‘एनपीएस’ योजना निवडताना

0
86
  • शशांक गुळगुळे

पेन्शन वरिष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगणे शक्य करते. त्याना आर्थिक स्वातंत्र्य देते. आता पगारदारांसाठी बर्‍याच पेन्शन योजना उपलब्ध आहेत. त्यांच्यापुढे बरेच पर्याय आहेत. यांपैकी कोणती पेन्शन योजना निवडावी याचा निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावा.

‘नॅशनल पेन्शन सिस्टीम’ (एनपीएस) ही ऐच्छिक सेवानिवृत्ती बचत योजना भारतात सर्व भारतीयांसाठी २००९ पासून कार्यरत झाली. यापूर्वी फक्त शासकीय कर्मचार्‍यांसाठीच ही योजना होती; सर्व भारतीयांसाठी नव्हती. एनपीएस व इतर सेवानिवृत्ती बचत योजनांतील मुख्य फरक म्हणजे, ही योजना ‘लो कॉस्ट’ असून हिचा लॉक-इन कालावधी जास्त आहे. यामुळे शिस्तबद्ध गुंतवणूकदारांची सेवानिवृत्तीनंतरची गरज ही योजना योग्यरीत्या पूर्ण करू शकते. यातील गुंतवणुकीतून प्राप्तीकरातही सवलत मिळते. यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराला काही पर्याय निवडावे लागतात. पहिला पर्याय म्हणजे कोणत्या फंडात गुंतवणूक करायची व दुसरा पर्याय म्हणजे ‘ऍक्टीव’ की ‘ऑटो चॉईस’ यांपैकी एकाची निवड करायची. योग्य फंड मॅनेजर कसा निवडावा वा ‘ऍक्टीव’ की ‘ऑटो चॉईस’ पर्याय निवडावा हे आपण समजून घेऊया.

फंड मॅनेजरची निवड
सध्या या योजनेसाठी सात फंड मॅनेजर आहेत, ते असे- १) बिर्ला सन लाईफ पेन्शन फंड, २) एचडीएफसी पेन्शन फंड, ३) आयसीआयसीआय प्रुडेन्शियल पेन्शन फंड, ४) कोटक पेन्शन फंड, ५) एलआयसी पेन्शन फंड, ६) एसबीआय पेन्शन फंड व ७) यूटीआय रिटायर्मेंट सोल्युशन्स. यांत टीअर- १ आणि टीअर- २ खाती असतात. यात गुंतवणूक करताना गुंतवणूकदार वरीलपैकी कोणत्या फंड मॅनेजरकडे गुंतवणूक करायची हे स्वतः ठरवू शकतो. टीअर- १ खात्यातून सेवानिवृत्तीपर्यंत बाहेर पडता येत नाही, तर टीअर-२ खाते हे ओपन-एन्ड म्युच्युअल योजनेसारखे असते. यात गुंतवणूकदाराला कधीही गुंतवणूक करता येते व कधीही गुंतवणुकीतून बाहेर पडता येते. टीअर- १ खाते असेल तरच टीअर-२ खाते उघडता येते.

गुंतवणूकदार जर त्याला हवे असेल तर एका आर्थिक वर्षात एकदा फंड मॅनेजर बदलू शकतो, म्हणजे गुंतवणूकदाराला ‘पोर्टेबिलिटी’ची संधी उपलब्ध आहे. जर तुम्ही ‘एनपीएस’मध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करीत असाल किंवा पेन्शन फंड मॅनेजरच्या कामगिरीचा आढावा घेत असाल तर तुम्हाला (म्हणजे त्या गुंतवणूकदाराला) त्या फंडाचा इतिहास (ट्रॅक रेकॉर्ड) माहीत हवा. यांची मागील वर्षांची कामगिरी जाणून घेण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. ते म्हणजे, या योजनेने पॉईंट-टू-पॉईंट परतावा किती दिला?
ट्रेलिंग परतावा आणि रोलिंग परतावा
गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते रोलिंग परताव्याला गुंतवणुकीसाठी महत्त्व द्यावे. काही कालावधीसाठी परतावा कमी दिलेला असेल तर रोलिंग परताव्यावरून आपल्याला योजनेच्या पूर्ण कालावधीचे चित्र स्पष्ट होऊ शकते. रोलिंग परताव्याच्या आकडेवारीमुळे आपल्याला फंडाने ठरावीक कालावधीसाठी दिलेला कमाल परतावा, किमान परतावा तसेच सरासरी परतावा याची आकडेवारी मिळू शकते. रोलिंग परताव्याच्या आकडेवारीमुळे गुंतवणुकीतून किती परतावा मिळू शकेल याचा गुंतवणूकदाराला अंदाज बांधता येऊ शकतो.

