ऑलिम्पिकमध्ये सिंधूने पटकावले कांस्यपदक

0
41

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे. काल झालेल्या कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंगिजाओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला. याआधी मीराबाई चानुने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर काल सिंधूने आणखी एका पदकाची कमाई केली आहे. यामुळे सिंधू ही ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते.

सुवर्णपदकाचे स्वप्न हुकले
बॅडमिंटनमधील महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या ताय झू-यिंगने सिंधूचा पराभव केल्यामुळे सिंधूचे ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ पदक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.

पंतप्रधान, राष्ट्रपतींकडून अभिनंदन
पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले आहे. मोदींनी तिच्यासोबत असलेला फोटो ट्वीट करत सिंधू देशाचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही सिंधूच्या विजयावर अभिमानास्पद प्रतिक्रिया दिली आहे.