औद्योगिक वसाहतींत थेट प्रवासी वाहतूक

0
313

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती, कदंब महामंडळाचा ४० वा वर्धापनदिन

कदंब वाहतूक मंडळाच्या माध्यमातून गाव ते औद्योगिक वसाहती दरम्यान थेट प्रवासी वाहतुकीची व्यवस्था करण्यावर विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे काल दिली.

कदंब वाहतूक महामंडळाच्या ४० व्या वर्धापनदिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. यावेळी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो, कदंब महामंडळाचे अध्यक्ष आमदार कार्लुस आल्मेदा, पणजीचे महापौर उदय मडकईकर, वाहतूक खात्याचे संचालक राजन सातार्डेकर, कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व्हिनान्सियो फुर्तादो, सरव्यवस्थापक संजय घाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.

साखळी ते वेर्णा दरम्यान तीन पाळ्यांमध्ये थेट प्रवासी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर काणकोण, सांगे, वाळपई, डिचोली, पेडणे आदी भागातून थेट वेर्णा, कुंडई आदी औद्योगिक वसाहतींमध्ये थेट प्रवासी वाहतुकीचा आराखडा तयार करण्याची सूचना करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सोयीसाठी ही व्यवस्था केली जात आहे. औद्योगिक वसाहतींमध्ये थेट प्रवासी वाहतूकप्रश्‍नी उद्योजक आस्थापनांशी चर्चा केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

मार्चअखेर ५० इलेक्ट्रिक बस
कदंब वाहतूक महामंडळाच्या ताफ्यात येत्या डिसेंबरअखेर २५ अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसगाड्या आणि मार्च २०२१ पर्यंत आणखी २५ इलेक्ट्रिक बसगाड्या मिळून आर्थिक वर्षअखेर एकूण ५० इलेक्ट्रिक बसगाड्यांचा समावेश केला जाणार आहे. तसेच डिसेंबर २०२१ अखेर आणखी १०० बसगाड्यांचा समावेश केला जाणार आहे. आणखी १०० बसगाड्यांना मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत दिली.

राज्यातील प्रमुख बसस्थानकांचे बांधकाम पीपीपीच्या माध्यमातून केले जाणार आहे. साखळी, वास्को आदी ठिकाणच्या बसस्थानकाचे काम वर्ष २०२२ पर्यत पूर्ण केले जाणार आहे. राज्यात बांधण्यात आलेली तीन बसस्थानक गेली कित्येक वर्षे वापराविना पडून आहेत. राज्यातील बसस्थानकावर चांगल्या साधन सुविधा उपलब्ध करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर बांधकामे हाती घेण्यास प्राधान्य दिले जात आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. कदंब महामंडळ आणि खासगी बसमालक यांच्यात समन्वय साधून नागरिकांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी चर्चा सुरू आहे, अशी माहिती वाहतूकमंत्री गुदिन्हो यांनी दिली. कदंबच्या ताफ्यात समाविष्ट होणार्‍या मोठ्या इलेक्ट्रिक बसगाड्या लांब पल्ल्याच्या तर, लहान बसगाड्या राज्यातील विविध प्रवासी मार्गांवर सुरू केल्या जातील.

महामंडळाने महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये १६ बसगाड्या सुरू केल्या आहेत. मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर आदी लांब पल्ल्याच्या मार्गावरील बससेवा सुरू केलेली नाही, अशी माहिती आल्मेदा यांनी दिली.