ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड

0
116

स्टीव स्मिथ व आघाडीचा फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना दाद न देता ऑस्ट्रेलियाला दुसर्‍या दिवसअखेर २ बाद १९३ अशा भक्कम स्थितीत पोहोचविले आहे. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात ३४६ धावा केल्या आहेत. ऍशेस मालिकेतील हा पाचवा सामना सिडनी येथे खेळविण्यात येत आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ नाबाद ४४ व ख्वाजा ९१ धावांवर नाबाद असून या द्वयीच्या जोरावर कांगारूंनी पकड मिळविली आहे. स्टीव स्मिथने आपल्या या खेळी दरम्यान सहा हजार कसोटी धावा पूर्ण केल्या. केवळ १११व्या डावांत त्याने हा मैलाचा दगड ओलांडला. केवळ डॉन ब्रॅडमन (६८ डाव) यांना यापेक्षा कमी डावांत सहा हजारी होता आले होते. सलामीवीर कॅमरुन बॅनक्रॉफ्ट व डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर स्मिथने ख्वाजासह तिसर्‍या गड्यासाठी १०७ धावांची अविभक्त भागीदारी रचली आहे. वॉर्नरने मालिकेतील आपले चौथे अर्धशतक लगावताना ५६ धावा केल्या तर सात चेंडू खेळूनही बॅनक्रॉफ्टला भोपळा फोडता आला नाही.

तत्पूर्वी, टॉम करन (६५ चेंडूंत ३९), मोईन अली (३०) व स्टुअर्ट ब्रॉड (३१) यांच्या मौल्यवान धावांवर आरुढ होत इंग्लंडने साडेतीनशे धावांच्या आसपास मजल मारली. स्मिथने डेव्हिड मलानच्या स्लिपमध्ये वैयक्तिक ६२ धावांवर सुरेख झेल घेतला. परंतु, चार चेंडूंत दोन झेल सोडून कांगारूंनी इंग्लंडला मदतीचा हातदेखील दिला. लायनच्या गोलंदाजीवर कमिन्सने करनचा वैयक्तिक २१ धावांवर झेल सोडला. तर कमिन्सच्या पुढील षटकात हेझलवूडने मोईन अलीला वैयक्तिक २२ धावांवर जीवदान दिले. अलीने यानंतर आपल्या धावसंख्येत ८ धावांची तर करनने १८ धावांची भर घातली.