प्लाझ्मा थेरपी हवीच

0
230


कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये अगदी सुरवातीपासून नवप्रभा अग्रेसर राहिला आहे. भले कोणी त्याला ‘कोविड योद्धा’ म्हटले नसेल, परंतु पावलोपावली गोमंतकीय जनतेच्या सुरक्षिततेसाठी सरकारला भानावर आणण्याचे कर्तव्य आम्ही अखंड बजावले आहे, याला वाचक साक्षी आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे विश्‍लेषण करीत आणि त्यामध्ये गोमंतकीय जनतेचे हित सामावलेले आहे की अहित याचा निडर पंचनामा करीत आजवर आम्ही कोरोनाचे वास्तव चित्र वेळोवेळी जनतेसमोर उभे केले. केवळ नकारात्मक भूमिका आम्ही कधी घेतली नाही आणि निव्वळ सकारात्मकतेच्या अट्टहासापोटी खोटे गोंडस चित्रही उभे केले नाही. जे जसे आहे ते तसे आम्ही मांडत आलो. सध्या कोरोना रुग्णांमध्ये घसरण झाल्याचे जे चित्र दिसू लागले आहे, तेही फसवे असू शकते आणि योग्य खबरदारी घेतली नाही तर येणार्‍या सणासुदीच्या काळात गोवा पुन्हा संकटात सापडू शकतो, अशा निष्कर्षाप्रत आम्ही सध्या आलो आहोत आणि आम्ही परखडपणे तो मांडलाही होता.
राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नुकतीच ही वस्तुस्थिती स्वीकारल्याचे दिसले. सध्याची कमी दिसणारी आकडेवारी ही फसवी असू शकते, त्यामुळे येणार्‍या काळामध्ये राज्यात चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो. जास्त चाचण्या होतील आणि तरीही रुग्णसंख्या कमी दिसेल तरच कोरोना रुग्णांची संख्या राज्यात घटते आहे असे मानण्यास वाव राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशभरामध्ये कोरोनाच्या चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज स्पष्टपणे व्यक्त केलेली आहे. चाचण्याच जर कमी झाल्या असतील, तर बाह्यांगी रुग्णसंख्या कमीच दिसणार. त्यामुळे जास्तीत जास्त कोविड चाचण्या होतील यासाठी राज्य सरकारने येणार्‍या काळात जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यामध्ये अर्थात मोठी अडचण उभी राहणार आहे ती येथे येणार्‍या पर्यटकांची. दिवसागणिक लोटणार्‍या पर्यटकांच्या लोंढ्यामुळे अशा प्रकारच्या चाचण्यांद्वारे जनतेला सुरक्षित करण्याचा मार्गच खुंटणार आहे, कारण येणार्‍या पर्यटकांसोबत कोरोना येण्याची टांगती तलवार राज्यावर कायम राहील, परंतु त्याला आता इलाज नाही. किमान येणार्‍या पर्यटकांकडून कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन होईल एवढे तरी सरकारने जरा कठोरपणे पाहावे.
दुसरा मोठा निर्णय आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे तो प्लाझ्मा थेरपी गोव्यात सुरू ठेवण्याचा. आयसीएमआरने प्लाझ्मा थेरपी ही कोरोनावर कुचकामी असल्याचा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढला आणि त्याच्या आधारे देशातील कोरोनावरील उपचारांच्या प्रोटोकॉलमधून प्लाझ्मा थेरपी वगळण्याच्या निर्णयाप्रतही आयसीएमआर आलेली आहे. परंतु मुळात ज्या अभ्यासाच्या आधारे आयसीएमआर त्या निष्कर्षाप्रत आली त्या पाहणीवर मोठी प्रश्नचिन्हे वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहेत. प्लाझ्माचा एक डोस दिलेले २२९ रुग्ण आणि दोन डोस दिलेले २३५ रुग्ण मिळून अवघ्या ४६४ रुग्णांच्या अभ्यासातून प्लाझ्मा कुचकामी ठरल्याचा निष्कर्ष काढताना मुळात या रुग्णांना दिल्या गेलेल्या प्लाझ्मामध्ये ‘न्युट्रलायझिंग ऍँटीबॉडीज’ होत्या का हे पाहिलेच गेले नव्हते हा या तज्ज्ञांनी घेतलेला पहिला आक्षेप आहे. हा अभ्यास सुरू झाला एप्रिलमध्ये, जेव्हा भारतीयांमध्ये कोरोनाच्या अँटिबॉडिज मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे मुळातच रक्तामध्ये कोरोनाशी लढणार्‍या न्युट्रलायझिंग अँटिबॉडिज हव्या त्या प्रमाणात निर्माण झालेल्या नसतील, तर त्या उपचारांतून यश कसे येणार असे त्यांचे म्हणणे आहे. प्लाझ्मा ट्रान्सफ्यूजननंतर हा अभ्यास केला गेल्याने त्याला मर्यादा आहेत असे त्यांना वाटते. त्यामुळे आयसीएमआरचा सदर निर्णय वादात सापडलेला आहे. या पार्श्वभूमीवर आयसीएमआरशी असहमती दर्शवीत प्लाझ्मा थेरपी पुढे सुरू ठेवण्याचा गोवा सरकारचा निर्णय धाडसी आहे, परंतु तो प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे. राज्यात २६३ रुग्णांना प्लाझ्मा थेरपी दिली गेली, त्यापैकी सत्तर टक्के बरे झाले आहेत. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेही त्यामध्ये येतात. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे देखील बरे झाले ते प्लाझ्मा थेरपीमुळेच. त्यामुळे गोव्यामध्ये जर प्लाझ्मा थेरपीचे फायदे दिसून आलेले असतील तर केवळ आयसीएमआर सांगते म्हणून ते उपचार बंद करणे योग्य ठरले नसते. दिल्ली किंवा शेजारच्या कर्नाटकमध्येही प्लाझ्मा थेरपीच्या समर्थनार्थ तज्ज्ञ उभे ठाकलेले दिसत आहेत. कर्नाटकात नऊशे रुग्णांवर तेथील बीएमसीआरआयने केलेल्या चाचण्यांत साठ टक्के यश प्राप्त झालेले आहे. त्यामुळे आयसीएमआरने आपल्या निर्णयाबाबत पुनर्विचार करणे गरजेचे आहे. गोव्याने प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवावी. त्यातून काही रुग्णांचे जरी प्राण वाचू शकले तरी तो जनतेला मोठा दिलासा ठरेल.