‘एचआरटी’शिवाय निरोगी जीवन

0
5
  • डॉ. मनाली महेश पवार

स्त्रीच्या आयुष्यात येणारे एक अपरिहार्य आणि महत्त्वाचे वळण म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ.
हा काळ म्हणजे पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून निवृत्ती होय. त्यामुळे ‘एचआरटी’शिवायही आपण जीवनशैलीमध्ये साधे-साधे बदल करून निरोगी, आनंदी आयुष्य नक्की जगू शकतो.

स्त्रीच्या आयुष्यात येणारे एक अपरिहार्य आणि महत्त्वाचे वळण म्हणजे रजोनिवृत्तीचा काळ. हा काळ कुठल्याच स्त्रीला नको असतो, त्यामुळे कित्येक स्त्रियांना अस्वस्थ करून टाकतो. आपली पाळी जाणार म्हणजे स्त्रीत्व संपणार; वृद्धत्वाच्या कल्पनेनेच त्या अस्वस्थ होतात. या काळात स्त्रियांमध्ये आमूलाग्र अंतर्बाह्य फरक दिसून येतात. त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे मासिक पाळी बंद होणे. या कल्पनेनेच स्त्री शारीरिक व मानसिकदृष्ट्या कोलमडून जाते.
रजोनिवृत्तीच्या काळात होणारे सर्व अंतर्बाह्य बदल हे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या स्त्रीसुलभ हार्मोन्सच्या अभावामुळे होतात. मग ही दोन्ही हार्मोन्स बाहेरून दिली तर? मग पूर्वीसारखेच जीवन स्त्री जगू शकते का? निदान आपलं स्त्रीत्व, वृद्धत्व पुढे ढकलू शकते का? आधुनिक शास्त्रानुसार मग यावर उपचार सुरू करण्यात आले. याला ‘हार्मोन्स रिप्लेसमेंट थेरपी’ असे म्हणतात.

1960 च्या सुमारास युरोप व अमेरिकेत काही स्त्रियांना इस्ट्रोजेन दिले आणि त्यांच्यात आमूलाग्र बदल दिसून आला. वृद्धत्वाच्या कल्पनेने व्यथित झालेल्या स्त्रियांना तारुण्याचा बहर आल्यासारखे वाटले. या ‘तारुण्य संजीवनी’चा प्रचार-प्रसार सर्वत्र झाला. पण 10-12 वर्षांनी गर्भाशय व स्तन यांच्या कॅन्सरचे प्रमाण लक्षणीय रीतीने वाढले आणि संशोधनातून सिद्ध झाले की हा सर्व इस्ट्रोजेनच्या सतत दिल्या गेलेल्या मोठ्या मात्रेचा परिणाम आहे. त्यानंतर सतत संशोधन करून आता ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेन दिले जातात ते नैसर्गिक व अतिशय कमी मात्रेत. इस्ट्रोजेनमुळे गर्भाशयाच्या आतील स्तराची वाढ होते, पण प्रोजेस्टेरॉनबरोबर दिल्यास गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

‘एचआरटी’मुळे ‘हॉट फ्लॅशेस’ थांबतात, त्वचा-केस यांवर चांगला परिणाम दिसतो, मूत्र व योनीमार्गाचे विकार सुधारतात, लैंगिक आयुष्य सुखावह होते, स्मरणशक्ती सुधारते, निद्रानाश, नैराश्य कमी होते आणि अस्थिभंगुरता, हृदयविकार, भ्रंश या दूरगामी परिणामांपासून पुष्कळ प्रमाणात संरक्षण मिळते. असे काही फायदे ‘आचआरटी’मध्ये आहेत. पण दूरगामी कॅन्सरचा धोकाही आहे.

