ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानची कसोटी

0
115

श्रीलंका व पाकिस्तानविरुद्ध दोन एकतर्फी टी-ट्वेंटी मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाची मायदेशातील पहिली कसोटी आजपासून पाकिस्तानविरुद्ध असेल. इंग्लंडविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवून ऍशेस आपल्याकडे राखल्यानंतर आपला भन्नाट फॉर्म कायम राखण्याचा कांगारूंचा प्रयत्न असेल तर विश्‍व कसोटी अजिंक्यपद मालिकेतील पाकिस्तानची ही पहिलीच लढत असेल.

१९९५ साली ऑस्ट्रेलियाला सिडनी कसोटीत नमविल्यानंतर पाकिस्तानने सलग बारा कसोटींत ऑस्ट्रेलियाकडून सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे मालिका विजयाचे दिवास्वप्न पाहण्यापूर्वी पाकिस्तानला आपल्या पराभवाची मालिका खंडित करावी लागेल. १६ वर्षीय जलदगती गोलंदाज नसीम शाह याची सर्वत्र चर्चा असली तरी अझर अली व असद शफिक ही दुकली २०१६-१७ मधील मालिकेची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करतील. टी-ट्वेंटी व वनडेत स्वतःला सिद्ध केलेला बाबर आजम त्यांच्या जोडीला असेल. मागील दौर्‍यात बाबरला सहा डावांत केवळ ६८ धावा करता आल्या. परंतु, यानंतर पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे हे अपयश धुवून काढून फिनिक्स पक्षापणे बाबर भरारी मारू शकतो.

ऑस्ट्रेलियाच्या बाजूने विचार केल्यास स्टीवन स्मिथ आपला दमदार फॉर्म कायम ठेवून पाकिस्तानला सतावण्याचे काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. तर ऍशेस मालिकेत ब्रॉडचा ‘बकरा’ बनलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानच्या नवोदित मार्‍याला झोडपून आपला हरवलेला सूर व गमावलेली लय पुन्हा मिळविण्याचा प्रयत्न करेल.
पॅट कमिन्स, जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क हे त्रिकूट मायेदशातील खेळपट्‌ट्यांवरील अचूक मार्‍यासाठी ओळखले जाते. त्यांच्या जोडीला चाणाक्ष नॅथन लायन असेल. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजी ढेपाळली तर आश्‍चर्य वाटण्याचे कारण नसेल.

ऑस्ट्रेलिया संभाव्य ः ज्यो बर्न्स, डेव्हिड वॉर्नर, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रेव्हिस हेड, मॅथ्यू वेड, टिम पेन, नॅथन लायन, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड व मिचेल स्टार्क.
पाकिस्तान संभाव्य ः अझर अली, शान मसूद, हारिस सोहेल, बाबर आझम, असद शफिक, मोहम्मद रिझवान, इफ्तिखार अहमद, यासिर शाह, मोहम्मद अब्बास, शाहिन आफ्रिदी, नसीम शाह.