ओवाळीते लाडक्या भाऊराया!

0
1108

– सौ. लक्ष्मी जोग

या जगात बहिण-भावाच्या नात्याइतके परम पवित्र, सुंदर आणि हृद्य नातं दुसरं कोणतंही नसेल. एकाच झाडाला दोन भिन्न गुणधर्म असलेली दोन गोड फळं फक्त मानव प्राण्यांतच असू शकतात. कारण इतर प्राणीमात्रांत बहिण-भाऊ म्हणून जन्मलेल्यांत ते नातं इतकं पवित्र न राहता ते नर व मादी असं होत जातं. म्हणूनच मानवातील बहिण भावाचं नातं सर्वश्रेष्ठ आहे. आजन्म ही भावंडं केवळ शुद्ध व पवित्र नजरेनेच एकमेकांकडे पहातात.

आपल्या भारतीय संस्कृतीत कुटुंबातील प्रत्येक नात्याला अनन्यसाधारण महत्त्व मिळालेलं आहे. त्यातलंच एक बहिण-भाऊ नातं! जीवाला जीव देणारं! घासातला घास देणारं! बहिण लग्न करून सासरी गेली तरी ती शरीराने सासरी असते; पण तिचं मन मात्र आपल्या आईवडील व भावाचा विचार करीत असतं. लांब असली तरी तिथूनच ती आपल्या प्राणप्रिय भावावर प्रेमाचा-मायेचा वर्षाव करत असते. आईवडिलांच्या माघारी ती आपल्या भावाला जपत असते. त्याच्यामुळेच तर तिचं माहेर नांदत राहातं. वडिलांच्या पश्‍चात भावातच ती त्याचं अस्तित्व अनुभवते. भाऊही अतिशय प्रेमाने ते गोड ओझे आयुष्यभर मिरवत असतो. प्रत्येक चांगल्या-वाईट प्रसंगात त्याला बहिणीची आठवण येते. कठीण प्रसंगात तिच्या सल्ल्याची तीव्रतेने गरज भासते. बहिण अडचणीत असेल किंवा तिच्यावर एखादेवेळी संकट आले की तो धाऊन जातो हातातलं काम टाकून. असं असतं बहिण भावंडांचं प्रेम! कुटुंबातील म्हणजे सख्ख्या भाऊ-बहिणींच तर असतंच शिवाय चुलत भावंडंही अशीच प्रेमाने बांधलेली असतात. क्वचित रुसवे-फुगवे झाले तरी ‘‘मी तुझ्या बायकोला कजाग नणंद होऊन छळेन’’ आणि ‘‘मी तुला भाऊबीजच घालणार नाही’’ अशी हमरी-तुमरी झाली तरी थोड्या वेळाने जेवायच्या वेळी एकाशिवाय दुसरीचा घांस घशाखाली उतरत नाही असे ते अतुट नातं असतं.
भाऊबिजेच्या दिवशी बहिण सासरी असली की, दारांत रांगोळी काढून, दाराला तोरण लावून, पंचपक्वान्नांचं जेवण तयार करून डोळ्यांत प्राण आणून भावाची वाट पहात असते. कारण आज तिचा लाडका भाऊराया तिच्या घरी येणार असतो. त्याला जराही उशीर झालेला तिला सहन होत नाही. लगेच मन शंकाकुशंकांनी भरून जातं. डोळ्यात अश्रू साठतात. तो दिसला की ती भरून पावते. त्याच्या बदल्यात दुनियेचं राज्यही तिला नको असतं. ती देवाला प्रार्थना करते, ‘‘हे परमेश्‍वरा! त्याला कुठल्याही अनिष्ठाची बाधा होऊ देऊ नको. त्याला विश्‍वातील सर्व सुखे लाभू देत.’’