  • ज्यांना लिव्हर किंवा किडनीचे विकार असतील, गर्भाशय किंवा स्तनाचा कॅन्सर असेल, पित्ताशयाचे खडे होण्याचा विकार आहे, त्यांना ‘एचआरटी’ देत नाहीत.
  • ‘एचआरटी’ देतानाही प्रत्येक स्त्रीसाठी तिच्या गरजा व तिची तब्येत बघून योग्य त्या प्रमाणात द्यावी.
  • ‘एचआरटी’ सुरू करण्याआधी सर्व शारीरिक तपासण्या, रक्त, लघवी, सोनोग्राफी, मॅनोग्राफी, पॅप स्मिअर करून घेणे आवश्यक असते. तसेच ती घेतानाही वेळोवेळी तपासण्या करणे आवश्यक असते. कारण ‘एचआरटी’चा मोठा दुष्परिणाम म्हणजे गर्भाशय व स्तनाच्या कॅन्सरची शक्यता.
  • ‘एचआरटी’ सतत दहा वर्षे घेतल्यास स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त दिसून येते.

आतापर्यंत ज्यांची रजोनिवृत्ती अकाली झाली, शस्त्रक्रियेने झाली, ज्यांना हृदयविकाराचा, अस्थिभंगुरतेचा धोका आहे, त्यांनी ‘एचआरटी’ नक्की घ्यावी असे मत होते. पण नुकत्याच आलेल्या संशोधन अहवालावरून असा निष्कर्ष निघाला आहे की, ‘एचआरटी’मुळे रजोनिवृत्तीचे दूरगामी परिणाम लक्षणीय मात्रेने कमी होत नाहीत व एका ग्रुपमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाणदेखील वाढलेले आढळले. त्यामुळे सध्याची विचारसरणी अशी आहे की, तत्कालीन त्रास फार होत असल्यास तीन ते सहा महिन्यांकरिता ‘एचआरटी’ अवश्य घ्यावी. पण त्यापेक्षा जास्त काळ घेताना दूरगामी दुष्परिणामांचा विचार करावा.
‘फायटो इन्स्ट्रोजन्स’ ही नवीन प्रकारची औषधे आता ‘एचआरटी’ला पर्याय म्हणून वापरता येतात. नैसर्गिकरीत्या वनस्पतींमधून मिळणारे हे पदार्थ इस्ट्रोजेनयुक्त असतात. ‘आयसोफ्लॅवोन्स’ ही द्रव्ये त्यातून मिळतात. ही वनस्पतीद्रव्ये इस्ट्रोजेनसारखा व इस्ट्रोजेनविरोधी असे दोन्ही प्रकारचे परिणाम करतात. अस्थी, हृदय, मूत्राशय, त्वचा, योनीमार्ग यांवर चांगले परिणाम दिसतात. गर्भाशय, स्तन, मोठे आतडे, मेंदू यांच्या कर्करोगाला प्रतिबंध होतो.

‘एचआरटी’ला काही पर्याय
रजोनिवृत्तीनंतर निरोगी, निरामय जीवनशैलीसाठी ‘एचआरटी’ला काही पर्याय आहे का? ‘एचआरटी’ घ्यायची नसल्यास त्याला पर्याय म्हणजे निरोगी, निरामय जीवनशैली अंगिकारावी व त्यासाठी समतोल आहार-विहार आणि मनःस्वास्थ्याची गरज आहे.

