करणाऱ्यांवरदेखील काही अंशी परिणाम हा होतोच. त्याशिवाय जे आजन्म शाकाहारी असतात ते शाकाहारी भोजनालयातच जायला उत्सुक असतात. कारण ज्या भोजनालयात मांसाहारी जिन्नस मिळतात, तिथे त्या शाकाहारी भोजनालादेखील त्यांना थोडातरी वास वेगळा जाणवतो. ही फक्त मानसिक पातळीवरील बाब नाही तर सूक्ष्म आध्यात्मिक पातळीवरदेखील असू शकते. ही गोष्ट जे नियमित साधना करतात त्यांना सहज समजू शकते; इतरांना समजेलच याची खात्री नाही. अनेकांचा संबंध शाकाहारी, सात्त्विक साधकांबरोबर असतो, त्यांना विचारले तर याचा अनुभव येऊ शकतो.

आपल्या समाजात काही जैन व्यक्ती आहेत. ते तर कांदा, लसूण या गोष्टी तामसिक मानतात. ते सहसा मांसाहारी हॉटेलात जाणे टाळतात.
यासंदर्भात मला ॲनी बेझंटबद्दल वाचलेली एक घटना आठवते. ती अशी- ॲनी आपल्या राहत्या घरातून कार्यालयाकडे रोज आगगाडीमधून जात असत. प्रवासात एका स्टेशनवर गाडी पोचल्यावर त्यांना नकारात्मक कंपने जाणवत असत. हा अनुभव त्यांना नियमित येत असे; पण कारण माहीत नव्हते.
एक दिवस त्यांनी आपल्या गुरूला यासंबंधी विचारले. त्यांनी सांगितले की याबद्दलचे सूक्ष्म संशोधन तुम्हालाच करायचे आहे. तुम्ही त्या स्टेशनवर उतरा आणि नकारात्मक कंपनांच्या दिशेने चालायला लागा, आपोआप तुम्हाला कळेल की ही कंपनी कुठून येतात?
त्याप्रमाणे ॲनी दुसऱ्या दिवशी ‘त्या’ स्टेशनवर उतरल्या व गावाच्या दिशेने चालायला लागल्या. चालता चालता थोडी थोडी ती कंपने वाढतच गेली. शेवटी त्या एका कत्तलखान्याकडे पोचल्या आणि कंपने शिगेला पोचली. तिथून मांसाची दुर्गंधी येत होती व कत्तलखान्यात गुरांचे मांस टांगलेले होते. या सर्व गोष्टी- दृश्य व दुर्गंधी- त्यांना असह्य झालीच, पण कंपनांमुळेदेखील त्यांचे मन अस्वस्थ झाले. त्या मागे वळून पळतच स्टेशनवर आल्या आणि गाडीत चढल्या. गाडी पुढे जात होती तशी ती कंंपनेदेखील विरून गेली.

ज्या व्यक्ती आध्यात्मिक साधना शास्त्रशुद्ध करतात त्यांना अनेकवेळा असे अनुभव व अनुभूती येतात.
काहीजणांना मृत व्यक्तीकडे जाताना, अंत्ययात्रेत सहभागी होताना अथवा शेवटी प्रेताला अग्नी देताना थोडा त्रास होतो. थोड्या अंशी दुर्घटनेमुळे मानसिक त्रास अवश्य होतो. मृत्यू ही घटना जरी दुःखदायक असली तरी त्याबद्दल भारतीय दृष्टिकोन वेगळा आहे. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर- अजर- अविनाशी आहे. मृत्यूनंतर तो आत्मा नष्ट होत नाही तर त्याचे परमधामात प्रयाण सुरू होते. कर्मबंधनाप्रमाणे त्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. श्रीमद्‌‍ भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायात- सांख्ययोगात- भगवान कृष्णाने अर्जुनाला निमित्त बनवून संपूर्ण मानवजातीला या गूढ सूक्ष्म विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे.
गीता म्हणजे एक संपूर्ण योगशास्त्रच आहे. ती सांगणारा म्हणजे गाणारा योगेश्वर श्रीकृष्ण आहे. प्रत्येक योगसाधकाने इतर विविध योगशास्त्रांबरोबर गीताभ्यास केला तर अनेक गैरसमज दूर होतील. जीवनातील संकटांना सामोरे जाण्यासाठी त्यांच्यातील आत्मिक बळ वाढेल. जीवन सुसह्य होईल. सर्व समस्यांचा सामना करता करता सुखी-समाधानी जीवन कसे जगावे याबद्दल सामान्यांना पुष्कळ ज्ञान मिळेल.
तत्त्ववेत्त्यांप्रमाणे स्मशान म्हणजे शिवशंकराचे स्थान. तिथे मृतांना अग्नी अवश्य दिला जातो. पण जर योग्य ज्ञान आत्मसात केले तर येथील वातावरण जरी दुःखदायक असले व आध्यात्मिक पातळी उच्च असली तर मनाला व आत्म्याला तेवढे क्लेश होत नाहीत. सगळे सुसह्य होऊन जाते. म्हणून नियमित शास्त्रशुद्ध योगसाधना अपेक्षित आहे.