वसू बारसेपासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होते. धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा होते. रात्री पणत्यांच्या प्रकाशाने आसमंत उजळून निघते. दुसर्‍या दिवशी नरकचतुर्दशी! या दिवशी पुराणकाळात श्रीकृष्णाने सोळा सहस्र स्त्रियांना बंदिवासात टाकलेल्या नरकासुराचा वध केला व त्या स्त्रियांना मुक्त केलं. म्हणूनच त्या दिवशी दीपोत्सव साजरा करतात. घराघरांत रोषणाई करून अंधाराला पळवून लावायचा असतो. अज्ञानरूपी अंधाराचा त्याग करायचा. या दिवसाचे स्वागत सडा-रांगोळ्यांनी करायचे. मिष्ठान्नाचे भोजन करून आनंद साजरा करायचा. कारण भगवंताने दु:खी, दुर्दैवी स्त्रियांना आधार दिला. त्यांचा सन्मान, त्यांच्याशी स्वत: विवाह करून त्यांना मानाने जगण्याचा हक्क प्रदान केला. ही कथा पुराणकाळाची असली तरी आताच्या काळाशीही साम्य दाखवणारी आहे. आजही अनेक पीडित, दु:खी, कष्टी, अन्याय झेलणार्‍या दुर्दैवी बहिणी आहेतच. मधल्या काळात तर अज्ञान, निरक्षरता, अंधश्रद्धा, अनिष्ठ रूढींच्या कोठडीत आया-बहिणी होरपळत होत्या. गांजून करपून जात होत्या. त्यांचे दु:ख हलके करण्यासाठी महर्षी कर्वे, महात्मा फुले – आगरकर यांसारखे समाजसुधारक पुढे आले. त्यांनी अशा बहिणींसाठी असामान्य कामगिरी केली. समाजरोष ओढवून घेऊनसुद्धा त्यांनी तळमळीने आपले काम सुरू ठेवले. त्या बहिणींसाठी ती अमूल्य भाऊबीजच होती.
लक्ष्मीपूजन काहीवेळा त्या दिवशीच असतं तर काहीवेळा दुसर्‍या दिवशी. पाडव्याला गाई-म्हशींची पूजा करून त्यांना ओवाळायचे असते. पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. त्यामुळे अनेक चांगल्या कामांची सुरूवात या दिवशी करतात. या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात व त्याच्यासाठी आयुरारोग्याची कामना करतात. आणि दिवाळीतील महत्त्वाचा दिवस म्हणजे भाऊबीज!
आज भाऊबीज! मानवी जीवनातील एका पवित्र नात्याचा सन्मान करण्याचा सोन्याचा दिवस. आज बहिण भावाला ओवाळते. आजचा दिवस तिच्यासाठी फक्त भावाचा असतो. त्याच्या आवडीचे जिन्नस करणे, त्याची वाट बघणे, त्याच्यासाठी दारांत रांगोळी काढणे, हे ती मोठ्या आनंदाने करते. आज-काल त्याच्यासाठी भेटवस्तू किंवा एखादा त्याच्या आवडत्या रंगाचा शर्ट त्याला देण्यासाठी आणतात. जवळ अंतरावर बहिण राहत असेल तर भाऊ तिच्याकडे जातोच. आणि मग त्यांची प्रेममय भेट होते. आई-बाबांची ख्याली खुशाली विचारली जाते. बहिणीचा सर्व आनंद डोळ्यांत एकवटतो. देण्या-घेण्याचा व्यवहार तिथे नसतोच. या क्षणापुढे सर्व भेटवस्तू तुच्छ असतात. पृथ्वी मोलाची ही भेट दरवर्षी होते तरी नवीच असते.
