एप्रिलमध्ये १.६८ लाख कोटी जीएसटी गोळा

0
17

>> नवा विक्रम; पहिल्यांदाच १.५ लाख कोटी रुपयांचा आकडा पार

देशात एप्रिल महिन्यात वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) गोळा करण्याबाबत आतापर्यंतचा सर्वात मोठा विक्रम रचला गेला आहे. एप्रिल २०२२ मध्ये एकूण १.६८ लाख कोटी रुपये जीएसटी गोळा झाला आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने १ मे रोजी याबाबत निवेदन सादर केले. एकूण मासिक जीएसटी संकलनात पहिल्यांदाच १.५ लाख कोटी रुपयांचा आकडा ओलांडला आहे. १ लाख कोटी रुपये संकलनाची ही सलग दहावी वेळ आहे.

एप्रिल २०२२ मध्ये १ लाख ६७ हजार ५४० लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे. यापैकी ३३ हजार १५९ कोटी रुपये सीजीएसटी, ४१ हजार ७९३ कोटी रुपये एसजीएसटी, ८१ हजार ९३९ कोटी रुपये आयजीएसटी आणि १० हजार ६४९ कोटी रुपये सेसचा समावेश आहे. आयजीएसटीच्या रकमेत ३६ हजार ७०५ कोटी रुपयांच्या आयात कराचा आणि सेसमध्ये ८५७ कोटी रुपयांच्या आयात कराचा समावेश आहे.
एप्रिलमध्ये २५,००० कोटी रुपयांनी जीएसटी संकलन वाढले आहे. मार्च २०२२ मध्ये १.४२ लाख कोटी रुपयांचे विक्रमी कर संकलन झाले होते. त्यानंतर एप्रिलमध्ये हा विक्रम मोडीत निघून नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये १४.८३ लाख कोटी रुपये जीएसटी संकलन झाले आहे.

राज्यात एप्रिलमध्ये ४७० कोटी जीएसटी जमा
राज्यात एप्रिल २०२२ मध्ये ४७० कोटी रुपये जीएसटी जमा झाला आहे. एप्रिल २०२१ च्या तुलनेत एप्रिल २०२२ मध्ये जीएसटी महसुलात १७ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०२१ मध्ये ४०१ कोटी महसूल जमा झाला होता. देशात एप्रिल २०२२ मध्ये १,६७,५४० कोटीचा जीएसटी महसूल जमा झाला आहे.