  • योग्य प्रकारचा आहार योग्य मात्रेत घेतला जाणे आवश्यक आहे. संतुलित आहारात कार्बोदके, प्रथिने, चरबीयुक्त पदार्थांच्या संतुलनाबरोबरच जीवनसत्त्वे, क्षार, खनिजे व पाणी यांचाही समावेश होतो.
  • आहारात मेद पदार्थ वर्ज्य करावेत. तेल, तूप, लोणी, चीज अगदी कमी प्रमाणात घ्यावी. तेल, तेलकट पदार्थ वर्ज्य करावेत. तेल दरडोई जास्तीत जास्त 600 ग्रॅम दरमहा एवढेच वापरावे.
  • आता शरीराची वाढ व्हायची नसते म्हणून अन्नाचे प्रमाण दरवर्षी दोन टक्के इतके कमी करावे.
  • कॉफी, चहा, कोलायुक्त पेये, मद्य, तंबाखू यांचे व्यसन लागू देऊ नये.
  • कमीत कमी 10 ते 12 ग्लास पाणी रोज प्यावे.
  • हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या व बाजारात ऋतूनुसार मिळत असलेली फळे आहारात असू द्यावीत.
  • मेथी, फुलकोबीची पाने, पालक यांतून कॅल्शियम मिळते. त्याचबरोबर दूध, दुग्धजन्य पदार्थ, बीट, बदाम, जरदाळू, खसखस आदी गोष्टीमधूनही कॅल्शियम मिळते म्हणून या पदार्थांचा आहारात समावेश असावा. मांसाहारीनी चिकन व मासे अवश्य खावेत. सध्याच्या काळात चिकन खाताना सावधगिरी बाळगावी. मटण वर्ज्य करावे.
  • आहाराइतकेच महत्त्व व्यायामाला द्यावे.
  • व्यायामामुळे स्नायू बळकट व लवचिक होता, सांध्यांचे चलनवलन चांगले राहते, अस्थिभंगुरतेला प्रतिबंध करण्यास मदत होते, आपले ‘रिफ्लेक्स’ चपळ होतात, हृदय व फुफ्फुसाची क्षमता सुधारते. व्यायाम हा ‘स्ट्रेस बुस्टर’ आहे. व्यायामाने मूड चांगला राहतो. झोप चांगली लागते. ताणतणाव कमी होतो. रजोनिवृत्तीच्या काळात थोडाफार व्यायाम रोज सुरू ठेवावा. व्यायाम सुरू करताना डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावा. सकाळ-संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जावे.
    रजोनिवृत्तीच्या काळात उत्तम मनःस्वास्थ्य राखणे खूप आवश्यक आहे. नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. पाळी जाणार किंवा गेली म्हणून उदास न होता, त्यातूनच काहीतरी नवीन उत्साहाने निर्माण करण्याचा विचार करता येतो. हा काळ मुलांच्या संगोपनाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा असतो, त्यामुळे तो काळ स्वतःसाठी राखून ठेवा. नवीन छंद शिका किंवा वेळेअभावी तुमच्या छंदाला घातलेली मुरड परत जिवंत करा. गायन, चित्रकला, लेखन, वाचन, भरतकाम, बागकाम, पाककला… ज्या-ज्या गोष्टीतून तुम्हाला आनंद मिळतो त्या-त्या गोष्टी परत पुनरुज्जीवित करा. समवयस्क महिलांची मंडळे शोधून काढा, तयार करा व समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न करा.

या काळात पतीच्याही सहकार्याची आवश्यकता असते. या काळात पतीने आपल्या कामातून जमेल तितका जास्त वेळ आपल्या पत्नीबरोबर घालविला पाहिजे. तिच्या कामात घरातील सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. या काळात तिच्या शरीराची बरीच बलहानी झालेली असते. तिच्या तपासण्याच्या वेळी बरोबर राहून तिला असा विश्वास वाटला पाहिजे की ती एकटी नाही, सर्व कुटुंबीय तिच्याबरोबर आहेत. हा विश्वास तिला मोठा दिलासा देणारा असतो. तिला कुणीही गृहित धरू नये.

  • तणावात असल्यास थोडेसे विश्लेषण स्वतःही करावे. कुठल्या गोष्टीची काळजी वाटते ते शोधून काढावे. एकदा मूळ कळले की समवयस्क मैत्रीण किंवा आपल्यापेक्षा वडील, नातेवाईक किंवा मानसशास्त्रज्ञ यांच्याशी मोकळेपणाने बोलून मार्ग काढावा.
  • मनःशांतीसाठी योगोपासना हा एक उत्तम उपाय आहे. नामजप करून जर मनःशांती मिळत असेल तर तोही एक उपाय आहे.
    रजोनिवृत्तीचा काळ म्हणजे पुनरुत्पादनाच्या क्षमतेतून निवृत्ती आहे. त्यामुळे ‘एचआरटी’शिवाय आपण जीवनशैलीमध्ये साधे-साधे बदल करून निरोगी, आनंदी आयुष्य नक्की जगू शकतो.