एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कदंबच्या ३७ बसगाड्या रद्द

0
106

>> साडेचार लाखांचे नुकसान; प्रवाशांचे हाल

महाराष्ट्रातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका गोव्यातून महाराष्ट्रात जाणार्‍या शेकडो प्रवाशांना काल बसला. या संपामुळे कदंब महामंडळाने महाराष्ट्रातील विविध भागात जाणार्‍या ३७ बसगाड्या रद्द करण्यात आल्या. यामुळे कदंब महामंडळाला साधारण चार ते साडेचार लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. एसटी कर्मचार्‍यांचा संपावर तोडगा निघाल्यास आज (बुधवारी) कदंबच्या बसगाड्या पूर्ववत सुरू केल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ऐन दीपावलीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांकडून नापसंती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरिक नोकरीनिमित्त गोव्यात वास्तव्य करतात. दीपावलीनिमित्त मूळ गावी परतण्यासाठी काल पणजी बसस्थानकावर आलेल्यांना बससेवा बंद असल्याने त्रास सहन करावा लागला.
एसटी महामंडळाच्या बसगाड्या गोव्यात येतात. त्याच प्रमाणे कदंब महामंडळाच्या बसगाड्या महाराष्ट्रातील विविध भागात प्रवासी वाहतूक करतात. एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे कदंब बसगाड्यांचे नुकसान होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून बससेवा तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे.

गोव्यातून मुंबई, शिर्डी, पुणे या भागात जाणार्‍या खासगी वातानुकूलित बसगाड्या वाहतूक करणार आहेत. या खासगी बसगाड्या ‘नॉन स्टॉप’ तसेच ‘पॉईन्ट टू पॉइंट’ वाहतूक करतात, अशी माहिती सूत्रांनी दिली