एमपीटीला कोळसा हाताळणी वाढवू देणार नाही

0
125

एमपीटीतील कोळसा हाताळणीमुळे मुरगांव तालुक्यात जे प्रदूषण होत आहे त्यासंबंधीचा अभ्यास अहवाल हाती येईपर्यंत येथे येणार्‍या ७.५ दशलक्ष टन कोळशाची हाताळणी १५ दशलक्ष टन एवढी वाढवू देण्यात येणार नसल्याचे पर्यावरणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल विधानसभेत स्पष्ट केले. आमदार कार्लुस आल्मेदा यांच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील स्पष्टीकरण केले.
यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांनी पर्यावरणाविषयक अभ्यास अहवाल येईपर्यत वाढीव कोळसा हाताळणीला परवानगी देऊ नका, अशी सूचना त्यांनी मंत्र्यांना केली होती.
यावेळी पर्रीकर म्हणाले की, कोळसा हाताळणीमुळे मुरगांव तालुक्यात प्रदूषण होऊ नये यासाठी एमपीटी उपाययोजना करू पाहत असून ती उघड्यावर न करता बंद खोलीत करण्याचा त्यांचा विचार आहे. त्यासाठी एमपीटी बांधकाम करू पाहत आहे. मात्र, सीअरझेडकडून त्यांना परवानगी न मिळाल्याने हे बांधकाम उभारता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोळसा प्रदूषण समस्येसंबंधी आपण केंद्रीय जहाजोद्योग मंत्र्यांचीही भेट घेणार असल्याचे पर्रीकर यांनी यावेळी नमूद केले.