प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्यात

0
5

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री तथा अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांचे काल गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यसभा खासदार लुईझीन फालेरो, तृणमूल कॉंग्रेस नेते किरण कांदोळकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

ममता बॅनर्जी दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर आल्या आहेत. आज सोमवारी आणखी मोठ्या योजना घोषित होण्याची शक्यता आहे.
सोमवारी ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या कन्या वालंका आलेमाव आज सोमवारी तृणमूल कॉंग्रेसमध्ये ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहे.

आज सोमवारी दुपारी १ वाजता त्या राज्यातील विविध दैनिके व केबलवाहिन्यांचे संपादक यांच्याशी संवाद साधणार आहेत. तद्नंतर दुपारी २ वाजता त्या तृणमूल कॉंग्रेसच्या गोव्यातील नेत्यांशी संवाद साधतील, हे दोन्ही कार्यक्रम दोनापावला येथील इंटरनॅशनल सेंटर येथे होणार आहेत.

तद्नंतर ३.३० वा. बाणावली मतदारसंघात एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून ह्या सभेत चर्चिल आलेमाव व वालंका आलेमांव यांना तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश देण्यात येणार आहे.
उद्या १४ रोजी ममता बॅनर्जी यांची पणजी शहरात जाहीर सभा होणार आहे. तर नंतर ५ वाजता अस्नोडा येथेही त्यांच्या एका जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती काल तृणमूल कॉंग्रेस पक्षातील सूत्रांनी दिली.

चर्चिल आलेमाव यांचा वालंकासह आज तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव हे आज सोमवारी आपली कन्या वालंका आलेमाव यांच्यासह तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असून तत्पूर्वी आज ते आपल्या आमदारकीचा राजीनामा सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत.

आपणाबरोबरच आपली कन्या वालंका आलेमाव यांना तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश देतानाच दोघांनाही येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षाची उमेदवारी देण्यात यावी, अशी अट चर्चिल आलेमाव यांनी तृणमूल कॉंग्रेस पक्षाला घातल्याने त्या दोघांच्या तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रवेशाचे घोंगडे गेले काही दिवस भिजत पडले होते. मात्र, आता पक्षाने ह्या वडील-कन्या द्वयींना पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून आज बाणावली मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या कार्यक्रमात प. बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी व पक्षाच्या अन्य नेत्यांच्या हजेरीत चर्चिल व वालंका यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे.