>> परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती; सीमेवरील तणाव निवळणार
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अर्थात एलएसीवर गस्त घालण्याबाबत भारत आणि चीन यांच्यात एक नवीन करार झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत काल एक निवदेन जारी करत माहिती दिली. गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत आणि चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी स्तरावर चर्चा सुरू आहे. दोन्ही देशांनी सीमेवरील आपले सैन्य मागे घेण्यासाठी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) पुन्हा गस्त सुरू करण्यासाठी हा नवीन करार केला आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागात गस्त घालण्याशी संबंधित आहे. 22-23 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या 16 व्या ब्रिक्स परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रशिया दौऱ्यापूर्वी ही घडामोड घडली.
परराष्ट्र मंत्रालयाने कराराची रचना आणि प्रक्रिया स्पष्ट केली नसली तरी, संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील मुत्सद्दींमधील अनेक बैठकांनंतर, त्यांच्या संबंधित सैन्याच्या सक्रिय सहभागाने हा करार झाला.
आम्ही अजूनही काम करत आहोत. गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू आहे. त्यानुसार, भारत-चीन सीमा भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त व्यवस्थेवर एकमत झाले आहे. 2020 मध्ये या भागात उद्भवलेल्या समस्यांचे निराकरण केले जात आहे. भारत आणि चीन गेल्या काही आठवड्यांपासून सीमा समस्या सोडवण्यासाठी संपर्कात आहेत. हा करार डेपसांग आणि डेमचोक भागातील गस्त व्यवस्थेशी संबंधित आहेत, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी दिली.
या निर्णयामुळे भारतीय सैनिकांसाठी काही ठिकाणी गस्त घालण्याच्या दृष्टीने प्रवेश खुला होईल. सध्या सुरू असलेल्या वादामुळे हे भाग प्रतिबंधित करण्यात आले होते.
यागेल्या चार वर्षांपासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेला तणाव निवळण्याच्या दृष्टीने जूनमध्येही भारत-चीनने रचनात्मक आणि भविष्याच्या दृष्टीने चर्चा झाली होती. या चर्चेचे फलित मात्र काहीच मिळाले नव्हते.
चार वर्षांपासून तणाव
मे 2020 पासून भारत आणि चीन सैन्यामध्ये सीमेवर तणाव कायम आहे. जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी 20 भारतीय जवान शहीद झाले होते, तर काही चिनी सैनिकही मारले गेले होते. गेल्या काही दशकांतील हा सर्वांत भीषण संघर्ष होता.
संयम, मुत्सद्देगिरीचे परिणाम : एस. जयशंकर
गस्तीच्या नवीन प्रणालीवर भारत-चीन सहमत झाला आहे. भारत आणि चीनमध्ये सीमेवर गस्त व्यवस्थेबाबत करार झाला आहे. त्यामुळे मे 2020 पूर्वीची परिस्थिती पूर्वपदावर येईल. ही सकारात्मक आणि चांगली प्रगती आहे. हे खूप संयम आणि अत्यंत दृढ मुत्सद्देगिरीचे परिणाम आहे, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काल सांगितले.