स्मशानात मृताला अग्नी देतेवेळी गीतेतील पंधरावा अध्याय- पुरुषोत्तमयोग- उपस्थितांनी म्हणायचा असतो. पुरोहित स्वतः इतर कर्मकांडांबरोबर अध्यायाचे पारायण करतात. हा अध्याय जीवात्माविषयी आहे. अध्यायाच्या शेवटच्या विसाव्या श्लोकात भगवंत अर्जुनाला सांगतात-
इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मयानघ।
एतद्बुद्ध्वा बुद्धिमान्स्यात्कृतकृत्यश्च भारत॥

  • हे निष्पाप अर्जुना! असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे. याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो.
    शास्त्रकार असेही प्रतिपादन करतात की या अध्यायाच्या पारायणामुळे आत्म्याला सद्गती प्राप्त होण्याची शक्यता वाढते. शेवटी त्या व्यक्तीचे कर्म आहेच त्याला गती देण्यास. म्हणूनच प्रत्येक सुजाण व्यक्तीने गीताभ्यास करून सत्कर्माद्वारे सद्गती मिळवायचा प्रयत्न अवश्य करावा. गीताशास्त्र यासंदर्भात अत्यंत प्रभावी व आवश्यक आहे.

अनेकांना हे ज्ञान नसल्यामुळे स्मशानातही गटागटांत चर्चा चालू असते- विविध विषयांवर- मुख्य म्हणजे फालतू विषयांवर गप्पाटप्पा चालू असते. त्यात जास्त पराध्याय, राजकारण असे विषय प्रमुख असतात. गीता पारायण जमत नसल्यास अशावेळी निदान मृत माणसाच्या गुणांची आठवण करावी. त्यांनी केलेले सत्कर्मे इतरांना सांगावी. शेवटी प्रत्येक व्यक्तीचे गुणदोष असतातच. त्याशिवाय थोड्या मंद आवाजात एकट्याने बाजूला बसून अथवा गटामध्ये राहून मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र म्हणत राहावा. स्वतःलाही शांती मिळेल व मृतात्म्यालादेखील बरे वाटेल- त्याच्या परतीच्या प्रवासात.

अनेकवेळा आपणातील अनेकजण वेगवेगळ्या संस्थांच्या आश्रमात जातात- कार्यक्रमासाठी, शिबिरासाठी. तिथे अनेक साधक निःस्वार्थपणे स्वेच्छेने सर्व तऱ्हेची कामे प्रेमाने व सहकार्याने करीत असतात. त्याशिवाय विविध आध्यात्मिक विषयांवर चर्चासत्रे, प्रवचने चालू असतात. सगळीकडे शांतता असते. भोजन महाप्रसादाच्या रूपाने- भगवंताला प्रसाद अर्पण केल्यानंतर- केले जाते. त्यात सात्त्विकता असते. बनवणारादेखील सात्त्विक वृत्तीने भोजन बनवतो आणि वाढणारादेखील प्रेमाने वाढतो. अशा वातावरणात नकारात्मक विचार कमी येतात. झोप शांत लागते. प्रत्येकाला हे सर्व हवेहवेसे वाटते. पण शिबिरानंतर आपण परत घरी परततो. कार्यालयात जातो. तिथे परत पूर्वीचेच वातावरण असते- बहुधा तणावकारक.
शास्त्रकार म्हणूनच सांगतात की प्रत्येक जागा- घर, कार्यालय आपण आश्रमासारखी बनवू शकतो. एका व्यक्तीनेदेखील त्या दिशेने कार्य सुरू केले तरी सफलता नक्की मिळते. कदाचित थोडा वेळ लागेल, पण यश ठरलेले!!