ऐझवालचा बंगळुरू एफसीला दणका

0
80

>>फेडरेशन कप फुटबॉल
नवा आय लीग विजेता बंगळुरू एफसीवर २-१ असा सनसनाटी विजय मिळवीत स्थानिक ऐझवाल एफसीने हिरो फेडरेशन कप स्पर्धेत शानदार सलामी दिली.
येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात उभय संघ मध्यंतराला १-१ असे गोलबरोबरीत होते. युजिनसन लायंगडॉहने १५व्या मिनिटाला पाहुण्या बंगळुरूचा आघाडीचा गोल नोंदला तर ३८व्या मिनिटाला आल्फ्रेड केमाहने बराबेरीचा गोल नोंदवीत यजमानाना १-१ अशी बरोबरी गाठून दिली. अंतिम क्षणात जोएल संडेने (९०वे मिनिट) ऐझवालचा दुसरा व विजयी गोल नोंदला.
पाहुण्या बंगळुरूने मन्यावर प्रारंभिक नियंत्रण राखले आणि पंधराव्या मिनिटाला युनिसनने नोंदलेल्या गोलवर आघाडी घेतली.
ऐझवालने जोरदार प्रतिहल्ले केले आणि चारच मिनिटात संधी मिळाली पण डेविडच्या फ्रीकिकनंतर ‘अनमार्कड’ लालचावनकिमाचा कमकुवत फटका गोलरक्षकाने अडविला. मध्यावधीस डेविडचा फ्रीकिक फटकाही बंगळूरचा गोलरक्षक अरिंदमने झेपावत रोखला. तथापि, ३८व्या मिनिटाला रिकी आणि कर्टीसच्या चढाईवर आल्फ्रेडने चेंडू जाळीत फटकावीत ऐझवालला बरोबरी (१-१) गाठून दिली.
उत्तरार्धात उभय संघानी जोरकस खेळीत गोलसाठी प्रयत्न केले पण ५८व्या मिनिटाला बंगळुरूच्या उदांताचा प्रयत्न पोइरेईने थोपविला तर दहा मिनिटानंतर ऐझवालच्या जायरनचा फटका बाहेर गेला.
अंतिमक्षणात जायरनने प्रतिस्पर्ध्याला चकवीत संडेला बॅक पास दिला आणि त्याने हाणलेला तेज फटका अमरिंदला चकवीत डिफ्लेक्शन’सह जाळीत गेला आणि ऐझवालच्या निर्णायक (२-१) विजयी गोलाची नोंद झाली.