अशा या रीती, परंपरा कुणी केल्या असतील? स्त्रीला कांहीतरी त्या निमित्ताने द्यायला मिळावं म्हणून घातल्या असतील? स्त्री आयुष्यभर सर्वांसाठी चंदनासारखी झिजत असते म्हणून? की तिचं पतीप्रेम, बंधूप्रेम तोलावं म्हणून केल्या असतील का? नाही! नाही!! त्यांचा गौरव वाढावा म्हणून! नात्यांचा सन्मान व्हावा म्हणूनच हे सर्व योजलं असावं. पाडव्याच्या सुमुहूर्तावर पतीला व भाऊबिजेला भावाला ओवाळायचं. त्यांच्या विषयींचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, टिकावं म्हणून. मानवी जीवनात माणसाच्या अनेक प्रकारच्या स्वभावांमुळे, परिस्थितीच्या चढउतारांमुळे नातेसंबंधात तणाव येत असतात. त्या तणावांची झळ महत्त्वाच्या नात्यांना लागून त्यातील गोडवा, जिव्हाळा कधीही कमी होऊ नये यासाठी भाऊबीजे सारखे हृदयसंगम सण योजलेले असतात. ओवाळताना निरांजनातील ज्या दोन ज्योती असतात त्या सूर्य व चंद्रांचे प्रतिक असते. एकाच वेळी सूर्यासारख्या तेजस्वी व चंद्रासारख्या शीतल किरणांनी आपल्या प्रिय व्यक्तीला औक्षण करणे म्हणजे जीवनात समतोल साधायचा संदेश.
काहीवेळा गरीबी-श्रीमंती यामुळे नात्यांत तणाव येतात. यांतून एक दुसर्‍याचा अपमान करतो जसं शुक्रवारच्या कहाणीत गरीब बहिणीचा अपमान झाला होता. पण स्वाभिमानी बहिणीने यथाकाल जशाच तसे उत्तर देऊन कुठलीही परिस्थिती कायम रहात नाही हे दाखवून दिलं. शुक्रवारच्या कहाणीत या उलट परिस्थिती असू शकते. म्हणजे बहिण श्रीमंत व भाऊ गरीब, अशी. पण माणसाने कुठल्याही परिस्थितीत स्थिर रहायला हवे हा बोध आपण त्यांतून घेतला पाहिजे.
भाऊ-बहिणीच्या प्रेमावर अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक चित्रपट निघाले. अनेक कविताही केल्या गेल्या व गाणीही ऐकायला मिळतात. त्यात ‘शेवग्याच्या शेंगा’ चित्रपटातील ताई आपल्या दोन दुरावलेल्या भावांना युक्तीने एकत्र आणते. बहिण भावासाठी जीवही गहाण ठेवायला तयार असते. भाऊ आजारी असल्यास ‘‘माझे उरलेले आयुष्य माझ्या भावाला दे’’ अशी विनवणी ती देवाकडे करते. लहानपणी पळवून नेलेल्या एका बहिणीला वेश्या व्यवसायाला लावतात. बहिण भावाच्या आठवणीने मनात झुरत असते. ही हकीकत भावाला मोठा झाल्यावर समजते. त्याचेही हृदय बहिणीच्या आठवणीने भळभळत असते. शेवटी अनेक संकटांवर मात करून तो बहिणीला वेश्यांच्या दलालाकडून सोडवून आणतो. अशा अनेक कथा बहिण भावाच्या प्रेमाची महती सांगतात. एखाद्या बहिणीला भाऊ नसेल तर ती चंद्राला ओवाळते. अशा तर्‍हेने बहिण भावासाठी आतुर असते.
आपली भारतीय संस्कृती विश्‍वतत्वाला प्राधान्य देते. ‘हे विश्‍वची माझे घर’ असे ती शिकवते. याला अनुसरून आपल्या आजूबाजूला कुणाला बहिण नसेल किंवा भाऊ नसेल तर ती उणीव आपण ‘त्याला’ ओवाळून किंवा भाऊबिजेला तिच्या घरी जेवायला जाऊन भरून काढू शकतो. असे करणारी अनेक जणं मी पाहिलं आहेत. श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहिण मानली होती. त्याच्या सख्ख्या बहिणीपेक्षाही ती त्याला मान देत होती, हे अनेक प्रसंगातून महाभारतात आपण पाहिले आहे.
भाऊबिजेचा असा व्यापक अर्थ आपण घेऊ शकतो; नपेक्षा आपल्या कुटुंबातील सख्ख्ये चुुलत असा भेद न करता आत्ते, मामे, मावसभावांना आपण ओवाळू लागल्यावर सहजच ओठावर शब्द येतील – ओवाळिते मी लाडक्या भाऊराया!
……….