‘एनपीएस’ची गुंतवणूक विविध गुंतवणूक पर्यायांत केली जाते. शेअर, कंपन्यांचे बॉण्ड्‌स, सरकारी सिक्युरिटिज तसेच काही पर्यायी गुंतवणूक योजनांतही केली जाते. पण गुंतवणूकदाराला एकच फंड मॅनेजर निवडावा लागतो. गुंतवणूकदार ‘एचडीएफसी’च्या डेट योजनेत व ‘एसबीआय’च्या इक्विटी योजनेत अशा प्रकारे गुंतवणूक करू शकत नाही. सर्व गुंतवणूक एकाच फंड मॅनेजरकडे करावी लागते. त्यामुळे गुंतवणूकदाराने फंड मॅनेजरने केलेल्या गुंतवणुकीच्या सर्व पर्यायांचा अभ्यास करावा. समजा गुंतवणूकदाराला शेअरमध्ये ७० टक्के गुंतवणूक, कंपन्यांच्या बॉण्ड्‌समध्ये २० टक्के गुंतवणूक व सरकारी सिक्युटिरीजमध्ये १० टक्के गुंतवणूक असणारी योजना निवडायची आहे तर अशांनी ज्यात शेअर गुंतवणुकीची कामगिरी इतर गुंतवणूक पर्यायांपेक्षा चांगली आहे असा पर्याय निवडावा. गुंतवणूकदार साधारणपणे फंडाचा आकार पाहून गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात. ओपन एन्डेड फंडच्या बाबतीत फंडाच्या आकाराचा विचार करणे योग्य ठरू शकते. नेहमीच्या म्युच्युअल फंड योजनेतून गुंतवणूकदार सतत बाहेर पडतात, पण ‘एनपीएस’ फंडाबाबत असे घडत नाही. शेअरमध्ये तीन प्रकारे गुंतवणूक असते. एक ‘लार्ज-कॅप’ गुंतवणूक म्हणजे बलाढ्य भांडवल असलेल्या मोठ्या कंपन्यांत गुंतवणूक, दुसरी मिड-कॅप. मध्यम आकाराच्या कंपन्यांत गुंतवणूक व तिसरी स्मॉल-कॅप म्हणजे छोट्या- लघुउद्योगांत गुंतवणूक. तर कोणत्या प्रकारच्या कंपन्यांत गुंतवणूक आहे यावरून गुंतवणूकदाराला जोखीम ठरविता येते. बहुतेक एनपीएस इक्विटी फंड्‌स लॉर्ज-कॅप्सच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. ‘डेट’मध्ये जास्त जोखीम नसते. पेन्शन फंड्‌सनी राष्ट्रीय शेअरबाजारातील व मुंबई शेअरबाजारातील कोणत्या कंपन्यांत गुंतवणूक करायची याची यादी ठरवलेली आहे. या यादीव्यतिरिक्त इतर कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करता येत नाही. पण आता लवकरच ही यादी वाढविण्यात येणार असून पेन्शन फंड्‌सना गुंतवणुकीसाठी जास्त पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

ऍक्टिव/ऑटो निवड
‘एनपीएस’मध्ये गुंतवणूकदार ऍक्टीव आणि ऑटो यातून एक पर्याय निवडू शकतो. ऍक्टीव पर्यायांत कशात गुंतवणूक करायची याचा निर्णय गुंतवणूकदार घेऊ शकतो. ऑटो चॉईसमध्ये फंड मॅनेजर गुंतवणूकदाराचे वय विचारात घेऊन हा निर्णय घेतो. जर तुम्हाला जास्त जोखीम घ्यायची असेल तर ऍक्टीव पर्याय निवडा. तुमची ‘एनपीएस’शिवाय जर म्युच्युअल फंडांच्या इतर योजनांत गुंतवणूक असेल तर तुम्ही ‘एनपीएस’मधील ५० टक्के गुंतवणूक शेअरमध्ये, कॉर्पोरेट बॉण्ड्‌समध्ये ३० टक्के व सरकारी बॉण्ड्‌समध्ये २० टक्के असा गुंतवणूक निर्णय घ्या. एनपीएस हे चांगले ‘लो कॉस्ट’ सेवानिवृत्त बचत ‘प्रॉडक्ट’ आहे. पण गुंतवणुकीपूर्वी गुंतवणुकीची रक्कम, जोखीम व गरज पडल्यास हातात पटकन पैसे मिळतील का या त्रिसूत्रीचा विचार करून निर्णय घ्यावा.

पेन्शन वरिष्ठ नागरिकांना स्वाभिमानाने जगणे शक्य करते. त्याना आर्थिक स्वातंत्र्य देते. पूर्वी फक्त सरकारी, निम्न सरकारी, महामंडळे, सार्वजनिक उद्योगातील कंपन्या अशांनाच पेन्शनची सोय उपलब्ध होती. खाजगी कंपन्यांतील कर्मचार्‍यांना पेन्शनची सोय उपलब्ध नव्हती. सर्व आस्थापनांत पगारदाराच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीसाठीची (पीएफ) रक्कम कापली जाते व जेवढी कर्मचार्‍याची रक्कम कापली जाते त्यात तेवढीच रक्कम मालक घालतात. जेथे पेन्शन नाही तेथील कर्मचार्‍यांना सेवानिवृत्तीनंतर त्यांची जमलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम व तेवढीच मालकाकडून मिळालेली व त्यावर व्याज मिळते. पण जेथे कर्मचार्‍यांना पेन्शन आहे तेथे त्यांना सेवानिवृत्तीनंतर फक्त त्यांचा जमलेला भविष्य निर्वाह निधी व्याजासह मिळतो. मालकाची रक्कम मिळत नाही. याच रकमेतून कर्मचार्‍याला पेन्शन दिली जाते.

पेन्शनचा लाभ सगळ्यांना मिळावा म्हणून ही ‘एनपीएस’ योजना अमलात आणली. सध्याच्या केंद्र सरकारने कमी उत्पन्न मिळविणार्‍यांचा विचार करून अटल पेन्शन योजना अमलात आणली. सर्व जीवन विमा कंपन्यांच्याही स्वतःच्या पेन्शन योजना आहेत. आता पगारदारांसाठी बर्‍याच पेन्शन योजना उपलब्ध आहेत. त्यांच्यापुढे बरेच पर्याय आहेत. यांपैकी कोणती पेन्शन योजना निवडावी याचा निर्णय मात्र विचारपूर्वक घ्यावा.