‘ओमिक्रॉन’ची तीव्रता डेल्टापेक्षा कमी

0
17

>> दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचे मत, भारतात बाधितांची संख्या ३६

‘ओमिक्रॉन’चा फैलाव वेगाने होत असला तरी तो ‘डेल्टा’पेक्षा सौम्य आहे, असे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांनी निरीक्षणानंतर आपले मत व्यक्त केले आहे. ‘ओमिक्रॉन’ या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूने संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत थैमान घातले आहे. दररोज शेकडो लोकांना संसर्ग होत आहे. परंतु बाधितांपैकी कित्येक जणांना सौम्य लक्षणे असून त्यातील खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागत असल्याचे दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या डेल्टा विषाणूपेक्षा ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने होत असूनही त्याची तीव्रता डेल्टाएवढी नाही. त्यामुळे नवा विषाणूचा संसर्ग सौम्य असल्याच्या प्राथमिक निष्कर्षापर्यंत दक्षिण आफ्रिकेतील वैद्यकीय तज्ज्ञ आले आहेत. हा विषाणू सौम्य आहे, मात्र त्याबाबतची अंतिम ठोस माहिती हाती येण्यास आणखी काही काळ जावा लागेल, असे दक्षिण आफ्रिका आरोग्य संशोधन संस्थेचे संचालक विल्यम हेनकोम यांनी स्पष्ट केले.

ओमिक्रॉनचे रुग्ण घरात किंवा १०-१४ दिवसांच्या विलगीकरण कालावधीत बरे होत आहेत. त्यात वृद्ध रुग्ण आणि कोरोना संसर्गाची अधिक जोखीम असलेल्या गटातील व्यक्तींचाही समावेश आहे, असे दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. अनबेन पिल्लय यांनी सांगितले. दक्षिण आफ्रिकेत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण दोन आठवड्यांपूर्वी सापडला. तेव्हापासून रुग्णांवर उपचार करणार्‍या अन्य तज्ज्ञांचेही असेच निरीक्षण आहे. या विषाणूचा संसर्ग डेल्टापेक्षा सौम्य असला तरी या संदर्भात ठोस निष्कर्ष काढण्यासाठी आणखी काही आठवडे जावे लागतील असेही तेथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर
फारसा परिणाम नाही
कोरोना साथीच्या आर्थिक फटक्यातून पुनरागमन करणार्‍या जगातील काही अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या ताज्या मासिक अहवालात व्यक्त केला आहे. भारताने केलेल्या जलद लसीकरणामुळे ओमिक्रॉनचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम फारसा गंभीर नसेल, असेही अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. कोरोना काळात सलग चार तिमाहीत आर्थिक विकासवृद्धी नोंदवणार्‍या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.

सध्या भारतात ५० टक्क्यांहून अधिक नागरिकांनी लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्या आहेत, तर ८६ टक्क्यांहून अधिक पात्र लोकांनी पहिली मात्रा घेतली आहे.

भारतात ओमिक्रॉनबाधित
संख्या पोहोचली ३६वर

दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीनंतर आता आंध्र प्रदेशातही ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेला रुग्ण सापडला आहे. आयर्लंडमधील ३४ वर्षीय प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच चंदीगडमध्येही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला आहे. शनिवारी रात्री उशिरा चंदीगडमध्ये एका तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. २२ नोव्हेंबर रोजी इटलीहून आलेल्या एका २० वर्षीय तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. मुख्य म्हणजे या तरुणाला कोरोनाची कोणतीच लक्षणे नसून त्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

कर्नाटकमध्ये काल रविवारी दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या ३४ वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. राज्यातला हा ओमिक्रॉनचा तिसरा रुग्ण झाले. या रुग्णावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सांगितले. या नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण आमिक्रॉनबाधितांची संख्या ३६वर पोहोचली आहे.